बऱ्याच दिवसांत माझे विद्यापीठचा ब्लॉग लिहिला नव्हता. मध्यंतरीच्या काळात सच अ लॉन्ग जर्नी या रोहिन्टन मिस्त्रींच्या पुस्तकावरून नव्या कुलगुरूंनी शिवसेनेच्या दबावापुढे नमतं घेऊन ते ताबडतोब, तडकाफडकी अभ्यासक्रमातून वगळलं म्हणून विद्यापीठाबद्दल, कुलगुरूंबद्दल बातम्या छापून आल्या. अशा पध्दतीने पुस्तक वगळल्याबद्दल विद्वत्क्षेत्रात केवळ अरूण टिकेकरांनीच तेवढा टाईम्स ऑफ इंडियामधून लेख लिहिला. दुसऱ्याच दिवशी आयबीएन लोकमतच्या चॅनेलवर त्याबद्दल चर्चा झाली.
त्यात भाग घेणाऱ्यांत विद्यापीठातील इंग्लिश विभागाचे कोणीच नव्हते.
विद्यापीठाच्या कुलगुरूंनी अशा प्रकारे पुढाकार घेऊन एक पुस्तक अचानक अभ्यासक्रमातून मागे घ्यावे हा खरोखरच चुकीचा निर्णय होता. त्याबद्दल अर्थातच सर्वत्र चर्चा होती. पण शिवसेनेच्या गुंडगिरीचे भय सर्वांच्याच मनात इतके घट्ट आहे की त्यापेक्षा होते आहे ते होऊ दे असाच पवित्रा सर्वांनी घेतला. यात विद्यापीठाच्या मालमत्तेचे नुकसान होईल, आपल्याला घेराव, मारहाण वगैरे होईल ही भीती होतीच.
शिवाय अनुनयात्मक निर्णय कुलगुरूंनी घेतलेला असल्याने आपण केवळ गप्प बसायचे पण खाजगीत मात्र त्यांच्या अपरिपक्वतेबद्दल, नेभळटपणाबद्दल, अविद्वत् वर्तणुकीबद्दल चर्चा करायची. एवढे करून आम्हाला आमची इंटेलेक्चुऍलिटीची झूल कशी मस्त अबाधित पांघरता आली.
बोर्ड ऑफ स्टडीज्च्या ज्या सदस्यांनी हे पुस्तक अभ्यासक्रमास लावले होते त्यापैकी एकही व्यक्ती त्याच्या बाजूने ठामपणे उभी रहायला धजावली नाही. ते काम नव्या कुलगुरूंनी करायला हवे होते ही त्यांची अपेक्षा होती. ती रास्तच होती. पण त्यांनी स्वतःच्या बुध्दीची, अभिव्यक्ती स्वातंत्र्यनिष्ठेची प्रखरता शिवसेनेच्या समोर सोडा नव्या कुलगुरूंच्या समोर तरी दाखवून दिली कां याचे उत्तर दुर्दैवाने नकारात्मक होते.
नवे कुलगुरू आधीच अदासावंतांच्या अदावतीमुळे आणि अदालतबाजीमुळे जरा अडचणीतच आहेत. त्यांना हे नवीन झेंगट नकोच वाटले असणार. तरीही अशा कसोटीच्या प्रसंगीच कसोटीला उतरण्याची गरज असते हे त्यांनी आता तरी लक्षात ठेवावे. आणि अखेर भिऊन घाबरून काय झाले... शिवसेनेला सांभाळले, त्यांच्या उगवत्या सूर्याला सांभाळले आणि त्यांना 'पदो'पदी ज्यांचा आधार लागेल त्या सत्ताधारी पक्षांच्या लोकांची जोरदार टीका- जाहीर टीका त्यांनी ओढवून घेतली आहे.
मुंबई विद्यापीठात ही कादंबरी ती 2007पासून बीएच्या अभ्यासासाठी लावलेली होती आणि आत्ता त्या सिलॅबसचे अखेरचे वर्ष, अखेरच्या टप्प्यात होते. 1991साली प्रसिध्द झालेली, विदेशात आणि भारतीय विद्वत्-क्षेत्रात गाजलेली ही कादंबरी अचानक आत्ता आक्षेपार्ह कां ठरली?
