Friday, August 20, 2010

दूरशिक्षणाचा दगड बहिःशालवर

आज लोकसत्तामध्ये प्रतिभा कामत नावाच्या बाईंनी माझ्या 13 जुलैच्या पत्राचा संदर्भ वापरून एक पत्र लिहिले. त्यात मला चुकून बहिःशाल शिक्षण विभागाच्या संचालकपदावरून उचलून दूरस्थ शिक्षण विभागाच्या संचालकपदी बसवले. विद्यापीठासंदर्भात टीका करणाऱ्या माझ्याच विभागात कसा सावळागोंधळ आहे हे दाखवण्याचा त्यांचा इरादा होता.  त्यामुळे लोकसत्तात तातडीने पत्र पाठवून खुलासा केला आहे.
पण त्यांच्या पत्रातील दूरस्थ शिक्षण विभागावरील सर्व टीका यथायोग्यच आहे, हेही तितकेच खरे.
आपण कॉम्प्युटरायझेशनच्या या जमान्यात आहोत असं कुणाला खरंही वाटणार नाही आमचा दूरस्थ शिक्षण विभाग पाहून.
या काळात दूरस्थ म्हणवणाऱ्या शिक्षणसंस्थेची फी भरायला विद्यार्थ्यांना कामधंदे टाकून लांबलांब रांगा लावाव्या लागतात.  कार्यकौशल्याचे नावही घ्यायला नको. कामतबाईंनी म्हटल्याप्रमाणे नोट्स् वगैरेंचा आनंदच असतो.
पण हे काहीही न देणारे दूरशिक्षण घ्यायला लाखोंच्या संख्येने विद्यार्थी येतात हीच गोष्ट किती  दुर्दैवी आहे. काहीच मार्ग नाही म्हणून ते येतात. संपर्कव्याख्याने घेणारे शिक्षकही सारी परिस्थिती पाहूनही कधीही काहीही बोलत नसावेत. नाहीतर या प्रतिभा कामतांना आपण ज्या संस्थेत संपर्क व्याख्याने घेतो त्या संस्थेचे संचालक कोण हे तरी माहीत असायला हरकत नव्हती.
सारेच आपल्या टोपल्या टाकून मोकळे होतात, मग कोणी कोणाला बोलावे.
बोलण्याचा हक्क बजावायचा असेल तर आधी आपण आपले काम निष्ठेने करतो आहोत कां हे आपण साऱ्या शैक्षणिक, बौध्दिक लोकांनी तपासून पाहिले पाहिजे.
पार्श्वभागावर एक शिक्का उठवून घ्यायचा म्हणून प्रवेश घेणारे विद्यार्थी जसे शिक्षणाचा दर्जा खाली आणतात तितकेच, आपल्याला तास घ्यायला मिळतात तेवढे घेऊन मोकळे व्हायचे- बाकी उठाठेव करणारे आपण कोण म्हणणारे शिक्षकही.
काही वर्षांपूर्वीची- म्हणजे 1996ची गोष्ट आहे. दूरशिक्षण विभाग तेव्हा आमच्या फोर्ट कॅम्पसमध्ये होता.
देशमुख मॅडमनी नुकतीच साऱ्या इमारतीची रंगरंगोटी करवून घेतली होती.
सप्टेंबर महिन्यात दूरशिक्षण विभागाकडे प्रवेश घेण्यासाठी रांग लागली होती. कित्येक तास मुलेमुली, पोरं घेऊन उभ्या असलेल्या  नवमाता, वाढत्या वयात ग्रॅज्युएशन करण्याची हौस पुरी करण्यासाठी आलेले प्रौढ-  सारीच गर्दी ताटकळत रांगेतून... खालच्या बागेतून, पहिल्या मजल्यावर, तिथून वळतवळत दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचलेल्या रांगेत खोळंबत होती. हे सारे अखेरच्या चार दिवसांत प्रवेशासाठी जागे झाले म्हणून त्यांना ती शिक्षा भोगावी लागते असं एक समर्थन ऐकायला मिळालं होतं. वर पोहोचल्यावर हिडीसफिडीस होतीच .
रांग संपून गेल्यानंतर मी वाचलं होतं... ऑफ व्हाईट रंगाने रंगवलेल्या कठड्यावर कुणातरी संतापलेल्या, फार काही चांगलं वळण नसलेल्या मुलाने खरडलं होतं... All university staff is xxxx.
पंधरा वर्षांनंतरही परिस्थिती तशीच?

1 comment:

  1. It was interesting to hear abt your criticism on Distance Learning programmes of the University. For all such programmes its important for the persons in charge to invite criticism from all the participants on a regular basis to see if the objectives of the programmes are served and how they can be modified to suit the objectives. Without such stock taking and openness I wonder if they can survive for long.
    The general tendency is to find flaws with others and be happy with whatever one does!

    ReplyDelete