कॅलिफोर्निया विद्यापीठामधील भौतिकशास्त्राचे प्रोफेसर एमिरेटस असलेले, अमेरिकन विज्ञान-तंत्रज्ञान जगतात अनेक प्रकारे महत्त्वाच्या भूमिका बजावलेले प्रा. डॉ. हेरॉल्ड लुविस यांनी नुकताच अमेरिकन फिझिकल सोसायटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याचे पत्र मोठे वाचनीय आहे. सध्याच्या मानवनिर्मित वातावरण बदल आणि जागतिक तापमानवृध्दीच्या सद्दीच्या काळात तथाकथित कन्सेन्ससचा बोलबाला एवढा असताना असले पत्र एखाद्या वैज्ञानिकाने लिहिले आहे हे लोकांच्या नजरेस आणून देणे मला महत्त्वाचे वाटते.
डॉ. लुविसचे पत्र विज्ञानाच्या सर्व पाईकांनाच नव्हे तर ज्ञान आणि सत्याशी निष्ठा असलेल्या सर्वच क्षेत्रांतील लोकांना मननीय वाटेल. त्या पत्राचा अनुवाद पुढे देत आहे.
- प्रिय कर्ट,
सदुसष्ट वर्षांपूर्वी मी जेव्हा प्रथम अमेरिकन फिजिकल सोसायटीचा सदस्य झालो तेव्हा ती अगदी छोटीशी, सौम्य संघटना होती- तोपर्यंत पैशाच्या महापुरात न्हाऊन भ्रष्ट झालेली नव्हती. ड्वाईट आयझेन हॉवरने अर्धशतकापूर्वी आपल्याला या धोक्याबाबत सावध करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तर भौतिकशास्त्र हा विषय निवडून आयुष्याचा मार्गक्रम ठरवणे म्हणजे दारिद्र्याचा, सततच्या अभावाचा वसा घेतल्याचेच लक्षण ठरत होते. दुसऱ्या महायुध्दानंतर हे सारे बदलले. त्यानंतर चांगले उपजीविकेचे साधन मिळवण्याचा एक मार्ग म्हणून अनेकजण भौतिकशास्त्राच्या अभ्यासात शिरले. अगदी अलिकडे, म्हणजे पस्तीस वर्षांपूर्वी विज्ञान आणि समाजातील एक सामाईक चिंतेचा विषय म्हणून अणुभट्टीच्या सुरक्षा अभ्यासासाठी स्थापन झालेल्या अमेरिकन फिझिकल सोसायटीच्या समितीचा मी अध्यक्ष होतो तेव्हाही, बाहेर या विषयावरून झोंडगिरी करणारे अनेक लोक होते, पण आम्हा भौतिकशास्त्रज्ञांवर प्रमाणाबाहेर दबाव पडण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे जी परिस्थिती आहे तिचे वैज्ञानिक निकषांवर प्रामाणिकपणे मूल्यांकन करणे आम्हाला शक्य झाले. आमच्या कामात काही गोष्टींकडे दुर्लक्ष झालेच तर ते तपासून पहायला आणखी एक ओव्हरसाइट कमिटी होती. त्यात असलेले पिएफ पानोफ्स्की, व्हिकी वाइसकॉफ, आणि हॅन्स बेथ यांच्यासारखे उत्तुंग भौतिकशास्त्रज्ञ आमच्या कामात सहाय्यभूत होते. एका भारलेल्या वातावरणात आम्ही जे काम पार पाडले त्याचा मला अतिशय अभिमान वाटला होता. एपीएसच्या अध्यक्षांना दिलेल्या अहवालात ओव्हरसाइट कमिटीने आम्ही ज्या स्वतंत्र बाण्याने काम केले त्याची नोंद घेतली होती. या अहवालावर दोन्ही बाजूंकडून टीका होईल असेही त्यांनी म्हटले होते. यापेक्षा मोठा गौरव कोणता असणार?
आज किती वेगळे चित्र दिसते आहे. असे उत्तुंग मानव या पृथ्वीवर वावरतच नाहीत, आणि पैशाचा महापूर हेच साऱ्या भौतिक-संशोधनाचे, इतर अनेक गोष्टींचे आणि अनगिनत व्यावसायिक नोकऱ्यांचे उगमस्थान ठरते आहे. मी माझी कारणे स्पष्ट करतोच आहे, त्या कारणांमुळे एपीएसचा फेलो असण्यातला माझा इतके वर्षांचा अभिमान आता गळून जाऊन त्याची जागा शरमेने घेतली आहे. मला यात यत्किंचितही आनंद नाही, पण आणि मला या सोसायटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा तुझ्याकडे पाठवून देणे भाग आहे.
