Thursday, August 12, 2010

किळसवाणा भिकारडेपणा

काल माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला.तिच्या परिचितांपैकी एका विद्यार्थ्याने लॉच्या पेपर्सपैकी एका पेपरचे रिव्हॅल्यूएशन करायला विद्यापीठाच्या परीक्षाविभागात अर्ज केला होता. त्यात त्याचे मार्क्स वाढण्याऐवजी कमी झाले. म्हणून त्याने पुन्हा अर्ज केला होता. ही तांत्रिक चूक होती. पण ती निस्तरली जात नव्हती. मी माझ्या विभागातील हेडक्लार्कला सोबत देऊन त्याला परीक्षा विभागात पाठवले होते. त्या बाई स्वतःच म्हणाल्या मदत करा म्हणून मी स्वतःच सांगून येते,नाहीतर आपले लोकं मुलांना उभंच करत नाहीत. त्यानंतर त्याचं काम झालं असेल असं आम्ही गृहीत धरलं.
काल मैत्रिणीने सांगितलं- परीक्षा विभागातून ते काम उगाचच खोळंबत होतं म्हणून त्या मुलाची आई इथे आली. तिची अवहेलना झाली ती इतकी की ती तिथेच रडू लागली. मग एकूण चार टेबलांवर प्रत्येकी पाचशे रुपये वाटले तेव्हा ती तयार असलेली फाइल बाहेर निघाली. फाइल हातात देताना पुन्हा एकदा देणाऱ्याने मंत्र जपला- कुछ द्येव ना... पुन्हा पाचशे रुपये दिले.
काहीही चूक नसलेला, सुधारणेची गरज नसलेला आपला कागद हलायला इतकावेळ आणि लाच द्यावी लागते तर- चूक असेल तेव्हाचा रेट काय असेल त्रैरासिक मांडा.
ही गोष्ट पकडून दिली जाऊ शकत नाही, केस होऊ शकत नाही, कारण लाच देणाऱ्या मुलानेही चूकच केली आहे. आपल्याला एखादी गोष्ट लवकर मिळणे गरजेचे आहे हे सांगितले की असले भिकारडे लोक आणखी गैरफायदा उकळतात.
आता सिक्स्थ पे कमिशनचे पगार चांगले झाले आहेत तरीही काही कर्मचाऱ्यांचा हा भिकारडेपणा संपत नाही. ही गोष्ट कुलगुरूंच्या कानावर घातली असता त्यांनी कारवाई करू या म्हणून तयारी दखवली, पण कशी करणार कारवाई... कुठल्या आधारावर...
पण मला खात्रीच आहे- हा मुलगा, जो कायद्याचा विद्यार्थी असून काम काढण्यासाठी आणि पुढे त्रास होईल या भीतीने लाच द्यायला तयार झाला,तो पुढे येऊन लाच मागणाऱ्या,घेणाऱ्या माणसांकडे बोटही दाखवणार नाही.शिवाय पुरावा नसेल तर सत्य हा पुरावा होऊ शकत नाही हे तर लोकशाही न्यायव्यवस्थेचे गमक आहे.
मागे एकदा एंजिनिएरिंग विषयात मास्टर्स करणाऱ्या तीन मुलींची केस माझ्याकडे अशीच ओळखीतून आली होती. त्यांच्या गाईडच्या प्रश्नाचा गुंता विद्यापीठाने आणि कॉलेजने मिळून केला होता. तेव्हा परीक्षा नियंत्रकांकडून त्यांना अत्यंत वाईट वागणूक मिळाली होती.
एकंदरच आमचा परिक्षाविभाग संवेदनाहीन पध्दतीने वागतोच.
मला काही लोक म्हणाले, अहो मॅडम, तुम्ही काय या बारीकसारीक गोष्टीने व्यथित होताय... हे तर काहीच नाही.
कुलगुरूपदावरील व्यक्तीने आपण काय करू शकतो अशी हतबलता दर्शवली तर मग संपलंच.
आता तंत्रज्ञान पुढे गेलं आहे. त्याचा वापर करा, सर्वत्र सीसीटीव्ही बसवा. कारवाई करायची तर पुरावे मिळतील याची व्यवस्था करा.
आणि मुख्य म्हणजे आपण भिकारडेपणा करता आहात याची या संबंधित कर्मचाऱ्यांना थोडी जाणीव करून द्या. त्यांची लाज काढा.
भ्रष्टाचार केला तर गाढवावरून धिंड काढण्याची शिक्षा अंमलात आणली तर आमच्याकडे देशातली गाढवं कमी पडतील.
नाहीतर अँटीकरप्शनब्यूरोची एक चौकीच इथे बसवायला हवी.
विद्यापीठाच्या प्रांगणात शिक्षण प्रक्रियेच्या ऐन भरात असताना आमच्याकडूनच मुलांना भ्रष्ट होण्याचा पहिला धडा मिळतो. शरम वाटते. या विद्यापीठाच्या नावाने काम करण्याची शरम वाटावी असले हे भिकारडे आमच्या सोबत काम करतात. किळस तरी किती करावी?
विद्यार्थी संघटना, कर्मचारी संघटना यांना हे दिसत नाही?

