Friday, August 13, 2010

भिकारडेपणाचे मूळ उच्च पातळीवरच्या मोठ्या भ्रष्टाचारात

आधीचा ब्लॉग लिहिला आणि कर्मचारी संघटनेच्या सदस्यांना दाखवला. या बाबतीत काही करूया अशी आस तर प्रत्येकाच्या बोलण्यातून जाणवली.
पण त्यांनी आणखी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यातून बसलेल्या धक्क्यातून अजून सावरायचं आहे.
या लोकांनी जेजे काही सांगितले त्याची सीमा अफाट आहे. परीक्षा विभाग, छपाईची कंत्राटे, तात्पुरती नोकरभरती या क्षेत्रात चालणाऱ्या भ्रष्टाचाराबरोबरच इतर गैर-विद्यापीठीय नेत्यांची, संघटनांची, बिल्डर्सची, खाजगी धंदे चालवणाऱ्यांची दहशत इतकी जबरदस्त आहे... की कोणी कर्मचाऱ्याने एवढेच काय संघटनेच्या नेत्यानेही आवाज करण्याचा प्रयत्न केला, विरोध करून एखादे कृत्य रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याला नेस्तनाबूत केले जाईल इतकी मोठी समांतर यंत्रणा इथे नांदते.
ते म्हणाले हे जे तुम्ही लिहिलंय हे तर अगदी क्षुल्लक आहे. वरची पोखरलेली यंत्रणा सुधारली तर खालच्या फुटकळ लोकांची काय बिशाद होईल असं काही करण्याची. परीक्षा विभागासारख्या महत्त्वाच्या विभागात 494 तात्पुरते कर्मचारी आहेत. चार-पाच हजार पगार घेऊन काम करणारे हे कर्मचारीही कुणीतरी, कुणाच्या मार्फत तरी भरलेले असतात... संधी मिळताच असले पैसे काढण्याचे उद्योग जास्तीत जास्त तीच भरती करते असे या नेत्यांचे मत होते. त्यात तथ्यही असेल. पण त्यांच्यावर आपले कायम कर्मचारी अंकुश ठेवत नाहीत कां- याचे उत्तर त्यांनी कर्मचाऱ्यांच्या असुरक्षिततेच्या भावनेकडे वळवले.
विद्यापीठातील उच्च पातळीवरील भ्रष्टाचाराच्या त्यांनी सांगितलेल्या कथा अविश्वसनीय वाटाव्यात अशा पण खऱ्याच आहेत. सारे काही बाहेर काढायचे तर या कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारची सुरक्षितता हवी. शारिरीक आणि नोकरीचीही.
मागे एकदा कुलगुरू भालचंद्र मुणगेकरांच्या काळात, मुद्रण विभागाने छपाईचे कंत्राट जास्त पैसा देऊन राज्याबाहेर दिले त्याबद्दल चॅनेलच्या प्रतिनिधीशी बोलल्याबद्दल बोलणाऱ्यावर माध्यमांशी बोलण्याची अनुमती न घेता बोलल्याबद्दल कारवाई करण्यात आली. सात महिने सस्पेंडेड. एकाला एकदा अशी भीती घातली की सारे आपसूक सरळ येतात. गप्प रहातात.
जर काही बदल घडवू आणायचा असेल तर असल्या भीतीचे प्रथम निराकरण करावे लागेल.
मी माझ्या पहिल्या ब्लॉगपोस्टमध्ये लिहिले होते-
गेली काही वर्षे या विद्यापीठात काम करणारे कित्येक निष्ठावंत विद्वान आणि कर्मचारी आता वीट आला या विद्यापीठाचा म्हणतात. हे म्हणताना त्यांची मने भळभळत असतात. सोडून जाऊ म्हणतानाच या विद्यापीठासंबंधी अजूनही जिवंत असलेला लोकादर पाहून पुन्हा त्यांची पावले अडखळतात.

ही परिस्थिती सुधारण्याची इच्छा असेल तर विद्यापीठावर, विद्यापीठात असणाऱ्यांवर सुजाण टीका होत रहायला हवी. कोणी कुठेही वृत्तपत्रांत बोलू नये, लिहू नये, आपली लक्तरे बाहेर टांगू नये अशी अपेक्षा या क्षेत्रात असताच कामा नये. विद्यापीठाची लक्तरे विद्यापीठीयांनीच दाखवायला हवीत. कारण विद्यापीठाला नवीन वस्त्रे हवी आहेत. कारण विद्यापीठाची वस्त्रे हीच या देशातील युवकांची वस्त्रे असणार आहेत.
विद्यापीठाच्या हितासाठी आपली फाटकी लक्तरे बाहेर टांगायलाच हवीत हे माझे मत मी पुन्हा एकदा अधोरेखित करते आहे.
व्हिसलब्लोअर म्हणतात असे लोक पुढे आले तरच आपली परिस्थिती सुधारायची आशा आहे.
त्यांना विश्वासात घेऊन नव्या कुलगुरूंना काही नवीन सुरुवात करता येईल.
अत्त्युच्ची पदी पोहोचता थोरही बिघडतो हा बोध आहे खरा- असे म्हटले जाते. पण पद हीच काही इतिश्री नाही हे कळले तर माणसं त्यावर मात करू शकतात.
सध्या प्रशासनात राहून प्रशासनाच्या भ्रष्टाचारावर खुलेपणाने बोलल्यास त्याला घटनात्मक संरक्षण कसे मिळेल हे सांगणारा कायदेपंडित मी कर्मचारी संघटनेसाठी शोधते आहे. आपली मदत असावी.

No comments:

Post a Comment