भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात जन्माला आलेल्या तीन विद्यापीठांपैकी मुंबई विद्यापीठ हे एक. या विद्यापीठाच्या स्थापनेनंतरच्या काळात ज्या अनेकांनी शिक्षण घेतले त्यातील अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. स्वातंत्र्याच्या जडणघडणीत भाग घेतला. मुंबई शहर ब्रिटिशांच्या काळापासूनच देशाची आर्थिक केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर तर ते देशाची आर्थिक राजधानी म्हणूनच मान्यता पावले. या आर्थिक राजधानीतले विद्यापीठ म्हणून मुंबई विद्यापीठाला जेवढी प्रतिष्ठा लाभली तेवढी क्वचितच देशातल्या इतर कुठल्या विद्यापीठाला लाभली असेल.
एका वादळी स्थित्यंतराच्या काळात जन्माला आलेलं हे विद्यापीठ नंतरच्या काळात केवळ स्थित्यंतराचे साक्षीदार न रहाता साथीदार बनले. स्वराज्याचे एकाहून एक महत्त्वाचे मोहरे या विद्यापीठाच्या कमानीखालून गेले. भारताच्या आधुनिक इतिहासाशी इतके जवळचे नाते असलेले हे विद्यापीठ. न्याय, अर्थकारण, राजकारण, कला, विज्ञान, भाषा, साहित्य यापैकी प्रत्येक क्षेत्रात या विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक मोहरे या देशाच्या बांधणीत, समाजाच्या घडणीत आघाडीवर राहिले. या मोहऱ्यांची केवळ आडनावं लिहायची ठरवली तरी कितीतरी पृष्ठे व्यावली जातील... घटनांचं बाहुल्य, त्यातील नाट्य हे तर आणखी वेगळं.
मुंबई विद्यापीठाचा आणि मुंबई शहराचा इतिहास एकमेकांत इतका घट्ट विणला गेला आहे की तो वेगवेगळा काढता येणं शक्य नाही. म्हणूनच या विद्यापीठाच्या इमारतीत हा इतिहास बोलका करणारे म्यूझियम असावे ही संकल्पना मी 2007 साली विद्यापीठाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षात मांडली होती.
जगातील अनेक नामवंत विद्यापीठांत स्वतःची म्यूझियम्स आहेत. त्यातील काही उदाहरणे इथे देत आहे. रशियात कझान विद्यापीठाचा इतिहास मांडणारे म्यूझियम आहे. 1979 साली हे म्यूझियम सुरू करण्यात आले. 1798 साली या विद्यापीठाची जी मुख्य इमारत बांधण्यात आली होती त्याच मुख्य इमारतीत हे त्यांच्या विद्यापीठाच्या इतिहासाचे म्यूझियम करण्यात आले आहे. 1200 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत हे म्यूझियम असून त्यामध्ये जुनी महत्त्वाची कागदपत्रे, छायाचित्रे, चित्रे, अत्यंत जुनी, दुर्मिळ अशी हस्तलिखिते आणि पुस्तके, विद्यापीठांमध्ये जागतिक कीर्तीचे संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी वापरलेली साधने, यंत्रे या साऱ्यांचे जतन आणि प्रदर्शन यात करण्यात आले आहे. एकूण 1500 प्रदर्शनीय वस्तू आणि अनेक कागदपत्रे यात आहेत.
एस्टोनियामधील तार्तु विद्यापीठाच्या म्यूझियमची कथाही जाणून घेण्यासारखी आहे. युरेशियामधील एस्टोनिया या एका छोट्या पण प्रगत देशाच्या तार्तु विद्यापीठाने स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान ओळखून स्वतःच्या इतिहासाचे म्यूझियम केले आहे. डिसेंबर 1976मध्ये हे म्यूझियम सुरू झाले ते विद्यापीठाच्या तळघरात. पण अवघ्या काही महिन्यांतच ते विद्यापीठाच्या जुन्या ऐतिहासिक ग्रंथालयाच्या इमारतीत हलवण्यात आले. हे ग्रंथालय म्हणजे 13व्या शतकात बांधली गेलेली एका मूळ कॅथेड्रलची इमारत होती. विद्यापीठ इतिहासाच्या म्यूजियमची प्रतिष्ठा ओळखणारे बुध्दीवंत तेव्हा सुदैवाने तेथे होते म्हणूनच हे घडू शकलं. 16व्या शतकातील युध्दांची झळ पोहोचलेल्या या इमारतीवर 1985मध्ये या विद्यापीठाने सढळहस्ते खर्च करून ती अतिशय सुरक्षित आणि सुंदर बनवली.
या म्यूझियममध्ये 1632 ते 1995पर्यंतचा तीन शतकांचा इतिहास जपला आहे. यात जुनी वैज्ञानिक साधने, प्रयोगशाळा, वैज्ञानिकांचे कार्य. विद्यार्थी संघटना आणि विद्यार्था जीवनाचा इतिहासही मांडला आहे. दरवर्षी तेथे विद्यापीठ आणि इतिहास या वि,यांवरील अनेकविध अशी किमान 15 तरी प्रदर्सने भरवली जातात. या म्यूजियमची स्वतःची दोन सभागृहे आहेत. त्यापैकी एकात संगीताचे कार्यक्रम नियमितपणे होतात.
एकंदर 65,000 वस्तू आणि अनेक कागदपत्रे येथे प्रदर्शनात मांडून ठेवलेल्या आहेत.