Wednesday, August 11, 2010

जैवतंत्रज्ञानाचे मुंबईचे विद्यार्थी कच्चे!

आज एक जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील वैज्ञानिक माझ्याकडे आले होते. एका मोठ्या कंपनीत नोकरीवर असल्यामुळे त्यांच्याकडे अनेकदा जैवतंत्रज्ञानाचे विद्यार्थी अनुभव घेण्यासाठी, शिकाऊ म्हणून तर कधी नुसते पहाण्यासाठी येतात. त्यांनी सहज सांगितलं ते दुखावून गेलं. ते म्हणाले, आमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबईहून आलेले विद्यार्थी अगदीच कच्चे असल्याचं दिसतं. साध्यासाध्या गोष्टी त्यांना येत नसतात. माहीतच नसतात. त्यांना काय कसं शिकवतात कोण जाणे. साधं 10एक्स सोल्यूशन करायला सांगितलं तरी त्यांना तीनतीनदा समजावून द्यावं लागतं. त्या मानाने पुण्याचे, बारामतीचे विद्यार्थी खूप तयारीचे असतात. लॅबमध्ये कामं केलेली आहेत हे कळतं. काय प्रकार आहे हा... कां असं तुमच्याकडे?
मी मान खाली घातली.
आपली मान खाली गेली आहे...
असं कां होतंय याची जबाबदारी कोणाची...
आज जगभरात जैवतंत्रज्ञानाचं महत्त्व वाढतंय. 2025 नंतर जगाची भूक समर्थपणे भागवण्याची शक्ती फक्त जैवतंत्रज्ञानात आहे हे लख्ख आहे. आरोग्यक्षेत्रातही तेच होणार आहे. आपण फक्त व्याख्या पाठ करवून घेऊन पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थी बाहेर धाडले तर ते असमर्थ ठरलेले, आणि म्हणून अवहेलना सोसणारे विद्यार्थी नंतर आपल्या मातृसंस्थेचा कान चावायला येतील याचं तरी पुस्तकी शिकवणाऱ्या शिक्षकांनी, संस्थांनी भान ठेवावं.
आवश्यक ती गुणवत्ता आणण्यासाठी खूप पैसा आणता येतो. निष्ठा मात्र अंगभूत असावी लागते.
कुणीतरी बोला यावर!