आमच्या काही भो भो संस्कृतीरक्षक, मर्यादित वाचन आणि मर्यादित बौध्दिक आवाका असलेल्या मित्रांना शिव्यायुक्त वाङ्मय म्हणजे नाके मुरडण्यासारखेच वाटते.
बाळासाहेब ठाकरेंना त्यात शिव्या घातल्या आहेत हे निमित्त करून शिवसेनेच्या एखाद्या तरूण नेत्याला यात स्वतःला मोठं करण्याची संधी मिळाली म्हणून त्यांनी हा इश्यू उचलला हे आपल्या या गचाळ राजकीय-सामाजिक संस्कृतीत अगदी अपेक्षित आणि समजून घेण्यासारखेच, साजेसेच आहे.
बोर्ड ऑफ स्टडीज् मधलं स्थान आणि राजकारण हा शैक्षणिक कर्तबगारीचा सर्वोच्चबिंदू मानणाऱ्या काही ऍक्टिव्ह ऍकेडेमिशियन्सकडूनसुध्दा हीच अपेक्षा होती. या कादंबरीत अशा शिव्या आहेत- काय हे... काय हे... शांतम् पापम् वगैरे रान उठवण्याची सुरुवात असल्याच एका शिक्षकाने केली.
ज्या प्रकारच्या लोकांनी हा इश्यू उचलला, त्यांची नैतिकता आणि बुध्दी यांच्या मर्यादा आपल्याला माहीत आहेत. स्वाभाविकच विकतचे दुखणे कोणालाही नको. आम्ही ऍकेडेमिक्स तर बोटचेपेपणात नंबर एक. आम्ही कणखरपणे उभे रहाणार? झालंच!
आम्हाला कधी प्रॉपर्टीचे नुकसान होण्याची भीती वाटणार, कधी आपल्यावर कोणी हल्ला करेल याची, कधी आपल्या तोंडाला कुणी काळं फासेल याची...
आपल्याला सेन्सॉरशिप नको... अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे. पण सारे कसे सहज अलगद तोंडात साखरभरला गुलाबजाम पडावा तसे. आपल्याला विचार प्रवर्तक लेखन हवे, पण त्याच्या संरक्षणासाठी आपण बोटही वर करणार नाही. लागलीच गुडघे टेकून पुस्तक विथड्रॉ करण्याचा निर्णय घेण्यात सारेच पुढे. कोणीही हुं म्हणायला तयार नाही. वैचारिकतेचा बळी पडला तरी चालेल, आपण आपले सुरक्षित राहिलो म्हणजे झाले.
बुकर अवॉर्डसाठी नामांकन झालेली आणि कॉमनवेल्थ अवॉर्ड मिळालेली ही कादंबरी. भारतीय वंशाच्या, आता कॅनेडीयन नागरिक असलेल्या लेखकाने लिहिलेली पुरस्कारप्राप्त कादंबरी म्हणून ती मुंबई विद्यापीठातच लावली होती असे नव्हे तर इतर पाचसहा भारतीय विद्यापीठांतही बीए, एमएच्या इंग्रजी साहित्याच्या अभ्यासासाठी लावलेली आहे..
काही विद्यार्थी भेटले. त्यांनी सांगितलं की त्या कादंबरीतल्या शिव्यांचा विचारही करावा लागत नाही. आपण कादंबरीच्या विषयाचाच विचार करतो. कादंबरी तशी चांगलीच आहे... पण आम्ही बोलत नाही तर विद्यार्थ्यांनी बोलायची हिंमत दाखवावी ही अपेक्षा आम्ही कुठे करावी...
या साऱ्या निमित्ताने उत्सुकता वाटून ही कादंबरी मी वाचून काढली.