केंब्रिज विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, हार्वर्ड विद्यापीठ, येल विद्यापीठ... या सर्व विद्यापीठांत स्वतःच्या इतिहासाचे दर्शन घडवण्यासाठी भव्य दालने, वॉक-वेज् यांमधून म्यूझियम्स आहेत. या शिवाय या सर्व विद्यापीठांची स्वतःची अशी विविध विषयांवरची इतर म्यूझियम्सही आहेत. पुरातत्व, पुराभिलेख, कलात्मक वस्तू, शिल्पे, चित्रे, स्त्रीवादी कलविषय, विज्ञान, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र अशा नानविध विषयांवरची भव्य म्यूझियम्स ही त्या त्या विद्यापीठांची शान आहे.
आज दोनशे ते सहाशे वर्षांचा इतिहास असलेली ही सारी विद्यापीठे आहेत, पण त्यांतील म्यूझियम्सच्या उभारणीची सुरुवात फार पूर्वीच झाली आहे.
कझान विद्यापीठाच्या म्यूझियमबद्दल एक माहिती. आपल्या विद्यापीठाच्या इतिहासाचे, आपल्या राजकीय आणि शैक्षणिक इतिहासाचे म्यूझियम व्हावे ही कल्पना येफिम बुश्कानेत्स याने प्रथम मांडली. त्यानंतर तीस वर्षांपर्यंत याबाबत चर्चा आणि चर्चा याखेरीज काहीच घडले नाही. अखेर 1979मध्ये या विद्यापीठाची 175 वर्षे पूर्ण झाली तेव्हा शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षात हे म्यूझियम साकार झाले. आज हे म्यूझियम कला आणि विज्ञानप्रसाराचे प्रमुख केंद्र म्हणून शहराच्या सांस्कृतिक जीवनाचे केंद्रबिंदू ठरले आहे.
आपल्या इतिहासाला साजेसं आपलं कार्य असावं अशी जाणीव करून देण्याची क्षमता इतिहासाच्या पुस्तकात जेवढी असेल त्यापेक्षा कैकपटीने अधिक प्रभाव म्यूझियममधील इतिहास दर्शनाने होतो. पुस्तक घेऊन वाचणारांपेक्षा प्रेक्षणीय स्थळ म्हणून म्यूझियमला भेट देणाऱ्यांची संख्या जास्त असते. म्हणूनच विद्यापीठाचा इतिहास लिहिला गेला असला तरीही विद्यापीठ चरित्र लोकांसमोर, विद्यार्थ्यांसमोर जिवंत होण्यासाठी म्यूझियमची गरज आहे. कझान किंवा अन्य कुठल्याही विद्यापीठ म्यूझियमच्या उदाहरणावरून हेच स्पष्ट होते की असे म्यूझियम विद्यापीठाच्या एखाद्या गौरवशाली इमारतीतच असायला हवे. त्या इमारतीचा प्रत्येक कठडा, प्रत्येक खांब, प्रत्येक टाइल, प्रत्येक खिडकी, तिच्या कोनशीलेसह प्रत्येक दगड हा त्या म्यूझियमचा भाग व्हायला हवा.
मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसरात राजाबाई क्लॉक टॉवरच्या इमारतीत तळमजल्यावरील दोन दालनांमध्ये असे म्यूझियम व्हावे अशी माझी संकल्पना होती. तत्कालीन कुलगुरूंनी प्रथमतः या प्रस्तावाचे स्वागत करून एक समितीही स्थापन केली. या समितीमध्ये माझ्याबरोबर श्री. सदाशिवराव गोरक्षकर, त्यांचे दोन जुने सहकारी आणि ग्रंथालयाच्या दोघी सहकारी होत्या. या ग्रंथालयाच्या दोघींचा या प्रस्तावास पाठिंबा नव्हता. कारण पुस्तके कुठे ठेवणार, अभ्यासक कुठे बसणार असा त्यांचा प्रश्न होता.
खरे म्हणजे या ग्रंथालयातील अनेक ग्रंथ, महाग्रंथ, कलाविषयक ग्रंथ, प्राचीन ग्रंथ, तालपट्टिका हे आता संदर्भग्रंथ म्हणून हाताळले जाण्यापेक्षा म्यूझियम पीसच्या संज्ञेला पोहोचले आहेत.
यातील अनेक ग्रंथ अनेक काळापासून खालच्या भव्य दालनांपैकी एका दालनात एका लांबलचक टेबलखाली ठेवलेले आहेत. ओब्लॉन्ग टेबलखाली ठेवलेले म्हणून त्याला ओब्लॉन्ग कलेक्शन असे गोंडस नाव देऊन तो ग्रंथसंग्रह उघडाच पडलेला आहे. काही काल तरी बोअरर्स, कसर युक्त जुनी टाकून देण्याची टेक्सटबुक टाइपची पुस्तके त्यावरच रचून ठेवलेली मी स्वतः पाहिली होती. खरे म्हणजे ही ग्रंथसंपदाच अशा म्यूझियमची सर्वात महत्त्वाची ठेव असेल. त्यामुळे त्यांच्या या आर्ग्युमेंटला काही अर्थ नव्हता.
दुसरा प्रश्न असा होता की अभ्यासक कुठे बसणार...
मी स्वतः एक महिनाभर लक्ष ठेवून निरिक्षण केले होते, या दोन दालनांपैकी एकात जे पीएच्डी संशोधन करणारे अभ्यासक बसतात त्यांची संख्या अक्षरशः बोटांवर मोजण्यासारखी आहे. कधी तीन, कधी सात, कधी चार, कधी सहा... जास्तीत जास्त संख्या वर्षातील एका दिवशीच होती- अकरा. हे अभ्यासक सहजपणे वरच्या मजल्यावर बसू शकतील एवढी जागा वरही आहे.