Monday, August 9, 2010

श्री3 आणि मंडळी

काल माझ्या मुलाने त्याच्या विश्वातली एक घटना सांगितली. विवेकनिष्ठ, तर्कशुध्द विचार करण्याचे वळण असलेला हा माझा मुलगा त्याच्यावर पडलेल्या दबावाचा अगदी सहजच सामना करू शकला. पण त्याच्याबरोबरच्या इतरांना मात्र तो एक पंथ जॉईन करण्याच्या निर्णयापासून परावृत्त करू शकला नाही.
इतरांनाही शहाणे करून सोडण्याची अजून त्याची बौध्दिक तयारी व्हायची आहे म्हणा किंवा त्याचे मत ऐकून घेणे महत्त्वाचे वाटावे इतकीसुध्दा त्या इतरांची बौध्दिक तयारी नसावी म्हणा.
निमित्त होते आजकालचे एक प्रसिध्द गुरू श्रीश्रीश्रीरविशंकर यांच्या अनुयायांत सामील होण्याचे. तरुणांना आकर्षित करून त्यांना आपल्या ताफ्यात जमा करण्यासाठी या बुवाने आता एक येस क्लब काढला आहे.
फक्त तीन हजार रुपये भरायचे-- की मग तुम्हाला काय काय लाभ. लाभच लाभ. स्ट्रेसपासून मुक्ती, विश्वशांती, विश्वप्रेम, शारीरिक पीडांपासून मुक्ती... आणि हिज होलीनेसचा दिव्य सहवास जो लाभताच चेहऱ्यावर असं काही तेज उमलतं...हे सारं त्याला त्याच्या मित्राचा एक तरुण पाहुणा सांगत होता. त्याच्या मित्राच्या मैत्रिणीने त्याला कन्व्हिन्स केलं होतं. मग इतर मित्रांनाही कन्व्हिन्स करण्याची संधी श्रीश्रीश्रीच्या ताफ्याने हस्तेपरहस्ते साधली होती. टाइमपास म्हणून घरी बोलावून त्या मित्राने या दहाबारा मुलांच्या टोळक्याला श्री3च्या निरागस दलालाचं भाषण ऐकवलं. स्ट्रेसमुक्ती, विश्वप्रेम, अध्यात्म याच बरोबर आता बिझनेस नेटवर्किंगची प्रासादिक भाषाही असल्या दीक्षाविधीमध्ये खळखळू लागली आहे. आणि तीन हजार रुपयांची दक्षिणा देताना करारपत्रही करून घेतले जाते. त्यात श्री3ची स्पेशल सुदर्शन क्रिया -जी केल्याने तुमचे सारे आजार दूर पळणार म्हणजे पळणार- इतर कोणाही ऐऱ्यागैऱ्याला न शिकवण्याच्या करारावर सही करायची असते.
श्री3चे भक्त त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात अशी त्यांची प्रभा आहे. लोक म्हणे कर्ज काढूनही त्यांच्या सहवासासाठी खर्च करतात... म्हणजे त्यांचे बिझनेस क्लासचे अमेरिकेचे तिकिट काढून त्यांच्यासोबत प्रवासाची संधी घेणे. जाऊ दे त्या मूर्खपणाला मर्यादाच नाही.
माझ्या विवेकी मुलाने त्यांच्या प्रत्येक समर्थनाचा पराभव केला आणि मला तुमच्यात सामील व्हायचे नाही असे स्पष्टच सांगितले. स्ट्रेस मुक्ती, चांगली शिकवण, प्रेझेन्टेशन स्किल्स, नेटवर्कच्या संधी सारे काही मी माझ्या बुध्दीबळावर साध्य करू शकतो असे बजावून त्याने पाठ फिरवली.
पण कितीजण अशी पाठ फिरवतील...
श्री3चे संमोहन अनेक संस्थांवर पडले आहे. युनेस्कोच्या काही कार्यक्रमांत त्यांचे प्रमुख या संमोहनाखाली आल्यामुळे त्यांच्या आर्टऑफ्लिव्हिंगचा कोर्स कंपल्सरी केला गेला होता असे मी ऐकले आहे. अनेक शिक्षण संस्थांमध्ये त्यांचा चंचुप्रवेश झाला आहे. दरडोई तीन हजार घेऊन हॉल वगैरे बुक करण्याचा खर्च म्हणे ते भागवतात. भलतंच आर्टिस्टिक झालं हे आर्टऑफ्लिव्हिंग.
