विद्यापीठात किंवा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतून फालतू पॉलिटिक्स होते यात काही नवीन नाही. सिनिऑरिटी वगैरेसारखे मुद्दे म्हणजे तर रोजचीच लढाई. हे पॉलिटिक्स विद्यार्थ्यांची विषयाची निवड किंवा शिकण्याची संधी इथवरही जाऊन पोहोचते तेव्हा ते हाणून पाडायलाच पाहिजे. आज माझ्या संपर्कातील कित्येक कॉलेजांमधले शिक्षक काय काय कथा आणि व्यथा सांगत असतात, त्या ऐकल्या की अंगावर शहारे उठतात. आपण राजकारण्यांना किती हिरीरीने नावं ठेवतो, किती रेवडी उडवतो. ते तर थेट राजकारणातच असतात. आपल्या विद्याक्षेत्रातले, ज्ञानक्षेत्रातले काही लोक आपसात किंवा विद्यार्थ्यांशी किती राजकारण करतात ते पाहिलं, अऩुभवलं की घृणा येते.
मराठीचे एक जुने प्राध्यापक होते- ते विद्यार्थ्याला वर्गाबाहेर भेटले की समोर तीन पुस्तकं धरायचे आणि म्हणायचे- बघ, तुला हवं ते घे यातलं. वाच. आणि मग आपण बोलू या हं त्यावर.
आपल्या विद्यार्थ्यांना वाचनाचं वळण त्यांनी लावलं ते कायमचं. या विद्यार्थीप्रिय प्राध्यापकांवर त्यांच्या सहकारी बाई जळफळत रहायच्या. पण आपणही तसं काहीतरी करावं अशी उर्मी काही त्यांना झाली नाही. आज त्यांच्या भाषाविभागात विद्यार्थ्यांची प्रचंड वानवा आहे. पण त्यासाठी काही चांगला दृष्टिकोन घेऊन नवीन प्रयोग करणे त्यांना जमणार नाही. ज्या विभागांकडे विद्यार्थी आहेत त्यांचा दुस्वास करण्यापलिकडे त्या जाऊ शकत नाहीत. उद्या कुठल्या परिषदेत भाषेच्या रक्षणाच्या नावाने गळा काढणारे भाषण फारफार तर करताना दिसतील त्या. आपल्या विभागात येणारे नवीन शिक्षक विद्यार्थीप्रिय होताना दिसले तर त्यांना त्रास कसा द्यावा यावर आपल्याकडे पदविका सुरू केली तर आपल्याला खूपच फॅकल्टी मिळेल.
विद्यापीठातल्या एका भाषा विभागातली गोष्ट आहे. व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम करणारा, शिकवण्यावर प्रेम असणारा एक विद्यार्थीप्रिय शिक्षक होता. प्राध्यापक होऊ शकेल अशी त्याची गुणवत्ता होती. इतके त्याचे शोधनिबंध होते. अनेक विदेशी विद्यापीठांतून व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून त्याला निमंत्रणे येत.
परीक्षेसाठी पेपर काढणे, ते तपासणे, आपल्याला सुट्टी हवी असेल तेव्हा त्याच्याकडे आपली लेक्चर्स सरकवणे यासाठी इतर सर्व शिक्षकांना तो फार हवाहवासा होता. पण जेव्हा नियुक्तीची वेळ आली, तेव्हा विभागतल्या भयग्रस्तांच्या थव्याने त्याला रीडर म्हणून नियुक्ती मिळू नये याची काळजी घेतली. तेव्हाच्या कुलगुरूंनी आपल्या महाराष्ट्राच्या ऑलपावरफुल साहेबांच्या नावाने चिठ्ठी फाडून त्याचा पत्ता कापला. आज तो शिक्षक कच्छ विद्यापीठात विभागप्रमुख आणि प्राध्यापक म्हणून रुजू झाला आहे. आणि कदाचित एका विदेशी विद्यापीठात कायमचा जाण्याची शक्यता आहे. फडतूस हितसंबंध जपण्याच्या
अंतर्गत राजकारणामुळे या विद्यापीठातील विद्यार्थी एका अत्युत्तम शिक्षकाला कायमचे मुकले.
नको त्या अशैक्षणिक मापदंडांच्या आधारावर विद्याक्षेत्रात घुसलेल्या पोटार्थींनी आपली प्रतिष्ठा वाढवण्याच्या असल्या निरर्थक खेळ्या करणे थांबवले तरी काही प्रमाणात आपण सावरू शकू.