ग्रंथालयाचा इतरही वापर फार थोडे लोक करतात याचं प्रमुख कारण, या विद्यापीठातील पदव्युत्तर अध्यापन आणि संशोधन- विधि विभाग वगळता- आता सांताक्रूझ पूर्वेच्या विद्यानगरी परिसरात हलवण्यात आले आहेत याला आता तीन दशकं लोटली. या मधल्या वर्षांत दक्षिण मुंबईत रहाणाऱ्या मोजक्या ग्रंथप्रेमी व्यक्ती ते ग्रंथालय वापरतात. जवळ रहाणारे काही विद्यार्थी परीक्षेपुरता काळ ही जागा अभ्यासाला बसण्यासाठी वापरतात. खालच्या दोन मजल्यांवर म्यूझियम केले तरीही यांचा कुणाचाही तोटा होणार नाही इतकी रिकामी बसण्याची जागा वरच्या दालनांतही आहे.
पण हे ग्रंथालय म्हणजे स्वतःचे संस्थान असल्यासारखा दृष्टीकोन अरूण टिकेकरांसारखे लोक बाळगतात. म्यूझियमच्या आराखड्यावर विचार करण्याच्या कामाला सुरुवात केल्याचे कर्णोपकर्णी होताच या संकल्पनेला पहिला विरोध केला तो विद्यापीठ इतिहासाचे पुस्तक लिहिणाऱ्या या अरूण टिकेकरांनी. त्यांना गोरक्षकरांनी काही उत्तर दिले तोच टाटा कन्सल्टन्सीकडून राजाबाई टॉवरच्या संवर्धनाचा प्रस्ताव आला. यात इंटॅक, गरवारे बाई सारेच गुंतले. त्यांनी म्यूझियमचा प्रस्ताव गुंडाळून टाकणे कुलगुरूंना भाग पाडले असेल असे मानायला जागा आहे. कारण या संवर्धनाच्याच नावाखाली ग्रंथालयाचे खालचे एक दालन कॉम्प्युटराइज्ड वर्ल्ड गेटवे लायब्ररीसाठी त्यांच्या ताब्यात देण्याचाही प्रस्ताव होता.
या प्रस्तावापुढे आणि कुठल्यातरी कोपऱ्यातून येणाऱ्या दडपणापुढे तत्कालीन कुलगुरूंनी मान तुकवली. या संदर्भात त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा हा विषय म्यूझियम समितीला कळवण्याचीही तोशीस त्यांनी घेतली नाही. त्यापुढे जी काही वादावादी झाली, मराठी वृत्तपत्रांमध्ये हा विषय पोहोचला, बातम्या आल्या त्यातून टाटा कन्सल्टन्सीचा प्रस्तावही बासनात गेला आणि म्यूझियमचाही.
कणखरपणे, ठामपणे काही निर्णय करावे एवढा रस खोलेसरांना निश्चितच नव्हता.
आज हा विषय पुन्हा आठवण्याचे कारण म्हणजे, 2011 साली राजाबाई क्लॉक टॉवर, आणि पदवीदान सभागृह या इमारतींचा वास्तुशिल्पी सर जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट यांची जन्मशताब्दी येते आहे. त्यानिमित्ताने इतिहास उजळणारे काही कार्यक्रम करावेत अशी कल्पना मांडली जात आहे. प्रेमचंद रॉयचंद यांचे नातू सुशील रॉयचंद यात पुढाकार घेत आहेत. नव्या कुलगुरूंनाही या संदर्भात काही करावेसे वाटते आहे.
कुणाला काही नवीन उभारण्याची आस असेल तर म्यूझियमचा प्रस्ताव पुनरुज्जीवित होण्याची शक्यता असू शकेल.
Monday, August 23, 2010
Friday, August 20, 2010
दूरशिक्षणाचा दगड बहिःशालवर
आज लोकसत्तामध्ये प्रतिभा कामत नावाच्या बाईंनी माझ्या 13 जुलैच्या पत्राचा संदर्भ वापरून एक पत्र लिहिले. त्यात मला चुकून बहिःशाल शिक्षण विभागाच्या संचालकपदावरून उचलून दूरस्थ शिक्षण विभागाच्या संचालकपदी बसवले. विद्यापीठासंदर्भात टीका करणाऱ्या माझ्याच विभागात कसा सावळागोंधळ आहे हे दाखवण्याचा त्यांचा इरादा होता. त्यामुळे लोकसत्तात तातडीने पत्र पाठवून खुलासा केला आहे.
पण त्यांच्या पत्रातील दूरस्थ शिक्षण विभागावरील सर्व टीका यथायोग्यच आहे, हेही तितकेच खरे.
आपण कॉम्प्युटरायझेशनच्या या जमान्यात आहोत असं कुणाला खरंही वाटणार नाही आमचा दूरस्थ शिक्षण विभाग पाहून.
या काळात दूरस्थ म्हणवणाऱ्या शिक्षणसंस्थेची फी भरायला विद्यार्थ्यांना कामधंदे टाकून लांबलांब रांगा लावाव्या लागतात. कार्यकौशल्याचे नावही घ्यायला नको. कामतबाईंनी म्हटल्याप्रमाणे नोट्स् वगैरेंचा आनंदच असतो.
पण हे काहीही न देणारे दूरशिक्षण घ्यायला लाखोंच्या संख्येने विद्यार्थी येतात हीच गोष्ट किती दुर्दैवी आहे. काहीच मार्ग नाही म्हणून ते येतात. संपर्कव्याख्याने घेणारे शिक्षकही सारी परिस्थिती पाहूनही कधीही काहीही बोलत नसावेत. नाहीतर या प्रतिभा कामतांना आपण ज्या संस्थेत संपर्क व्याख्याने घेतो त्या संस्थेचे संचालक कोण हे तरी माहीत असायला हरकत नव्हती.
सारेच आपल्या टोपल्या टाकून मोकळे होतात, मग कोणी कोणाला बोलावे.
बोलण्याचा हक्क बजावायचा असेल तर आधी आपण आपले काम निष्ठेने करतो आहोत कां हे आपण साऱ्या शैक्षणिक, बौध्दिक लोकांनी तपासून पाहिले पाहिजे.