पाच वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठातल्या एका प्राध्यापिकाबाईंना या आर्टऑफ्लिव्हिंगची बाधा झाली होती. त्यांनी अगदी ऍकेडेमिक कौन्सिलपर्यंत हा विषय घेऊन मजल मारली होती. हे कोर्सेस आपल्याकडे सुरू करावेत असे त्या सांगत होत्या. सुदैवाने दुसऱ्या एका प्राध्यापिकेने त्याला जोरदार विरोध दर्शवला- आणि असल्या गोष्टी करण्याचे विद्यापीठ हे ठिकाण नव्हे म्हणून ठणकावून सांगितले. तो विषय तिथेच संपला. मग त्या श्री3वाल्या बाई माझ्याकडे आल्या. बहिःशालचे कोर्सेस इतके छान, इतके विविध असतात तर तुम्हीच करा ना हा आर्टऑफ्लिव्हिंगचा कोर्स- त्यांचं वाक्य पुरं व्हायच्या आतंच मी श्री3चा जमाखर्च मांडायला सुरुवात केली. आणि त्या निघाल्याच.
गेले वर्षभर मी ऐकून आहे, की या श्री3वर हिरीरीने आपला वेळ घालवणाऱ्या बाई आता आर्टऑफ्लिव्हिंगला शिव्या मोजतात. ते लोक जगावर प्रेम करायला शिकवण्याच्या नावाखाली कुटुंब तोडू पहातात अशा निष्कर्षाप्रत त्या आल्या आहेत. आणि आर्टऑफ्लिव्हिंगला जायला लागल्यानंतर कुटुंबात बेबनाव झाले, घटस्फोट झाले याची भरपूर उदाहरणं आहेत असं तिथे जाणारेच सांगतात.
पण असले बाबाबुवा शिक्षणसंस्थांच्या दारातून घुसू पहात असतील तर आपण सावध रहायला हवं. आपण शिक्षणप्रणालीतून जे नाहक स्ट्रेस मुलांवर दडपतो त्यातून सुटण्यासाठी मुलं असल्या आंधळ्या अंधारात शिरत असतील तर त्याचाही विचार करायला हवा. एंजिनिअरिंगचीच काय अनेक प्रोफेशनल कोर्सेसची हुषार मुलं पेपर्स नीट न तपासले जाता लागणाऱ्या निकालाने हैराण असतात.
त्यांना श्री3चं काय कुठल्याही महाराज, बाबा, बापूंचं सोपं उत्तर भुलवत असेल तर विचार आपण करायला हवा.
काही काळ आमच्या कुलगुरू असलेल्या देशमुखबाईंच्या दालनात त्यांची समर्थ महाराजांवरची श्रध्दा मागेपुढे प्रदर्शित होत असायची. त्यांच्या दालनातल्या गम्पती बाप्पाच्या मूर्तीची जास्वंदी आरास झळकत असायची. मग त्यांना भेटायला येणारेही ते सूत्र पकडून बरोब्बर संवाद साधायचे. शैक्षणिक क्षेत्रात स्वतःच्या व्यक्तिगत श्रध्दांचे असे प्रदर्शन कुलगुरूंनी करणे चूक होते. पण ते घडत होते.
अशाच प्रकारे छोटेछोटे संस्थाप्रमुख आपापल्या श्रध्दा प्रदर्शित करू लागले तर सूत्र पकडून लांगुलचालन करणाऱ्यांची कमतरता नाहीच. साऱ्या विद्यार्थांना कुठल्या ना कुठल्या स्ट्रेसमुक्तीच्या श्रध्देच्या मांडवात उभं करण्याचा प्रयत्न होऊ लागेल. आपल्या देशात बिनभांडवलाने चालणारा सर्वात बरकतीचा धंदा श्रध्देच्या मार्केटिंगचा आहे.
हा धंदा साराभाई, सहा, भाभा, खुराना, बोस, सेन, चंद्रशेखर, नारळीकर साऱ्यांना झाकोळून या देशाच्या भवितव्याला ग्रहण लावू शकतो.