आज इतके सारे वैज्ञानिक भ्रष्ट होण्यास आणि एपीएससुध्दा ज्या लाटेत वाहवली आहे त्याला कारण आहे ग्लोबल वॉर्मिंग स्कॅम आणि त्याला पाठबळ देणारा अक्षरशः अब्जावधी डॉलर्सचा महापूर. भौतिकशास्त्रज्ञ म्हणून मी प्रदीर्घकाळ काम केले आहे, त्यात पाहिलेला असला स्यूडोसायन्टिफिक- (छद्मवैज्ञानिक) बनाव केवळ एकमेवाद्वितीय असाच म्हणेन. आणि त्याला केवढे प्रचंड यश मिळाले आहे... ज्या कुणाला याबद्दल थोडीजरी शंका असे त्याने मांडी ठोकून क्लायमेटगेटची सर्व कागदपत्रे वाचायलाच हवीत. सारे काही उघड होते. मॉन्टफोर्डच्या पुस्तकात सारे काही संगतवार मांडलेले आहे. माझा असा ठाम विश्वास आहे की कोणताही सच्चा भौतिकशास्त्रज्ञ- नव्हे तर कोणताही सच्चा वैज्ञानिक हे वाचून घृणेने भरून जाईल. मी तर वैज्ञानिकांची नवी व्याख्याच या घृणेच्या आधारे करू शकेन.
मग या आव्हानाच्या संदर्भात एपीएसने काय केले आहे? त्यांनी हा भ्रष्टाचार सर्वसाधारण मूल्य म्हणून मान्य करून टाकला आहे. उदाहरणार्थ-
1- साधारण एक वर्षापूर्वी आमच्यपैकी काही जणांनी काही सदस्यांना या विषयावर एक इमेल पाठवली. एपीएसने त्यात छेडलेल्या विषयांकडे दुर्लक्ष केले, पण एपीएसच्या अध्यक्षांनी आम्ही हे इमेल पत्ते कुठून मिळवले याची कुटील चौकशी सुरू केली. पूर्वी, एपीएस अशा महत्त्वाच्या विषयांवर सदस्यांनी आपापसात चर्चा करावी म्हणून उत्तेजन देत असे. किंबहुना सोसायटीच्या घटनेत हा एक प्रमुख हेतू मानला गेला आहे. आता नाही. गेल्या वर्षभरात जे काही झाले ते चर्चा बंद व्हावी याच दृष्टीने करण्यात आले होते.
2- अनेकांचा विरोध असूनही क्लायमेट चेंजच्या बाजूने जे विधान एपीएसने प्रसृत केले ते अत्यंत घाईघाईने, मोजक्या लोकांना लंचला बोलावून लिहून टाकलेले होते. मी अनेक सदस्यांना ओळखतो, त्यांच्याशी बोलतो, अशा एपीएसच्या सदस्यांच्या विचक्षणेचे त्यात कुठेही प्रतिबिंब नाही. त्यातील काही जणांनी कौन्सिलकडे या मतप्रदर्शनाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली. या मतप्रदर्शनातील एक अगदी (अव)लक्षणीय शब्द होता- विज्ञानाच्या दृष्टीने विषारीच- वादातीत सत्य. हा शब्द भौतिकशास्त्रातील अत्यंत नेमक्या बाबींना लागू होतो. या विषयाला तर नक्कीच नाही. ही मागणी होताच एपीएसने एका गुप्त समितीची स्थापना केली. तिची बैठक कधीच झाली नाही, त्यांनी या भूमिकेच्या विरुध्द असलेल्या स्केप्टिक्सना बोलावून कधीही चर्चा केली नाही- आणि तरीही आधीचे विधान संपूर्णतः योग्य असल्याचा निर्वाळा देऊन टाकला. त्या विधानाचा सूर जरा नको इतका तीव्र आहे एवढेच त्यांनी मान्य केले. कुणाचाही आग्रह नसताना वादातीत सत्य हा शब्दही पुराव्यांच्या संदर्भात तसाच ठेवला. अखेरीस, कौन्सिलने संपूर्ण विधान होते तसेच ठेवले केवळ त्यात काही अनिश्चितता असल्याचे नमूद केले आणि मग त्या अनिश्चितता मागे सारून मुख्य विधानाला सरसकट मान्यता देण्यासाठी शब्दबंबाळ स्पष्टीकरणांची भर घातली. ते विधान अजूनही एपीएसची अधिकृत भूमिका म्हणून तसेच विराजमान आहे. त्यात जगभरातील सर्व शासनांना दिलेला सल्ला एपीएसचा बडेजाव माजवणारा आहेच पण गाढवपणाचाही आहे... जणू काही एपीएस म्हणजे कोणी विश्वनियंता आहे- मास्टर ऑफ द युनिव्हर्स. असे नाही... आणि आपली नेते मंडळी असे मानतात याची मला लाजच वाटते. हा काही करमणुकीचा खेळ नाही. आपल्या राष्ट्रीय अस्तित्वाचा प्रश्न यात गुंतलेला आहे, वैज्ञानिकांची संस्था म्हणून आपली प्रतिष्ठा कसोटीला लागते आहे.