पार्श्वभागावर एक शिक्का उठवून घ्यायचा म्हणून प्रवेश घेणारे विद्यार्थी जसे शिक्षणाचा दर्जा खाली आणतात तितकेच, आपल्याला तास घ्यायला मिळतात तेवढे घेऊन मोकळे व्हायचे- बाकी उठाठेव करणारे आपण कोण म्हणणारे शिक्षकही.
काही वर्षांपूर्वीची- म्हणजे 1996ची गोष्ट आहे. दूरशिक्षण विभाग तेव्हा आमच्या फोर्ट कॅम्पसमध्ये होता.
देशमुख मॅडमनी नुकतीच साऱ्या इमारतीची रंगरंगोटी करवून घेतली होती.
सप्टेंबर महिन्यात दूरशिक्षण विभागाकडे प्रवेश घेण्यासाठी रांग लागली होती. कित्येक तास मुलेमुली, पोरं घेऊन उभ्या असलेल्या नवमाता, वाढत्या वयात ग्रॅज्युएशन करण्याची हौस पुरी करण्यासाठी आलेले प्रौढ- सारीच गर्दी ताटकळत रांगेतून... खालच्या बागेतून, पहिल्या मजल्यावर, तिथून वळतवळत दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचलेल्या रांगेत खोळंबत होती. हे सारे अखेरच्या चार दिवसांत प्रवेशासाठी जागे झाले म्हणून त्यांना ती शिक्षा भोगावी लागते असं एक समर्थन ऐकायला मिळालं होतं. वर पोहोचल्यावर हिडीसफिडीस होतीच .
रांग संपून गेल्यानंतर मी वाचलं होतं... ऑफ व्हाईट रंगाने रंगवलेल्या कठड्यावर कुणातरी संतापलेल्या, फार काही चांगलं वळण नसलेल्या मुलाने खरडलं होतं... All university staff is xxxx.
पंधरा वर्षांनंतरही परिस्थिती तशीच?

Friday, August 13, 2010
भिकारडेपणाचे मूळ उच्च पातळीवरच्या मोठ्या भ्रष्टाचारात
आधीचा ब्लॉग लिहिला आणि कर्मचारी संघटनेच्या सदस्यांना दाखवला. या बाबतीत काही करूया अशी आस तर प्रत्येकाच्या बोलण्यातून जाणवली.
पण त्यांनी आणखी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यातून बसलेल्या धक्क्यातून अजून सावरायचं आहे.
या लोकांनी जेजे काही सांगितले त्याची सीमा अफाट आहे. परीक्षा विभाग, छपाईची कंत्राटे, तात्पुरती नोकरभरती या क्षेत्रात चालणाऱ्या भ्रष्टाचाराबरोबरच इतर गैर-विद्यापीठीय नेत्यांची, संघटनांची, बिल्डर्सची, खाजगी धंदे चालवणाऱ्यांची दहशत इतकी जबरदस्त आहे... की कोणी कर्मचाऱ्याने एवढेच काय संघटनेच्या नेत्यानेही आवाज करण्याचा प्रयत्न केला, विरोध करून एखादे कृत्य रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याला नेस्तनाबूत केले जाईल इतकी मोठी समांतर यंत्रणा इथे नांदते.
ते म्हणाले हे जे तुम्ही लिहिलंय हे तर अगदी क्षुल्लक आहे. वरची पोखरलेली यंत्रणा सुधारली तर खालच्या फुटकळ लोकांची काय बिशाद होईल असं काही करण्याची. परीक्षा विभागासारख्या महत्त्वाच्या विभागात 494 तात्पुरते कर्मचारी आहेत. चार-पाच हजार पगार घेऊन काम करणारे हे कर्मचारीही कुणीतरी, कुणाच्या मार्फत तरी भरलेले असतात... संधी मिळताच असले पैसे काढण्याचे उद्योग जास्तीत जास्त तीच भरती करते असे या नेत्यांचे मत होते. त्यात तथ्यही असेल. पण त्यांच्यावर आपले कायम कर्मचारी अंकुश ठेवत नाहीत कां- याचे उत्तर त्यांनी कर्मचाऱ्यांच्या असुरक्षिततेच्या भावनेकडे वळवले.
विद्यापीठातील उच्च पातळीवरील भ्रष्टाचाराच्या त्यांनी सांगितलेल्या कथा अविश्वसनीय वाटाव्यात अशा पण खऱ्याच आहेत. सारे काही बाहेर काढायचे तर या कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारची सुरक्षितता हवी. शारिरीक आणि नोकरीचीही.
मागे एकदा कुलगुरू भालचंद्र मुणगेकरांच्या काळात, मुद्रण विभागाने छपाईचे कंत्राट जास्त पैसा देऊन राज्याबाहेर दिले त्याबद्दल चॅनेलच्या प्रतिनिधीशी बोलल्याबद्दल बोलणाऱ्यावर माध्यमांशी बोलण्याची अनुमती न घेता बोलल्याबद्दल कारवाई करण्यात आली. सात महिने सस्पेंडेड. एकाला एकदा अशी भीती घातली की सारे आपसूक सरळ येतात. गप्प रहातात.
जर काही बदल घडवू आणायचा असेल तर असल्या भीतीचे प्रथम निराकरण करावे लागेल.
मी माझ्या पहिल्या ब्लॉगपोस्टमध्ये लिहिले होते-
गेली काही वर्षे या विद्यापीठात काम करणारे कित्येक निष्ठावंत विद्वान आणि कर्मचारी आता वीट आला या विद्यापीठाचा म्हणतात. हे म्हणताना त्यांची मने भळभळत असतात. सोडून जाऊ म्हणतानाच या विद्यापीठासंबंधी अजूनही जिवंत असलेला लोकादर पाहून पुन्हा त्यांची पावले अडखळतात.
