Friday, October 22, 2010

आशा करावी?

हास्यास्पद म्हणावे की करुणास्पद असा प्रश्न आहे.
आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर घराणेशाहीची झूल चढवण्यासाठी सच अ लॉन्ग जर्नी या पुस्तकाच्या विथड्रॉवलच्या खेळीचा उपयोग करून घेण्यात आला. दसऱ्याला युवराज्याभिषेक पार पडल्याने सेना परिवाराचे घोडे गंगेत न्हाले आहे. त्यांना त्यात तसा फारसा रस राहिला असण्याचे कारण नाही. पण बुध्दीजीवींच्या क्षेत्रात ढवळाढवळ केल्यानंतर थोडे कवित्व करावे लागणारच. त्यामुळे काही चॅनेल्सवर डबेवाल्या काकांची मुलाखत वगैरे वाजवण्यात आली. सामनानेही लिहिले की कसा यात डबेवाल्यांच्या अस्मितेवर वार करण्यात आला... वगैरे. (या कादंबरीतील एक मॅड बावा पात्र आपल्या ट्रेनच्या प्रवासातला एका डबेवाल्याच्या घामात भिजण्याचा अनुभव सांगते हा त्याचा संदर्भ.) या कादंबरीवर एकंदर अपात्र लोकांनी भरपूर चर्चा केली. असल्याच लोकांनी याचा इश्यू करून विद्यापीठात तोडफोड केली असती, मालमत्तेचे नुकसान केले असते या भीतीनेच केवळ कादंबरी मागे घेतली असेल तर ते बऱ्याच अंशी समजून घेण्यासारखे आहे. आम्हाला एकेक वस्तू मिळवण्यासाठी इतका त्रास पडतो, मान्यता आहे, टेंडर आहे, कोटेशन आहे, पर्चेस कमिटी आहे, टेबलाटेबलांवर अडून रहाणे आहे,चेक काढण्यासाठी विनवण्या आहेत... त्या वस्तू कोणी माथेफिरूंनी फोडूनबिडून टाकल्या तर आम्हाला चांगलेच वाईट वाटले असते.

रोहिंटन मिस्त्रींना काय त्याचे? कॅनडात बसून...