3- आणि मग दरम्यान क्लायमेटगेट घोटाळा बातम्यांतून चव्हाट्यावर आला. प्रमुख भयकंपवाद्यांची कारस्थाने जगापुढे आली. एवढ्या प्रचंड प्रमाणावरचा वैज्ञानिक घोटाळा मी कधी पाहिला नव्हता आणि त्याचे वर्णन करण्यासाठी मला शब्द सुचत नाहीत. एपीएसच्या भूमिकेवर याच काही परिणाम दिसावा- काहीही नाही. काहीच नाही. हे विज्ञान निश्चितच नाही. काही वेगळ्याच शक्ती यात कार्यरत आहेत.
4- मग आम्ही काही जणांनी या मध्ये थोडा वैज्ञानिक विचार पुन्हा जागवण्याचा प्रयत्न केला... कारण अखेर एपीएसचा कथित आणि ऐतिहासिक हेतू तोच तर आहे. आम्ही आवश्यक त्या- म्हणजे 200 हून अधिक सह्या गोळा केल्या आणि कौन्सिलने क्लायमेट सायन्सवर, त्यातील वैज्ञानिक मुद्द्यावर खुली चर्चा करण्यासाठी टॉपिकल ग्रुप करावा अशा प्रस्ताव ठेवला. यामुळे भौतिकशास्त्रातील खुल्या चर्चेची गौरवशाली परंपरा जपली जणार होती, राष्ट्राच्या दृष्टीनेही हे महत्त्वाचे योगदान ठरले असते. तुम्ही आम्हाला एपीएसच्या सदस्यांची यादी देण्यास नकार दिल्यामुळे या 200 सह्या गोळा करणं जरा अवघड गेलं हे मी नमूद करू इच्छितो. एपीएसच्या घटनेनुसार सर्व नियमांची परिपूर्ती करून, आमचा हेतू विस्ताराने स्पष्ट करून हा विषय खुल्या चर्चेसाठी यावा म्हणून आम्ही प्रयत्न केले.
5- आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला, घटना गेली खड्ड्यात, तुम्ही आमचा अर्ज स्वीकारायलाच नकार दिलात. त्याऐवजी स्वतःच्या ताब्यात असलेल्या पत्त्यांच्या जोरावर क्लायमेट चेंज आणि पर्यावरणावरील टॉपिकल ग्रुपमध्ये सदस्यांना किती रस आहे याची पडताळणी करण्याचा तुम्ही सुरुवात केलीत. विषय न देता असा ग्रुप करण्याचा प्रस्ताव करण्यात किती जणांना रस आहे असे तुम्ही विचारलेत. तरीही अनेकांनी होकार दिला.(तुम्ही सेक्सबद्दल विचारणा केली असती तर तुम्हाला अधिकच प्रतिसाद मिळाला असता) अर्थातच पुढे असे काहीही झाले नाही. त्यानंतर तुम्ही पर्यावरणाचा भागच वगळलात आणि आता सारे प्रकरण ठप्प आहे. एखादा साधा वकीलही तुम्हाला सांगेल की विषय स्पष्ट न करता अर्जी भरली आणि नंतर रिकाम्या जागा भरू म्हणून सांगितले तर त्यावर कोणीही सह्या करीत नाही. हे सारे करण्यामागचा तुमचा एकच हेतू होता, तो म्हणजे आमचा प्रस्ताव कौन्सिलपुढे नेण्याची घटनात्मक जबाबदारी टाळणे.