ही परिस्थिती सुधारण्याची इच्छा असेल तर विद्यापीठावर, विद्यापीठात असणाऱ्यांवर सुजाण टीका होत रहायला हवी. कोणी कुठेही वृत्तपत्रांत बोलू नये, लिहू नये, आपली लक्तरे बाहेर टांगू नये अशी अपेक्षा या क्षेत्रात असताच कामा नये. विद्यापीठाची लक्तरे विद्यापीठीयांनीच दाखवायला हवीत. कारण विद्यापीठाला नवीन वस्त्रे हवी आहेत. कारण विद्यापीठाची वस्त्रे हीच या देशातील युवकांची वस्त्रे असणार आहेत.
विद्यापीठाच्या हितासाठी आपली फाटकी लक्तरे बाहेर टांगायलाच हवीत हे माझे मत मी पुन्हा एकदा अधोरेखित करते आहे.
व्हिसलब्लोअर म्हणतात असे लोक पुढे आले तरच आपली परिस्थिती सुधारायची आशा आहे.
त्यांना विश्वासात घेऊन नव्या कुलगुरूंना काही नवीन सुरुवात करता येईल.
अत्त्युच्ची पदी पोहोचता थोरही बिघडतो हा बोध आहे खरा- असे म्हटले जाते. पण पद हीच काही इतिश्री नाही हे कळले तर माणसं त्यावर मात करू शकतात.
सध्या प्रशासनात राहून प्रशासनाच्या भ्रष्टाचारावर खुलेपणाने बोलल्यास त्याला घटनात्मक संरक्षण कसे मिळेल हे सांगणारा कायदेपंडित मी कर्मचारी संघटनेसाठी शोधते आहे. आपली मदत असावी.

Thursday, August 12, 2010
किळसवाणा भिकारडेपणा
काल माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला.तिच्या परिचितांपैकी एका विद्यार्थ्याने लॉच्या पेपर्सपैकी एका पेपरचे रिव्हॅल्यूएशन करायला विद्यापीठाच्या परीक्षाविभागात अर्ज केला होता. त्यात त्याचे मार्क्स वाढण्याऐवजी कमी झाले. म्हणून त्याने पुन्हा अर्ज केला होता. ही तांत्रिक चूक होती. पण ती निस्तरली जात नव्हती. मी माझ्या विभागातील हेडक्लार्कला सोबत देऊन त्याला परीक्षा विभागात पाठवले होते. त्या बाई स्वतःच म्हणाल्या मदत करा म्हणून मी स्वतःच सांगून येते,नाहीतर आपले लोकं मुलांना उभंच करत नाहीत. त्यानंतर त्याचं काम झालं असेल असं आम्ही गृहीत धरलं.
काल मैत्रिणीने सांगितलं- परीक्षा विभागातून ते काम उगाचच खोळंबत होतं म्हणून त्या मुलाची आई इथे आली. तिची अवहेलना झाली ती इतकी की ती तिथेच रडू लागली. मग एकूण चार टेबलांवर प्रत्येकी पाचशे रुपये वाटले तेव्हा ती तयार असलेली फाइल बाहेर निघाली. फाइल हातात देताना पुन्हा एकदा देणाऱ्याने मंत्र जपला- कुछ द्येव ना... पुन्हा पाचशे रुपये दिले.
काहीही चूक नसलेला, सुधारणेची गरज नसलेला आपला कागद हलायला इतकावेळ आणि लाच द्यावी लागते तर- चूक असेल तेव्हाचा रेट काय असेल त्रैरासिक मांडा.
ही गोष्ट पकडून दिली जाऊ शकत नाही, केस होऊ शकत नाही, कारण लाच देणाऱ्या मुलानेही चूकच केली आहे. आपल्याला एखादी गोष्ट लवकर मिळणे गरजेचे आहे हे सांगितले की असले भिकारडे लोक आणखी गैरफायदा उकळतात.
आता सिक्स्थ पे कमिशनचे पगार चांगले झाले आहेत तरीही काही कर्मचाऱ्यांचा हा भिकारडेपणा संपत नाही. ही गोष्ट कुलगुरूंच्या कानावर घातली असता त्यांनी कारवाई करू या म्हणून तयारी दखवली, पण कशी करणार कारवाई... कुठल्या आधारावर...
पण मला खात्रीच आहे- हा मुलगा, जो कायद्याचा विद्यार्थी असून काम काढण्यासाठी आणि पुढे त्रास होईल या भीतीने लाच द्यायला तयार झाला,तो पुढे येऊन लाच मागणाऱ्या,घेणाऱ्या माणसांकडे बोटही दाखवणार नाही.शिवाय पुरावा नसेल तर सत्य हा पुरावा होऊ शकत नाही हे तर लोकशाही न्यायव्यवस्थेचे गमक आहे.
मागे एकदा एंजिनिएरिंग विषयात मास्टर्स करणाऱ्या तीन मुलींची केस माझ्याकडे अशीच ओळखीतून आली होती. त्यांच्या गाईडच्या प्रश्नाचा गुंता विद्यापीठाने आणि कॉलेजने मिळून केला होता. तेव्हा परीक्षा नियंत्रकांकडून त्यांना अत्यंत वाईट वागणूक मिळाली होती.
एकंदरच आमचा परिक्षाविभाग संवेदनाहीन पध्दतीने वागतोच.
मला काही लोक म्हणाले, अहो मॅडम, तुम्ही काय या बारीकसारीक गोष्टीने व्यथित होताय... हे तर काहीच नाही.
कुलगुरूपदावरील व्यक्तीने आपण काय करू शकतो अशी हतबलता दर्शवली तर मग संपलंच.
