भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात जन्माला आलेल्या तीन विद्यापीठांपैकी मुंबई विद्यापीठ हे एक. या विद्यापीठाच्या स्थापनेनंतरच्या काळात ज्या अनेकांनी शिक्षण घेतले त्यातील अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. स्वातंत्र्याच्या जडणघडणीत भाग घेतला. मुंबई शहर ब्रिटिशांच्या काळापासूनच देशाची आर्थिक केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर तर ते देशाची आर्थिक राजधानी म्हणूनच मान्यता पावले. या आर्थिक राजधानीतले विद्यापीठ म्हणून मुंबई विद्यापीठाला जेवढी प्रतिष्ठा लाभली तेवढी क्वचितच देशातल्या इतर कुठल्या विद्यापीठाला लाभली असेल.
एका वादळी स्थित्यंतराच्या काळात जन्माला आलेलं हे विद्यापीठ नंतरच्या काळात केवळ स्थित्यंतराचे साक्षीदार न रहाता साथीदार बनले. स्वराज्याचे एकाहून एक महत्त्वाचे मोहरे या विद्यापीठाच्या कमानीखालून गेले. भारताच्या आधुनिक इतिहासाशी इतके जवळचे नाते असलेले हे विद्यापीठ. न्याय, अर्थकारण, राजकारण, कला, विज्ञान, भाषा, साहित्य यापैकी प्रत्येक क्षेत्रात या विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक मोहरे या देशाच्या बांधणीत, समाजाच्या घडणीत आघाडीवर राहिले. या मोहऱ्यांची केवळ आडनावं लिहायची ठरवली तरी कितीतरी पृष्ठे व्यावली जातील... घटनांचं बाहुल्य, त्यातील नाट्य हे तर आणखी वेगळं.
मुंबई विद्यापीठाचा आणि मुंबई शहराचा इतिहास एकमेकांत इतका घट्ट विणला गेला आहे की तो वेगवेगळा काढता येणं शक्य नाही. म्हणूनच या विद्यापीठाच्या इमारतीत हा इतिहास बोलका करणारे म्यूझियम असावे ही संकल्पना मी 2007 साली विद्यापीठाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षात मांडली होती.
जगातील अनेक नामवंत विद्यापीठांत स्वतःची म्यूझियम्स आहेत. त्यातील काही उदाहरणे इथे देत आहे. रशियात कझान विद्यापीठाचा इतिहास मांडणारे म्यूझियम आहे. 1979 साली हे म्यूझियम सुरू करण्यात आले. 1798 साली या विद्यापीठाची जी मुख्य इमारत बांधण्यात आली होती त्याच मुख्य इमारतीत हे त्यांच्या विद्यापीठाच्या इतिहासाचे म्यूझियम करण्यात आले आहे. 1200 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत हे म्यूझियम असून त्यामध्ये जुनी महत्त्वाची कागदपत्रे, छायाचित्रे, चित्रे, अत्यंत जुनी, दुर्मिळ अशी हस्तलिखिते आणि पुस्तके, विद्यापीठांमध्ये जागतिक कीर्तीचे संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी वापरलेली साधने, यंत्रे या साऱ्यांचे जतन आणि प्रदर्शन यात करण्यात आले आहे. एकूण 1500 प्रदर्शनीय वस्तू आणि अनेक कागदपत्रे यात आहेत.
एस्टोनियामधील तार्तु विद्यापीठाच्या म्यूझियमची कथाही जाणून घेण्यासारखी आहे. युरेशियामधील एस्टोनिया या एका छोट्या पण प्रगत देशाच्या तार्तु विद्यापीठाने स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान ओळखून स्वतःच्या इतिहासाचे म्यूझियम केले आहे. डिसेंबर 1976मध्ये हे म्यूझियम सुरू झाले ते विद्यापीठाच्या तळघरात. पण अवघ्या काही महिन्यांतच ते विद्यापीठाच्या जुन्या ऐतिहासिक ग्रंथालयाच्या इमारतीत हलवण्यात आले. हे ग्रंथालय म्हणजे 13व्या शतकात बांधली गेलेली एका मूळ कॅथेड्रलची इमारत होती. विद्यापीठ इतिहासाच्या म्यूजियमची प्रतिष्ठा ओळखणारे बुध्दीवंत तेव्हा सुदैवाने तेथे होते म्हणूनच हे घडू शकलं. 16व्या शतकातील युध्दांची झळ पोहोचलेल्या या इमारतीवर 1985मध्ये या विद्यापीठाने सढळहस्ते खर्च करून ती अतिशय सुरक्षित आणि सुंदर बनवली.
या म्यूझियममध्ये 1632 ते 1995पर्यंतचा तीन शतकांचा इतिहास जपला आहे. यात जुनी वैज्ञानिक साधने, प्रयोगशाळा, वैज्ञानिकांचे कार्य. विद्यार्थी संघटना आणि विद्यार्था जीवनाचा इतिहासही मांडला आहे. दरवर्षी तेथे विद्यापीठ आणि इतिहास या वि,यांवरील अनेकविध अशी किमान 15 तरी प्रदर्सने भरवली जातात. या म्यूजियमची स्वतःची दोन सभागृहे आहेत. त्यापैकी एकात संगीताचे कार्यक्रम नियमितपणे होतात.