Sunday, August 8, 2010

'दाश'बोध

परवा मुंबई विद्यापीठात प्रा. डॉ. बिजॉयकुमार दाश यांचं भाषण आणि प्रेझेन्टेशन झालं. 'टेक्नॉलॉजी इंटरव्हेन्शन इन हायर एज्युकेशन' असा विषय होता. येत्या तीन-चार वर्षांत कॉम्प्युटर्स, प्रोजेक्टर्स अशा साधनांचे जे नवे सोपे, स्वस्त आणि छोटे अवतार येणार आहेत त्यांची त्यांनी ओळख करून दिली. थ्रीडी इमेजेस् सहजगत्या दाखवू शकणारी ही सारी साधने घरोघरी, गावोगावी उत्तमोत्तम शिक्षक पोहोचवू शकतील अशा क्षमतेची आहेत. त्यांनी काही अल्ट्रा कपॅसिटर्स दाखवले. दहा तास उर्जा पुरवठा- म्हणजे वीज पुरवठा करू शकणारे हे कपॅसिटर्स चार्ज करायला फक्त एक मिनिट लागते. वाटाण्याएवढे एलइडी लाइट्स प्रत्येकी चारशे वॅट्स् इतक्या ताकदीने उजेड देऊ शकतील. आपल्या गावोगावचे शिक्षण होण्यातल्या फिझिकल अडचणींवर मात करण्याची क्षमता असलेले हे सारे तंत्रज्ञान आपल्याकडे काही संशोधकांच्या बुध्दीने घेतलेल्या अतीव श्रमांचे फलित म्हणून लवकरच पोहोचणार आहे.
हे सांगता सांगता दाश सरांनी आणखी बऱ्याच गोष्टींवर भाष्य केले. भाष्य केले म्हणण्यापेक्षा ते सहज निर्मळपणे सांगत होते. पण ते सारे ऐकणाऱ्या मला भाष्य सुचत होते.
विक्रम साराभाईंनी रिसर्चर होण्यापेक्षा इन्व्हेंटर होणे महत्त्वाचे आहे हे मनावर ठसवल्यानंतर कामाला लागलेल्या मूठभर प्रज्ञावंतांपैकी डॉ. दाश एक.  ते सांगत होते, साराभाईंनी त्यांना सांगितलं- रिसर्चर हा अखेर चौकटीतल्या चौकटीतच फिरत रहातो. इन्व्हेंटरला चौकटीच्या बाहेरच जाऊन वेगळा मार्ग काढावा लागतो. त्यामुळे तो साऱ्या जगाला काहीतरी नवीन देतो. जगाचं जीवन सुधारतो. दाश आम्हाला सांगत होते- आपणही आपल्या विद्यार्थ्यांना आता हेच सांगितलं पाहिजे. (आपण आपल्या विषयाच्या वर्गात विद्यार्थीसंख्या कशी वाढेल हे पहाण्यासाठी त्यांना आपल्या कालबाह्य विषयाची महती फुगवून सांगू नये)
वेगळा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे-( निदान त्यांना नापास तरी करू नये)
आपल्यातले खरोखरचे उत्तम अध्यापक जे शिकवतात ते रेकॉर्ड करून सर्वदूर पोहोचवले तर शिक्षणाचा सगळा प्रश्न सुटेल (बोंबला! कुणालातरी उत्तम ठरवलं की मग बाकीच्या खोगीरभरतीने काय करायचं गड्या?)
दाश म्हणाले, आपल्याकडे शिक्षण सर्वदूर पोहोचायला पैसा कमी पडतो. या स्वस्त साधनांच्या सहाय्याने आणि जगभरातले उत्तमोत्तम शिक्षक त्यामार्फत विद्यार्थांपर्यंत आणून आपल्याला अगदी कमीत कमी खर्चात दर्जेदार शिक्षण देणं शक्य होईल. (आणि शिक्षकाची नोकरी मिळताच आमच्या खाजगी शिकवण्या, आमची शेतीवाडी सांभाळून नोकरी असं सारं झकास चाललंय तेही बोंबलणार की!)
दास म्हणाले आपल्याकडील शासकीय, शैक्षणिक संस्थांचा  एक मोठा प्रॉब्लेम आहे. आपण लोवेस्ट कोटेशनच्या आधारावर साधने खरेदी करतो. ( लोवेस्ट कोटेशन- हायेस्ट कमिशन असा पूर्ण फंडा आहे साहेब) त्यामुळे आपण अनेकदा ऑब्सोलीट तंत्रज्ञान गळ्यात घेऊन बसतो. ते बदलायला हवं. ( खरेदी समित्यांवर, वित्त निर्णय घेणाऱ्या अनेकांना अद्ययावत् तंत्रज्ञानातील अनेक वस्तू म्हणजे- म्हणजे रे काय
भाऊ असा प्रश्न पडलेला असतो हे कुठे माहीतै आहे तुम्हाला, दाशसर! वीस वर्षांपूर्वी मला पोर्टेबल ओव्हरहेड प्रोजेक्टर हवा होता तेव्हाच्या आमच्या एका साहेबांनी विचारलं होतं- ते कांय असतं? मग दोन वर्षांनंतर मला स्लाइड प्रोजेक्टर हवा होता तेव्हा दुसरे साहेब आले होते ते म्हणाले- पण ते काय जे असेल त्याची खरंच गरज आहे कांय? मग आम्हाला एकदा प्रिंटर-कॉपियर-स्कॅनरची गरज भासली, तेव्हा बजेट कमिटीचे चेअरमन असलेले महोदय-जे नंतर क्रमाने प्रकुलगुरू पुढे कुलगुरू झाले- ते गोंधळून गेले आणि म्हणाले- बघू- पुढल्या वर्षी घेतलं तर नाही चालणार कां?)
मग दाशसर म्हणाले, पंतप्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री सर्वांनी मला आपल्या शिक्षणक्षेत्राचा तांत्रिक कायापालट करण्याचं आव्हान दिलं आहे. आम्ही भारतीयांसाठी हा कॉम्प्युटर सध्या पस्तीस डॉलर्समध्ये देता येईल असा केला आहे. मला तो दहा डॉलर्सवर आणायचा आहे. असे स्वस्त तंत्रज्ञान विद्यार्थ्यांच्या हातात असेल. आता त्याद्वारे चांगला कंटेन्ट पोहोचवण्याचे आव्हान तुम्ही स्वीकारायचे आहे.
(बोंबला) कंटेन्टच्या कमिटीवर कोण कोण घुसवायचं- तयारीला लागा मंडळी.