आता तंत्रज्ञान पुढे गेलं आहे. त्याचा वापर करा, सर्वत्र सीसीटीव्ही बसवा. कारवाई करायची तर पुरावे मिळतील याची व्यवस्था करा.
आणि मुख्य म्हणजे आपण भिकारडेपणा करता आहात याची या संबंधित कर्मचाऱ्यांना थोडी जाणीव करून द्या. त्यांची लाज काढा.
भ्रष्टाचार केला तर गाढवावरून धिंड काढण्याची शिक्षा अंमलात आणली तर आमच्याकडे देशातली गाढवं कमी पडतील.
नाहीतर अँटीकरप्शनब्यूरोची एक चौकीच इथे बसवायला हवी.
विद्यापीठाच्या प्रांगणात शिक्षण प्रक्रियेच्या ऐन भरात असताना आमच्याकडूनच मुलांना भ्रष्ट होण्याचा पहिला धडा मिळतो. शरम वाटते. या विद्यापीठाच्या नावाने काम करण्याची शरम वाटावी असले हे भिकारडे आमच्या सोबत काम करतात. किळस तरी किती करावी?
विद्यार्थी संघटना, कर्मचारी संघटना यांना हे दिसत नाही?
Wednesday, August 11, 2010
जैवतंत्रज्ञानाचे मुंबईचे विद्यार्थी कच्चे!
आज एक जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील वैज्ञानिक माझ्याकडे आले होते. एका मोठ्या कंपनीत नोकरीवर असल्यामुळे त्यांच्याकडे अनेकदा जैवतंत्रज्ञानाचे विद्यार्थी अनुभव घेण्यासाठी, शिकाऊ म्हणून तर कधी नुसते पहाण्यासाठी येतात. त्यांनी सहज सांगितलं ते दुखावून गेलं. ते म्हणाले, आमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबईहून आलेले विद्यार्थी अगदीच कच्चे असल्याचं दिसतं. साध्यासाध्या गोष्टी त्यांना येत नसतात. माहीतच नसतात. त्यांना काय कसं शिकवतात कोण जाणे. साधं 10एक्स सोल्यूशन करायला सांगितलं तरी त्यांना तीनतीनदा समजावून द्यावं लागतं. त्या मानाने पुण्याचे, बारामतीचे विद्यार्थी खूप तयारीचे असतात. लॅबमध्ये कामं केलेली आहेत हे कळतं. काय प्रकार आहे हा... कां असं तुमच्याकडे?
मी मान खाली घातली.
आपली मान खाली गेली आहे...
असं कां होतंय याची जबाबदारी कोणाची...
आज जगभरात जैवतंत्रज्ञानाचं महत्त्व वाढतंय. 2025 नंतर जगाची भूक समर्थपणे भागवण्याची शक्ती फक्त जैवतंत्रज्ञानात आहे हे लख्ख आहे. आरोग्यक्षेत्रातही तेच होणार आहे. आपण फक्त व्याख्या पाठ करवून घेऊन पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थी बाहेर धाडले तर ते असमर्थ ठरलेले, आणि म्हणून अवहेलना सोसणारे विद्यार्थी नंतर आपल्या मातृसंस्थेचा कान चावायला येतील याचं तरी पुस्तकी शिकवणाऱ्या शिक्षकांनी, संस्थांनी भान ठेवावं.
आवश्यक ती गुणवत्ता आणण्यासाठी खूप पैसा आणता येतो. निष्ठा मात्र अंगभूत असावी लागते.
कुणीतरी बोला यावर!

Monday, August 9, 2010
श्री3 आणि मंडळी
काल माझ्या मुलाने त्याच्या विश्वातली एक घटना सांगितली. विवेकनिष्ठ, तर्कशुध्द विचार करण्याचे वळण असलेला हा माझा मुलगा त्याच्यावर पडलेल्या दबावाचा अगदी सहजच सामना करू शकला. पण त्याच्याबरोबरच्या इतरांना मात्र तो एक पंथ जॉईन करण्याच्या निर्णयापासून परावृत्त करू शकला नाही.
इतरांनाही शहाणे करून सोडण्याची अजून त्याची बौध्दिक तयारी व्हायची आहे म्हणा किंवा त्याचे मत ऐकून घेणे महत्त्वाचे वाटावे इतकीसुध्दा त्या इतरांची बौध्दिक तयारी नसावी म्हणा.
निमित्त होते आजकालचे एक प्रसिध्द गुरू श्रीश्रीश्रीरविशंकर यांच्या अनुयायांत सामील होण्याचे. तरुणांना आकर्षित करून त्यांना आपल्या ताफ्यात जमा करण्यासाठी या बुवाने आता एक येस क्लब काढला आहे.
फक्त तीन हजार रुपये भरायचे-- की मग तुम्हाला काय काय लाभ. लाभच लाभ. स्ट्रेसपासून मुक्ती, विश्वशांती, विश्वप्रेम, शारीरिक पीडांपासून मुक्ती... आणि हिज होलीनेसचा दिव्य सहवास जो लाभताच चेहऱ्यावर असं काही तेज उमलतं...हे सारं त्याला त्याच्या मित्राचा एक तरुण पाहुणा सांगत होता. त्याच्या मित्राच्या मैत्रिणीने त्याला कन्व्हिन्स केलं होतं. मग इतर मित्रांनाही कन्व्हिन्स करण्याची संधी श्रीश्रीश्रीच्या ताफ्याने हस्तेपरहस्ते साधली होती. टाइमपास म्हणून घरी बोलावून त्या मित्राने या दहाबारा मुलांच्या टोळक्याला श्री3च्या निरागस दलालाचं भाषण ऐकवलं. स्ट्रेसमुक्ती, विश्वप्रेम, अध्यात्म याच बरोबर आता बिझनेस नेटवर्किंगची प्रासादिक भाषाही असल्या दीक्षाविधीमध्ये खळखळू लागली आहे. आणि तीन हजार रुपयांची दक्षिणा देताना करारपत्रही करून घेतले जाते. त्यात श्री3ची स्पेशल सुदर्शन क्रिया -जी केल्याने तुमचे सारे आजार दूर पळणार म्हणजे पळणार- इतर कोणाही ऐऱ्यागैऱ्याला न शिकवण्याच्या करारावर सही करायची असते.