त्यामुळे विद्यापीठाची स्वायत्तता- ऍट व्हॉट कॉस्ट असा प्रश्न आम्हा कुणाला पडला तर समजून घ्यावे अशीच परिस्थिती आहे. अखेर हे पुस्तक सिलॅबसमध्ये काढल्यामुळे खूप विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी, मित्रांनी वाचले हा एक साईड इफेक्ट किती महत्त्वाचा आहे पहा. (मी आणि माझ्या चार मित्रमैत्रिणींनी हे पुस्तक कधीही वाचायची सुतराम शक्यता नव्हती. ते काढून टाकण्याची मागणी होताच आम्ही सर्वांनी ते मिळवून वाचले, बा(ळा) उगवत्या सूर्या, लक्षात घे.)
यात शिव्या आहेत म्हणून ते विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणार नाही असे बाकी कोणीही सांगितले तर एक वेळ- जाऊ दे, जुनी बाळबोध माणसं आहेत- असं म्हणून ऐकून घेतलं असतं. बाळासाहेबांच्या पुत्रपौत्रांनी, सैनिकांनी हे म्हटले म्हणून प्रश्न पडला- हे हास्यास्पद म्हणावे की करूणास्पद?
आता या पुस्तकाच्या शिळ्या कढीला ऊत आणून आमच्या विद्यापीठात आणि विद्यापीठ परिघावर बुध्दीवादी राजकारणाचा वास परमाळतो आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दोनदा अरूण टिकेकरांनी, मिररमध्ये एकदा शांता गोखले यांनी लिहिल्यानंतर बऱ्याच लोकांना या इश्यूत आपली साधने परजून घ्यायची संधी दिसली आहे. तर विद्या'पिटा'तील काही संत(!) प्रवृत्तीच्या लोकांना आपसातले काही हिशेब चुकते करता येतील कां या संदर्भातील संधी दिसू लागल्या आहेत.
विद्यापीठात इंग्लिश विभागात असलेल्या प्रा.डॉ. निलूफर भरूचा या बोर्ड ऑफ स्टडीजवर होत्या त्या काळात त्यांच्या सूचनेवरून हे पुस्तक अभ्यासाला लावले होते आणि त्या भीतीने आता लपून बसल्या आहेत आणि परदेशी पळून गेल्या आहेत अशी बातमी आजच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये लागली आहे. ही बातमी विद्यापीठीय राजकारणाच्या गटारगंगेतल्याच कुणीतरी पेरली आहे हे निःसंशय.
प्रा. डॉ. निलूफर भरूचा या आंतरराष्ट्रीय इंग्रजी साहित्यक्षेत्रात नामवंत विदुषी म्हणून प्रसिध्द आहेत. इथल्या अनेकांना हे कदाचित् माहीत नसेल, परंतु त्या नोबेल पारितोषिक समितीवरही होत्या, कॉमनवेल्थ पुरस्कार समितीवरही होत्या आणि आहेत. जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, इंग्लंड, अमेरिका या देशांतील विविध विद्यापीठांकडून त्यांना सातत्याने निमंत्रणे येत असतात. आपल्याला एखादे आमंत्रण मिळवायचे तर कितीतरी क्लृप्त्या कराव्या लागतात याची जाणीव असलेल्या, स्वतःच्या थिटेपणाची जाणीव असलेल्या त्यांच्याच क्षेत्रातील एखाद्या लिलिपुटला त्यांच्या उंचीचा मत्सर असणे स्वाभाविक आहे. लोकशाही तत्वांमुळे कमी क्षमता असूनही ज्यांना पदे मिळाली, संधी मिळाली असे अनेक लिलिपुट्स् संधीचा लाभ घेऊन खरोखरीच वाढण्यापेक्षा इतरांची उंची त्यांचे पाय कापून काढून कशी कमी करता येईल याचाच विचार करीत असतात हे काय आम्हाला माहीत नाही...
निलूफर भरूचा हे सारे नाटक घडत असताना कॅम्पसवर होत्या, रोज संध्याकाळी चालण्याचा व्यायाम घ्यायला जात होत्या ते काय त्या घाबरल्या होत्या म्हणून की काय... त्या जर्मनीला गेल्या आहेत ही बातमी छापवून आणण्यामागे कुहेतूच आहे. विद्यापीठात एक नियम(अनेक कायदे आणि नियम गाढव असतात तसाच) आहे- कुलगुरूंची परवानगी न घेता विद्यापीठातील कुणी अगदी हनीमूनला सुध्दा परदेशी जाऊ शकत नाही. याच नियमाचा गैरआग्रह धरून नकळत किंवा वैयक्तिक कामामुळे परदेशी गेलेल्या लोकांनाही त्रास देण्याचे कार्यक्रम विद्यापीठाच्या भूतकाळात अनेकदा पार पडले आहेत.
भरुचाबाई या कादंबरीच्या संदर्भात कुलगुरूंना काही गोष्टी स्पष्ट सांगून आल्याचे त्यांनीच स्वतः मला सांगितले होते. ही गोष्ट आणखी ज्यांना माहीत झाली अशाच कोणीतरी ही बातमी छापवून आणण्याचा उद्योग केला हे स्पष्ट आहे.
अर्थात्, डॉ. भरुचा यांनी माझ्या मते एक मोठी चूक केली आहे ती म्हणजे, या विषयासंबंधात त्यांनी आपली भूमिका सडेतोडपणे, जाहीरपणे मांडली नाही. आपल्याला काय करायचे आहे- या विद्यापीठासाठी आता काहीही करण्याची माझी इच्छा उरली नाही, बाकी कोणी बोलत नसताना मीच काय म्हणून बोलू वगैरे कारणांनी त्यांनी जाहीर भूमिका घेतली नाही. विद्यावंतांच्या निष्क्रीय सौजन्याचेच हे उदाहरण ठरते. एक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विदुषी म्हणून त्यांनी आपली भूमिका ठणकावून मांडणे महत्त्वाचे ठरले असते. जे टिकेकरांनी, शांता गोखल्यांनी लिहिले ते त्यांनी लिहिले असते, मांडले असते, तर या विद्यापीठाच्या स्वतंत्र अस्मितेची शान वाढली असती. अजूनही वेळ गेलेली नाही, आपल्या कोषातून बाहेर पडून डॉ. भरूचांच्या क्षमतेच्या विद्यापीठातील विद्वानांनी आपली निष्ठा केवळ नोकरीशी नसून, उच्चपदस्थांशी नसून विद्येशी आणि निगडीत मूल्यांशी आहे हे दाखवून दिले पाहिजे.
या विषयाची चर्चा बातमी छापून येण्या अगोदर, विद्याक्षेत्रातील राजकारणाचे आणखी एक आगर म्हणजे एशियाटिक लायब्ररी येथे आधीच सुरू झाली होती असे माझ्या निदर्शनास आले आहे. ती चर्चा झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी बातमी छापून आली हेही पुरेसे बोलके आहे. कसले हे विद्याक्षेत्र- जेथे राजकारणक्षेत्रापेक्षा घाणेरडे आणि नीच राजकारण खेळले जाते.