तरीही-
एक असा भारतीय- जो या देशात अनाथ म्हणून रस्त्यावर टाकून दिलेला... दाश दाम्पत्याने वाढवला आणि साराभाईंनी जोपासला... आज नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात प्रोफेसर एमिरेटस आहे. इन्व्हेंटर म्हणून त्याने आजवर करोडो डॉलर्स कमावले आहेत, लक्झुरी जेटचा मालक आहे-सत्तर वर्षाचा आहे. तरीही देशासाठी नवीन काही करू पहातो आहे... तो विद्यापीठात येऊन काहीतरी आत्मीयतेने सांगून गेला.
आशावाद जपून ठेवायला माणसाला एवढं पुरतं.
शिक्षणक्षेत्रातून साऱ्या सुमारपणाचा पराभव व्हायला किती काळ जाईल कोण जाणे...
पण तरीही आशा ठेवायला हरकत नाही

Thursday, August 5, 2010

बावीस वर्षांपूर्वी

बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझंच कॉलेज. एल्फिन्स्टन कॉलेज. सोसयोलॉजीच्या विभागप्रमुख बाईंना विद्यापीठातल्या आमच्या मनोरमा सावुर बाईंनी माझं नाव सुचवलं. त्यांना विभागातली लेक्चरर कन्या परीक्षेच्या ऐन मोसमात रजेवर गेल्यामुळे कुणीतरी महिनाभरासाठी हवं होतं. पेपर तपासायला, सुपरव्हिजन करायला. शिकवण्याखेरीज पडणारी कामं. पण करायलाच लागतात अशी. बाईंनी माझ्याकडे पेपरांचा गठ्ठा सरकवला. अकरावीच्या फाउंडेशन कोर्सच्या मुलांच्या उत्तरपत्रिका होत्या त्या. त्यातल्या अनेक पेपरांत काहीच लिहिलेलं नव्हतं.  काहीत जे लिहिलेलं त्याला उणे मार्क्स द्यावेत अशी स्थिती. बाईंनी मधाळ आवाजात सांगितलं. "तसंच असतं गं ते. त्यांना नापास नसतं करायचं. चाळीस-पन्नास टक्के मार्क्स देतोच आपण-"   
आपण?!
मग ते कागद पार पाडले. मग आले एस् वाय बीए च्या खुद्द सोसयोलॉजी घेतलेल्या मुलांचे पेपर्स- नव्हे कागद. त्यातल्याही अनेक पेपरांत काहीच लिहिलेलं नव्हतं. काहीत थोडं... काहीत थोडं थोडं... मी पेपर्स तपासत होते. पाचदहा जणांना शून्य... सहासात जणांना सात आठ... पंधरावीस जणांना तीन चार... असेच मार्क्स पडण्यासारखे होते. इतक्यात एक पेपर आला. त्यात काहीही गिरमिटलेलं. अक्षरं जुळवून एक शब्द काही जुळण्यासारखा नव्हता. बाई माझ्याशेजारीच पेपर तपासत बसल्या होत्या. मी वैतागून हसत म्हणाले- "आपल्याला खरंच उणे मार्क्स देता येतात का हो मॅडम? येत असतील तर या पेपरला उणे किती द्यावेत प्रश्न आहे."
 त्यांच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. ती कशासंबंधाने होती ते मला अंमळ उशीराच कळलं. त्या तशाच ओढलेल्या चेहऱ्याने म्हणाल्या... "जरा बघू ते पेपर्स... तू तपासलेले सगळेच दे."
 मग तो माझा उणे मार्क्सवाला पेपर घेऊन त्या म्हणाल्या... "अगं हा आपल्या -- सरांचा मुलगा... थांब मी बघते. यू डोन्ट वरी. "
त्यांनी माझ्या देखतच त्या पेपरवर तेहत्तीस अधिक दोन टेकवले. मी सुन्न.
मी म्हटलं... "पण मॅडम, मग या न्यायाने या शून्य मार्क्सवाल्यांना सेकंड क्लास, तीन मार्क्स वाल्यांना फर्स्ट क्लास आणि सहा-सात मार्क्सवाल्यांना डिस्टिंक्शन द्यायला लागेल."
त्यांची एक भुवई गगनात गेली आणि त्यांनी माझं प्रबोधन केलं. - "म्हणजे- द्यायचेच.  हे मी तपासत असलेले पेपर्स- म्हणजे तपासून झालेले पेपर्स पाहून घे. मी आलेच"- 
एकूण सूत्र लक्षात आलंच. त्यांनी परत येऊन हसऱ्या पण कठोर चेहऱ्याने मला सांगून टाकलं.
"अगं, आधीच विषयाला फारशी मुलं येत नाहीत... हॅहॅहॅ..."
सुपरव्हिजनच्या वेळी कॉपी करणारी तगडी मुलं पकडून दिली तेव्हा दुसऱ्या बाईंनी सांगितलं... प्रेमाने सांगितलं... "जरा जपून कराव्या हं अशा गोष्टी."
त्यानंतर ही महिनाभराची बिगार संपली. प्राचार्य घोलकर होते. त्यांनी विचारलं, "मुग्धा, महिन्याभराचा तुझा पगार मी क्लॉक अवर बेसिसवर देऊ शकतो. शासनाकडून तसा पगार यायला वेळच लागेल. तू साधारण किती तास काम केलंस ते लिहून दे बरं."
मी त्यांना सांगितलं ते मनापासून सांगितलं. "सर, कॉलेज माझंच. इथे थोडंस काम केलं त्याचे पैसे घ्यायची काही गरज नाही. मुख्य म्हणजे या महिन्याभराच्या नोकरीतून एक कळलं की मी इथेच नाही तर कुठेही सोसियोलॉजीची शिक्षक म्हणून काम करू शकणार नाही. एवढा धडा मला फार मोलाचा आहे."
मी नंतर कधीही कॉलेजमध्ये शिक्षक व्हायच्या भानगडीत पडले नाही.
पण गेल्या काही वर्षांत सोसियोलॉजीतली परिस्थिती सुधारली आहे कां नाही माहीत नाही.
आणि फाउंडेशन कोर्सचं काय? 