श्री3चे भक्त त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात अशी त्यांची प्रभा आहे. लोक म्हणे कर्ज काढूनही त्यांच्या सहवासासाठी खर्च करतात... म्हणजे त्यांचे बिझनेस क्लासचे अमेरिकेचे तिकिट काढून त्यांच्यासोबत प्रवासाची संधी घेणे. जाऊ दे त्या मूर्खपणाला मर्यादाच नाही.
माझ्या विवेकी मुलाने त्यांच्या प्रत्येक समर्थनाचा पराभव केला आणि मला तुमच्यात सामील व्हायचे नाही असे स्पष्टच सांगितले. स्ट्रेस मुक्ती, चांगली शिकवण, प्रेझेन्टेशन स्किल्स, नेटवर्कच्या संधी सारे काही मी माझ्या बुध्दीबळावर साध्य करू शकतो असे बजावून त्याने पाठ फिरवली.
पण कितीजण अशी पाठ फिरवतील...
श्री3चे संमोहन अनेक संस्थांवर पडले आहे. युनेस्कोच्या काही कार्यक्रमांत त्यांचे प्रमुख या संमोहनाखाली आल्यामुळे त्यांच्या आर्टऑफ्लिव्हिंगचा कोर्स कंपल्सरी केला गेला होता असे मी ऐकले आहे. अनेक शिक्षण संस्थांमध्ये त्यांचा चंचुप्रवेश झाला आहे. दरडोई तीन हजार घेऊन हॉल वगैरे बुक करण्याचा खर्च म्हणे ते भागवतात. भलतंच आर्टिस्टिक झालं हे आर्टऑफ्लिव्हिंग.
पाच वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठातल्या एका प्राध्यापिकाबाईंना या आर्टऑफ्लिव्हिंगची बाधा झाली होती. त्यांनी अगदी ऍकेडेमिक कौन्सिलपर्यंत हा विषय घेऊन मजल मारली होती. हे कोर्सेस आपल्याकडे सुरू करावेत असे त्या सांगत होत्या. सुदैवाने दुसऱ्या एका प्राध्यापिकेने त्याला जोरदार विरोध दर्शवला- आणि असल्या गोष्टी करण्याचे विद्यापीठ हे ठिकाण नव्हे म्हणून ठणकावून सांगितले. तो विषय तिथेच संपला. मग त्या श्री3वाल्या बाई माझ्याकडे आल्या. बहिःशालचे कोर्सेस इतके छान, इतके विविध असतात तर तुम्हीच करा ना हा आर्टऑफ्लिव्हिंगचा कोर्स- त्यांचं वाक्य पुरं व्हायच्या आतंच मी श्री3चा जमाखर्च मांडायला सुरुवात केली. आणि त्या निघाल्याच.
गेले वर्षभर मी ऐकून आहे, की या श्री3वर हिरीरीने आपला वेळ घालवणाऱ्या बाई आता आर्टऑफ्लिव्हिंगला शिव्या मोजतात. ते लोक जगावर प्रेम करायला शिकवण्याच्या नावाखाली कुटुंब तोडू पहातात अशा निष्कर्षाप्रत त्या आल्या आहेत. आणि आर्टऑफ्लिव्हिंगला जायला लागल्यानंतर कुटुंबात बेबनाव झाले, घटस्फोट झाले याची भरपूर उदाहरणं आहेत असं तिथे जाणारेच सांगतात.
पण असले बाबाबुवा शिक्षणसंस्थांच्या दारातून घुसू पहात असतील तर आपण सावध रहायला हवं. आपण शिक्षणप्रणालीतून जे नाहक स्ट्रेस मुलांवर दडपतो त्यातून सुटण्यासाठी मुलं असल्या आंधळ्या अंधारात शिरत असतील तर त्याचाही विचार करायला हवा. एंजिनिअरिंगचीच काय अनेक प्रोफेशनल कोर्सेसची हुषार मुलं पेपर्स नीट न तपासले जाता लागणाऱ्या निकालाने हैराण असतात.
त्यांना श्री3चं काय कुठल्याही महाराज, बाबा, बापूंचं सोपं उत्तर भुलवत असेल तर विचार आपण करायला हवा.
काही काळ आमच्या कुलगुरू असलेल्या देशमुखबाईंच्या दालनात त्यांची समर्थ महाराजांवरची श्रध्दा मागेपुढे प्रदर्शित होत असायची. त्यांच्या दालनातल्या गम्पती बाप्पाच्या मूर्तीची जास्वंदी आरास झळकत असायची. मग त्यांना भेटायला येणारेही ते सूत्र पकडून बरोब्बर संवाद साधायचे. शैक्षणिक क्षेत्रात स्वतःच्या व्यक्तिगत श्रध्दांचे असे प्रदर्शन कुलगुरूंनी करणे चूक होते. पण ते घडत होते.
अशाच प्रकारे छोटेछोटे संस्थाप्रमुख आपापल्या श्रध्दा प्रदर्शित करू लागले तर सूत्र पकडून लांगुलचालन करणाऱ्यांची कमतरता नाहीच. साऱ्या विद्यार्थांना कुठल्या ना कुठल्या स्ट्रेसमुक्तीच्या श्रध्देच्या मांडवात उभं करण्याचा प्रयत्न होऊ लागेल. आपल्या देशात बिनभांडवलाने चालणारा सर्वात बरकतीचा धंदा श्रध्देच्या मार्केटिंगचा आहे.