एकंदर 65,000 वस्तू आणि अनेक कागदपत्रे येथे प्रदर्शनात मांडून ठेवलेल्या आहेत.
केंब्रिज विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, हार्वर्ड विद्यापीठ, येल विद्यापीठ... या सर्व विद्यापीठांत स्वतःच्या इतिहासाचे दर्शन घडवण्यासाठी भव्य दालने, वॉक-वेज् यांमधून म्यूझियम्स आहेत. या शिवाय या सर्व विद्यापीठांची स्वतःची अशी विविध विषयांवरची इतर म्यूझियम्सही आहेत. पुरातत्व, पुराभिलेख, कलात्मक वस्तू, शिल्पे, चित्रे, स्त्रीवादी कलविषय, विज्ञान, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र अशा नानविध विषयांवरची भव्य म्यूझियम्स ही त्या त्या विद्यापीठांची शान आहे.
आज दोनशे ते सहाशे वर्षांचा इतिहास असलेली ही सारी विद्यापीठे आहेत, पण त्यांतील म्यूझियम्सच्या उभारणीची सुरुवात फार पूर्वीच झाली आहे.
कझान विद्यापीठाच्या म्यूझियमबद्दल एक माहिती. आपल्या विद्यापीठाच्या इतिहासाचे, आपल्या राजकीय आणि शैक्षणिक इतिहासाचे म्यूझियम व्हावे ही कल्पना येफिम बुश्कानेत्स याने प्रथम मांडली. त्यानंतर तीस वर्षांपर्यंत याबाबत चर्चा आणि चर्चा याखेरीज काहीच घडले नाही. अखेर 1979मध्ये या विद्यापीठाची 175 वर्षे पूर्ण झाली तेव्हा शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षात हे म्यूझियम साकार झाले. आज हे म्यूझियम कला आणि विज्ञानप्रसाराचे प्रमुख केंद्र म्हणून शहराच्या सांस्कृतिक जीवनाचे केंद्रबिंदू ठरले आहे.
आपल्या इतिहासाला साजेसं आपलं कार्य असावं अशी जाणीव करून देण्याची क्षमता इतिहासाच्या पुस्तकात जेवढी असेल त्यापेक्षा कैकपटीने अधिक प्रभाव म्यूझियममधील इतिहास दर्शनाने होतो. पुस्तक घेऊन वाचणारांपेक्षा प्रेक्षणीय स्थळ म्हणून म्यूझियमला भेट देणाऱ्यांची संख्या जास्त असते. म्हणूनच विद्यापीठाचा इतिहास लिहिला गेला असला तरीही विद्यापीठ चरित्र लोकांसमोर, विद्यार्थ्यांसमोर जिवंत होण्यासाठी म्यूझियमची गरज आहे. कझान किंवा अन्य कुठल्याही विद्यापीठ म्यूझियमच्या उदाहरणावरून हेच स्पष्ट होते की असे म्यूझियम विद्यापीठाच्या एखाद्या गौरवशाली इमारतीतच असायला हवे. त्या इमारतीचा प्रत्येक कठडा, प्रत्येक खांब, प्रत्येक टाइल, प्रत्येक खिडकी, तिच्या कोनशीलेसह प्रत्येक दगड हा त्या म्यूझियमचा भाग व्हायला हवा.
मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसरात राजाबाई क्लॉक टॉवरच्या इमारतीत तळमजल्यावरील दोन दालनांमध्ये असे म्यूझियम व्हावे अशी माझी संकल्पना होती. तत्कालीन कुलगुरूंनी प्रथमतः या प्रस्तावाचे स्वागत करून एक समितीही स्थापन केली. या समितीमध्ये माझ्याबरोबर श्री. सदाशिवराव गोरक्षकर, त्यांचे दोन जुने सहकारी आणि ग्रंथालयाच्या दोघी सहकारी होत्या. या ग्रंथालयाच्या दोघींचा या प्रस्तावास पाठिंबा नव्हता. कारण पुस्तके कुठे ठेवणार, अभ्यासक कुठे बसणार असा त्यांचा प्रश्न होता.
खरे म्हणजे या ग्रंथालयातील अनेक ग्रंथ, महाग्रंथ, कलाविषयक ग्रंथ, प्राचीन ग्रंथ, तालपट्टिका हे आता संदर्भग्रंथ म्हणून हाताळले जाण्यापेक्षा म्यूझियम पीसच्या संज्ञेला पोहोचले आहेत.