Thursday, July 29, 2010

रद्दीनिर्मितीचा कारखाना बंद होणार की काय?

मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंनी परवा पहिलीच विद्वत्-सभेची बैठक भरवली. त्यात अजेंड्याच्या जाडजूड छापील गट्ठ्याकडे निर्देश करीत ते म्हणाले, -हा रद्दी-प्रॉडक्शनचा प्रकार आता थांबवला जाईल. तुम्हा सर्वांना अजेंड्याची प्रत सीडीवर मिळेल. आपापले लॅपटॉप्स घेऊन, बरोबर सीडी घेऊन या. असे कागद वाया घालवणं पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य नाही, नाही कां?- बिचारे कोणीच काही बोलू शकले नाही.
बक अप वेळूकर.
काय गंमत आहे पहा. अमेरिकेत इंटरनेटचा जन्म झाला तो अमेरिकन युनिव्हर्सिटीज् आणि नासा, आर्मी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून. ते सुरू झाल्याला आता दशके लोटली. पण भारतीय विद्यापीठांमधून आयता मिळालेला इंटरनेटचा घास गिळायलाही आम्हाला कष्ट पडत होते. कॉम्प्युटरला हात लावायलाही अजून आपल्या शिक्षक-अध्यापकांना भीती वाटते. मुंबई विद्यापीठाच्या गेल्या सद्दीत तर संगणक-वापराचा आनंदच होता. मुख्य दोघांनाच ते वापरण्याची माहिती नसावी. नाही तर गोष्टी इतक्या कशा रखडू दिल्या असत्या.
एकदा एका महत्त्वाच्या अधिकाऱ्याला मी तातडीची अमुक एक गोष्ट इमेलवर पाठवते म्हटलं. तर तो बापडा म्हणाला- नाही म्हणजे हां.. हां.. हां. मी असं करतो... या इथे हे अमके बसले आहेत त्यांना सांगतो त्यांची इमेल द्यायला... माझा प्रॉब्लेम आहे जरा... नाही म्हणजे माझी इमेल आहे... पण माझी मेल इथे उघडता येत नाही.
हसून हसून फुटायची वेळ.
आमच्या या विद्यापीठाने नेट कनेक्टिव्हिटीसाठी किती पैसा दवडला, त्यातला किती कारणी आला- कुणीतरी माहितीच मागवून घ्यायला हवी. अजूनही विद्यापीठाच्या वित्त-लेखा कामांत कॉम्प्युटर फारसा असत नाही. आमच्या पगाराची स्लिप, फॉर्म 16 वगैरे हवं तर प्रत्यक्षच जावं लागतं. क्या बात है!
अहो आमचा प्रत्यक्ष संपर्कावर विश्वास आहे. सर्विस बुक्स, नेमणुकांच्या नोंदी सारं प्रत्यक्ष. स्वतः या नाहीतर प्यून पाठवा.
खेटे घाला संस्कृती टिकवण्याची घोर जबाबदारी आहे विद्यापीठ प्रशासनावर.