6- आमच्या कायदेशीर विनंतीकडे दुर्लक्ष करून स्वतःचा टॉपिकल ग्रुप करण्यासाठी आता तुम्ही आणखी एक गुप्त आणि निष्क्रीय समिती स्थापन करून ठेवली आहे.
क्लायमेट चेंजच्या संदर्भात केलेले दावे तावून सुलाखून घेण्याच्या दृष्टीने काहीही गंभीर स्वरूपाची अभ्यस्त चर्चा घडूच नये म्हणून एपीएसच्या व्यवस्थापनाने सुरुवातीपासूनच हा प्रश्न झुलवत ठेवला आहे. या संघटनेवरील माझा विश्वास उडाला याचे तुला नवल वाटते कां?
इथे मला एक गोष्ट मुद्दाम नोंदून ठेवण्याची गरज वाटते, कारण इतरांच्या अंतस्थ हेतूंची चर्चा करण्यात जरा धोकाच असतो. एपीएसमधील ही कारस्थाने इतकी विचित्र वाटतात की त्याचे सरळसोपे स्पष्टीकरण देणे कठीण आहे. कुणी म्हणतात, आजकालचे भौतिकशास्त्रज्ञ पूर्वीच्यांइतके हुषार नाहीत, पण तसे काही मला वाटत नाही. मला वाटते, अर्धशतकापूर्वी आयझेनहॉवरने म्हटल्याप्रमाणे, याचे मूळ कारण पैसा हेच आहे... या विषयात अब्जावधी डॉलर्सच्या सोबतीनेच प्रसिध्दी आणि चकचकाटही आहे. शिवाय सुंदर, निसर्गरम्य बेटांना भेटी देण्याची संधीही या क्लबच्या सदस्यांना सहजच चालून येते. जर ग्लोबल वॉर्मिंगचा फुगा अचानक फुटला तर, तू अध्यक्ष असलेला तुझा स्वतःचा भौतिकशास्त्र विभाग वर्षाकाठी काही दशलक्ष डॉलर्सना मुकेल. माइक मानच्या गैरवैज्ञानिक वर्तणुकीला माफी देताना पेनसिल्वेनिया स्टेट विद्यापीठाने किंवा फिल जोन्सला माफ करून टाकणाऱ्या इस्ट अँग्लिया विद्यापीठाने या गोष्टींचा विचार केला असणारच. वेगळा निर्णय घेतला असता तर त्याचा आर्थिक भुर्दंड किती पडला असता याचे त्यांना भान नव्हते थोडेच. जुनी म्हण आहे आपली- वारा कुठल्या दिशेने वाहतो हे कळायला तुम्ही काही हवामानतज्ज्ञ असण्याची गरज नसते.
मी काही तत्वज्ञानी नाही, त्यामुळे आपला बृहद्स्वार्थ साधण्याची आंस आणि भ्रष्टाचार यातील अंतर कुठे ओलांडले जाते याचा काही मी विश्लेषक होऊ शकत नाही, पण क्लायमेटगेटबद्दल जी काही कागदपत्रे उपलब्ध आहेत ती वाचून एवढे तर निश्चितच स्पष्ट होते की आता या विषयाचे स्वरुप ऍकेडेमिक राहिलेले नाही.
मला यात कोणत्याही प्रकारे सहभागी व्हायचे नाही, त्यामुळे माझा राजीनामा स्वीकार. आशा आहे की आपण अजूनही मित्र आहोत.
हॅल
हे पत्र वाचल्यानंतर, आपल्या जगाची काळजी वाटणाऱ्या, आणि त्या दृष्टीने जबाबदार वर्तन करण्याची गरज वाटणाऱ्या प्रत्येकाला या क्षेत्रातील सर्वच प्रचाराबाबत बुध्दीच्या निकषांवर विचार करावा अशी इच्छा व्हावी. पैशाच्या महापुरात वाहून जाणे ही भ्रष्टता असेल पण भावनेच्या महापुरात तर्कबुध्दी गमावणे ही त्यापेक्षाही महाग पडणारी चूक ठरू शकेल.
No comments:
Post a Comment