साठ -सत्तर- ऐंशीच्या दशकाच्या पार्श्वभूमीवर, पारशी समाजाच्या पात्रांच्या, नायकाच्या दिनक्रमांतून, संवादांतून घडत गेलेली ही कादंबरी आहे. आपणच काय पारशी लोक स्वतःला सुध्दा मॅड बावा किंवा मॅड बावी म्हणवून घेत असतात. आणि जे पटेल ते धश्चोटपणे बोलून टाकायचं हा त्यांचा गुण साधारणतः कॉमन आहेच. कुणालाही साला, साली, बास्टर्ड, रास्कल आणि अनेक असल्या शिव्या ते प्रेमात असतानाही देतात आणि संतापले तरीही देतात. त्यात त्यांना काही फारसे वावगे वाटत नाही. या कादंबरीतील पात्रे त्यांच्या सामाजिक राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, ठाकरे आणि अशा अनेकांवर शिव्या घालत बोलतात. हा त्यांच्या संवादशैलीचा भाग आहे.
ही कादंबरी एका विशिष्ट समाजाच्या दृष्टीकोनातून विशिष्ट कालखंडाची दखल आणि सेक्युलर विचारांवरील भाष्य या दृष्टीने महत्त्वाची आहे.
बांगला देशच्या लढाईच्या वेळी सॅम नगरवाला प्रकरण गाजलं होतं. आताच्या विद्यार्थ्यांना आणि या पुस्तकाला विरोध करणाऱ्या कुणालाही त्याची आठवण तरी असेल की नाही कोण जाणे. त्यावेळी जे काही घडलं त्यात संशयाची सुई इंदिरा गांधीकडे सरळ पॉइंट करीत होती. त्या एका सत्यघटनेचा वरवरचा संदर्भ घेऊन ढोबळ पारशी व्यक्तीरेखा घेऊन लिहिलेली ही कादंबरी मला स्वतःला सुरुवातीला बरी वाटली ती एका वेगळ्या समाजाचे चित्रण असल्यामुळे. उत्तरार्धानंतर मात्र ती ढासळत जाते. नायकाच्या कौटुंबिक कथा आणि व्यथा आणि सॅम नगरवालाशी साधर्म्य असलेली मेजर बिलिमोरियाची कथा यातल्या कशालाच नेमकेपणा येत नाही. सेक्युलर भिंतीच्या कथेचीही तीच तऱ्हा. लेखकाला तसे म्हणायचे नसले तरीही, नायकाच्या कुटुंबियांवर ओढवलेले प्रसंग जादूटोणा- प्रार्थना वगैरेंच्या माध्यमातून सुटल्याचे भासते, हा माझा स्वतःचा या कादंबरीवरचा आक्षेप.
फार काही थोर नसलेली ही जरा वेगळ्या पार्श्वभूमीवरची, वेगळ्या वातावरणातली कादंबरी एसवायच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लावली तर त्यात फार काही विशेष नव्हते. असेही आणि तसेही.
खरे म्हणजे जिच्यासाठी धडधडून आग्रह धरावा असे काही मूल्य या कादंबरीत नाही. माझ्या दोन विद्वान पारशी दोस्तांनी तर ती कादंबरी अगदीच सो सो आहे , तिला विरोध तरी कशाला एवढा... म्हणून विषय गुंडाळून टाकला.
पुस्तकाची म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण गुंडगिरीचा काळ विद्यापीठात सोकावला हे नक्की.
आणि विद्यापीठीय विद्वान अगदी सहज बकाबका मूग गिळून बसतात यावरही शिक्कामोर्तब झालं.
विरोध करणारेही राजकारणी, कादंबरी विथड्रॉ केली म्हणून टीका करणारेही राजकारणीच.
पत्रकारितेचे संरक्षक कवच पेहेनलेल्या दोन-तीन विद्वानांनी निषेध नोंदवला. विद्यापीठाच्या इंग्लिश विभागाच्या कुणी नव्हे तर राज्यशास्त्र विभागाच्या प्रा. उत्तरा सहस्रबुध्दे यांनी आयबीएन् लोकमतवर निसंदिग्धपणे ही कृती चुकीची असल्याचा बाईट दिला.
तेवढं सोडलं तर आमची लक्तरं दिसतंच आहेत.
No comments:
Post a Comment