यातील अनेक ग्रंथ अनेक काळापासून खालच्या भव्य दालनांपैकी एका दालनात एका लांबलचक टेबलखाली ठेवलेले आहेत. ओब्लॉन्ग टेबलखाली ठेवलेले म्हणून त्याला ओब्लॉन्ग कलेक्शन असे गोंडस नाव देऊन तो ग्रंथसंग्रह उघडाच पडलेला आहे. काही काल तरी बोअरर्स, कसर युक्त जुनी टाकून देण्याची टेक्सटबुक टाइपची पुस्तके त्यावरच रचून ठेवलेली मी स्वतः पाहिली होती. खरे म्हणजे ही ग्रंथसंपदाच अशा म्यूझियमची सर्वात महत्त्वाची ठेव असेल. त्यामुळे त्यांच्या या आर्ग्युमेंटला काही अर्थ नव्हता.
दुसरा प्रश्न असा होता की अभ्यासक कुठे बसणार...
मी स्वतः एक महिनाभर लक्ष ठेवून निरिक्षण केले होते, या दोन दालनांपैकी एकात जे पीएच्डी संशोधन करणारे अभ्यासक बसतात त्यांची संख्या अक्षरशः बोटांवर मोजण्यासारखी आहे. कधी तीन, कधी सात, कधी चार, कधी सहा... जास्तीत जास्त संख्या वर्षातील एका दिवशीच होती- अकरा. हे अभ्यासक सहजपणे वरच्या मजल्यावर बसू शकतील एवढी जागा वरही आहे.
ग्रंथालयाचा इतरही वापर फार थोडे लोक करतात याचं प्रमुख कारण, या विद्यापीठातील पदव्युत्तर अध्यापन आणि संशोधन- विधि विभाग वगळता- आता सांताक्रूझ पूर्वेच्या विद्यानगरी परिसरात हलवण्यात आले आहेत याला आता तीन दशकं लोटली. या मधल्या वर्षांत दक्षिण मुंबईत रहाणाऱ्या मोजक्या ग्रंथप्रेमी व्यक्ती ते ग्रंथालय वापरतात. जवळ रहाणारे काही विद्यार्थी परीक्षेपुरता काळ ही जागा अभ्यासाला बसण्यासाठी वापरतात. खालच्या दोन मजल्यांवर म्यूझियम केले तरीही यांचा कुणाचाही तोटा होणार नाही इतकी रिकामी बसण्याची जागा वरच्या दालनांतही आहे.
पण हे ग्रंथालय म्हणजे स्वतःचे संस्थान असल्यासारखा दृष्टीकोन अरूण टिकेकरांसारखे लोक बाळगतात. म्यूझियमच्या आराखड्यावर विचार करण्याच्या कामाला सुरुवात केल्याचे कर्णोपकर्णी होताच या संकल्पनेला पहिला विरोध केला तो विद्यापीठ इतिहासाचे पुस्तक लिहिणाऱ्या या अरूण टिकेकरांनी. त्यांना गोरक्षकरांनी काही उत्तर दिले तोच टाटा कन्सल्टन्सीकडून राजाबाई टॉवरच्या संवर्धनाचा प्रस्ताव आला. यात इंटॅक, गरवारे बाई सारेच गुंतले. त्यांनी म्यूझियमचा प्रस्ताव गुंडाळून टाकणे कुलगुरूंना भाग पाडले असेल असे मानायला जागा आहे. कारण या संवर्धनाच्याच नावाखाली ग्रंथालयाचे खालचे एक दालन कॉम्प्युटराइज्ड वर्ल्ड गेटवे लायब्ररीसाठी त्यांच्या ताब्यात देण्याचाही प्रस्ताव होता.
या प्रस्तावापुढे आणि कुठल्यातरी कोपऱ्यातून येणाऱ्या दडपणापुढे तत्कालीन कुलगुरूंनी मान तुकवली. या संदर्भात त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा हा विषय म्यूझियम समितीला कळवण्याचीही तोशीस त्यांनी घेतली नाही. त्यापुढे जी काही वादावादी झाली, मराठी वृत्तपत्रांमध्ये हा विषय पोहोचला, बातम्या आल्या त्यातून टाटा कन्सल्टन्सीचा प्रस्तावही बासनात गेला आणि म्यूझियमचाही.
कणखरपणे, ठामपणे काही निर्णय करावे एवढा रस खोलेसरांना निश्चितच नव्हता.
आज हा विषय पुन्हा आठवण्याचे कारण म्हणजे, 2011 साली राजाबाई क्लॉक टॉवर, आणि पदवीदान सभागृह या इमारतींचा वास्तुशिल्पी सर जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट यांची जन्मशताब्दी येते आहे. त्यानिमित्ताने इतिहास उजळणारे काही कार्यक्रम करावेत अशी कल्पना मांडली जात आहे. प्रेमचंद रॉयचंद यांचे नातू सुशील रॉयचंद यात पुढाकार घेत आहेत. नव्या कुलगुरूंनाही या संदर्भात काही करावेसे वाटते आहे.
कुणाला काही नवीन उभारण्याची आस असेल तर म्यूझियमचा प्रस्ताव पुनरुज्जीवित होण्याची शक्यता असू शकेल.
No comments:
Post a Comment