तापल्या तव्यावर आपल्याही असूयेची पोळी भाजून घ्यायचा हा घाणेरडा प्रकार आहे.

दुसरी गोष्ट लिहायची आहे ती या सर्व विषयाबद्दल लिहिणाऱ्या अरूण टिकेकरांबद्दल. लोकसत्ताच्या संपादकपदी असताना सर्वकाळ बाळासाहेब ठाकऱ्यांवर टीका करण्याच्या भानगडीत पडणे टाळणाऱ्या टिकेकरांनी एकदम जोरदार पवित्रा घ्यावा हे निश्चितच गौरवास्पद आहे. विद्यापीठाचे इतिहासकार म्हणून त्यांनी या घटनेसंबंधी मत नोंदले हे महत्त्वाचे ठरते यात वादच नाही. पण सेनेपासून आपली चामडी आपणही वाचवत होतो हे विसरून, वेळूकरांनी स्वतःची चामडी वाचवायचा प्रयत्न केला तर त्यांची चामडी मात्र तुम्ही तुमच्या लेखणीने लोळवणार हे कसे. वेळूकरांचे इंग्रजी तेवढेसे कसलेले नाही याचा उल्लेख - मी नागपूर विद्यापीठाचा अल्मा मॅटर आहे असे चुकीचे इंग्रजी ते बोलल्याचे लिहून त्यांच्याबद्दलच्या कुलगुरू म्हणून असलेल्या अपेक्षांच्या चिंधड्या उडाल्याचे ते लिहितात. भाषेवर प्रभुत्व नसले, किंवा साहित्य वाचन, व्यासंग कमी असला म्हणजे कुलगुरू काहीही करू शकणार नाही असे म्हणणे हे व्यवस्थापकीय अपरिपक्वतेचे लक्षण आहे. आपली इतिहासकार-मती तोकडी असल्याचे लक्षण आहे. चारचौघात दुसऱ्याची चूक दाखवली म्हणजे आपण विद्वान ठरतो असे समजण्याची कोती वृत्ती असल्याचे लक्षण आहे.
सच अ लॉन्ग जर्नी हे पुस्तक विथड्रॉ करून नव्या कुलगुरूंनी एक चूक निश्चितच केली असे माझेही मत आहे. परंतु विद्यापीठात करण्यासारखी विद्यार्थीहिताच्या, प्रशासकीय सुधारणांची भरपूर कामे आहेत. ती जरी स्वच्छपणे केली तरी खूप. आणि विद्येशी निष्ठा दाखवणाऱ्या, भले आपल्याशी दुमत असलेल्या विद्वानांचा सन्मान ठेवला तरी खूप.
मी आधीच्या पोस्टमध्ये म्हटले होतेच. सच अ लॉन्ग जर्नी ही काही फार मातब्बर लेखन असलेली कादंबरी मला वाटलीच नाही. त्या कांदबरीच्या भोवतीने पिंगा घालण्याचे तसे काहीच कारण नाही. त्यातील उतारे वाचून दाखवणे वगैरे फालतू ड्रामा अस्थानी आहे. पण आमच्या स्वतंत्र वृत्तीचा अधिक्षेप करण्यास कोणीही धजावू नये अशी काळजी आम्हा सर्वांसकट कुलगुरूंनी घेतलीच पाहिजे. एका चुकीवरून पुढचा धडा शिकणाराच मोठा होतो.
अजूनही आम्हाला आशा आहे....!

No comments:

Post a Comment