वेळूकर सर, बदलणार की काय हे सारं तुम्ही?

बघू या तुम्हाला किती झगडावं लागतं ते...
आपला अडाणीपणा उघड होऊ नये अशी काळजी परोपरीने घेणारे खूप लोक आहेत सर्वत्र.
बदल नको असतो तो तेवढ्याचसाठी.
त्यांच्यापासून सावध रहाण्याचीही तशी गरज नाही म्हणा.
घट्टपणे उभं रहाणारांपासून ते पळ काढतील असा अंदाज आहे.

एक नवीन पाऊल उचललं जात असल्याचा मनापासून आनंद आहे...

Wednesday, July 28, 2010

वाईट शिक्षकांची अडगळ जुनीच.

नेमाडे सरांची हिंदू जगण्याची समृध्द अडगळ वाचायला घेतली आहे. माझ्याच विभागाने चालवलेल्या पुरातत्वाच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमात मीच या वर्षी दाखल झाले असल्याने वाचायला आणखी मजा येते आहे. खंडेराव- चुकलं- नेमाडे सर स्वतः डेक्कन कॉलेजमधून एम् ए करत होते असं जामखेडकर सरांनी संगितलं.
मग विषय हिंदूवरून डेक्कन कॉलेजच्या जुन्या दिवसांवर सरकला. नेमाडे सरांनी इंग्रजीतून एम्ए केलेलं माहीत होतं. डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी लिंग्विस्टिक्समध्ये एम्ए करायला घेतलेलं... जामखेडकर सरांनीही.- आणि मग त्यांच्या सरांनी त्यांची कत्तल केली. सर्वांनाच कमी मार्क्स दिले. हाइयेस्ट मार्क्स म्हणजे दोनशेपैकी सत्तर. पासापुरते. म्हणजे वर्गातला एकच विद्यार्थी पास. बाकी कत्ले आम. सर सांगत राहिले- हे त्यांचे शिक्षक फ्रान्सहून डॉक्टरेट करून आले होते. एका बहुत बड्या फ्रेंच लिंग्विस्टचे विद्यार्थी म्हणून त्यांचा दबदबा होता. तो दबदबाच तेवढा. शिकवण्याच्या नावाने शून्य. ते वर्गात काहीच धड शिकवायचे नाहीत. विद्यार्थी म्हणजे कःपदार्थ. त्यांनी तयार केलेला सिलॅबसही गोंधळाचाच होता. छळ. जामखेडकर सर, नेमाडे सर आता सत्तरी ओलांडलेले. त्यांचा एम्ए चा काळ म्हणजे ते विशीतले असतील. पन्नास वर्षे उलटून गेली. पण...
अजूनही कित्येक विद्वत्तेचा दबदबा असलेले शिक्षक मुलांवर सूड काढल्यासारखे शिकवतातच. आणि त्यांचे मूल्यमापन करण्याची कोणतीही पद्धत, त्यांच्याबद्दलचे विद्यार्थ्यांचे मत लक्षात घेऊन त्याला बदलायला भाग पाडण्याचा कोणताही मार्ग अजूनही निघालेला नाही.
असे शिक्षक ज्यांच्या वाटेला येतात ते विद्यार्थी गप्प रहातील, त्यांचे सहशिक्षक नुसते पहात रहातील तोवर हे बदलणारही नाही.