हा धंदा साराभाई, सहा, भाभा, खुराना, बोस, सेन, चंद्रशेखर, नारळीकर साऱ्यांना झाकोळून या देशाच्या भवितव्याला ग्रहण लावू शकतो.

Sunday, August 8, 2010
'दाश'बोध
परवा मुंबई विद्यापीठात प्रा. डॉ. बिजॉयकुमार दाश यांचं भाषण आणि प्रेझेन्टेशन झालं. 'टेक्नॉलॉजी इंटरव्हेन्शन इन हायर एज्युकेशन' असा विषय होता. येत्या तीन-चार वर्षांत कॉम्प्युटर्स, प्रोजेक्टर्स अशा साधनांचे जे नवे सोपे, स्वस्त आणि छोटे अवतार येणार आहेत त्यांची त्यांनी ओळख करून दिली. थ्रीडी इमेजेस् सहजगत्या दाखवू शकणारी ही सारी साधने घरोघरी, गावोगावी उत्तमोत्तम शिक्षक पोहोचवू शकतील अशा क्षमतेची आहेत. त्यांनी काही अल्ट्रा कपॅसिटर्स दाखवले. दहा तास उर्जा पुरवठा- म्हणजे वीज पुरवठा करू शकणारे हे कपॅसिटर्स चार्ज करायला फक्त एक मिनिट लागते. वाटाण्याएवढे एलइडी लाइट्स प्रत्येकी चारशे वॅट्स् इतक्या ताकदीने उजेड देऊ शकतील. आपल्या गावोगावचे शिक्षण होण्यातल्या फिझिकल अडचणींवर मात करण्याची क्षमता असलेले हे सारे तंत्रज्ञान आपल्याकडे काही संशोधकांच्या बुध्दीने घेतलेल्या अतीव श्रमांचे फलित म्हणून लवकरच पोहोचणार आहे.
हे सांगता सांगता दाश सरांनी आणखी बऱ्याच गोष्टींवर भाष्य केले. भाष्य केले म्हणण्यापेक्षा ते सहज निर्मळपणे सांगत होते. पण ते सारे ऐकणाऱ्या मला भाष्य सुचत होते.
विक्रम साराभाईंनी रिसर्चर होण्यापेक्षा इन्व्हेंटर होणे महत्त्वाचे आहे हे मनावर ठसवल्यानंतर कामाला लागलेल्या मूठभर प्रज्ञावंतांपैकी डॉ. दाश एक. ते सांगत होते, साराभाईंनी त्यांना सांगितलं- रिसर्चर हा अखेर चौकटीतल्या चौकटीतच फिरत रहातो. इन्व्हेंटरला चौकटीच्या बाहेरच जाऊन वेगळा मार्ग काढावा लागतो. त्यामुळे तो साऱ्या जगाला काहीतरी नवीन देतो. जगाचं जीवन सुधारतो. दाश आम्हाला सांगत होते- आपणही आपल्या विद्यार्थ्यांना आता हेच सांगितलं पाहिजे. (आपण आपल्या विषयाच्या वर्गात विद्यार्थीसंख्या कशी वाढेल हे पहाण्यासाठी त्यांना आपल्या कालबाह्य विषयाची महती फुगवून सांगू नये)
वेगळा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे-( निदान त्यांना नापास तरी करू नये)
आपल्यातले खरोखरचे उत्तम अध्यापक जे शिकवतात ते रेकॉर्ड करून सर्वदूर पोहोचवले तर शिक्षणाचा सगळा प्रश्न सुटेल (बोंबला! कुणालातरी उत्तम ठरवलं की मग बाकीच्या खोगीरभरतीने काय करायचं गड्या?)
दाश म्हणाले, आपल्याकडे शिक्षण सर्वदूर पोहोचायला पैसा कमी पडतो. या स्वस्त साधनांच्या सहाय्याने आणि जगभरातले उत्तमोत्तम शिक्षक त्यामार्फत विद्यार्थांपर्यंत आणून आपल्याला अगदी कमीत कमी खर्चात दर्जेदार शिक्षण देणं शक्य होईल. (आणि शिक्षकाची नोकरी मिळताच आमच्या खाजगी शिकवण्या, आमची शेतीवाडी सांभाळून नोकरी असं सारं झकास चाललंय तेही बोंबलणार की!)
दास म्हणाले आपल्याकडील शासकीय, शैक्षणिक संस्थांचा एक मोठा प्रॉब्लेम आहे. आपण लोवेस्ट कोटेशनच्या आधारावर साधने खरेदी करतो. ( लोवेस्ट कोटेशन- हायेस्ट कमिशन असा पूर्ण फंडा आहे साहेब) त्यामुळे आपण अनेकदा ऑब्सोलीट तंत्रज्ञान गळ्यात घेऊन बसतो. ते बदलायला हवं. ( खरेदी समित्यांवर, वित्त निर्णय घेणाऱ्या अनेकांना अद्ययावत् तंत्रज्ञानातील अनेक वस्तू म्हणजे- म्हणजे रे काय
भाऊ असा प्रश्न पडलेला असतो हे कुठे माहीतै आहे तुम्हाला, दाशसर! वीस वर्षांपूर्वी मला पोर्टेबल ओव्हरहेड प्रोजेक्टर हवा होता तेव्हाच्या आमच्या एका साहेबांनी विचारलं होतं- ते कांय असतं? मग दोन वर्षांनंतर मला स्लाइड प्रोजेक्टर हवा होता तेव्हा दुसरे साहेब आले होते ते म्हणाले- पण ते काय जे असेल त्याची खरंच गरज आहे कांय? मग आम्हाला एकदा प्रिंटर-कॉपियर-स्कॅनरची गरज भासली, तेव्हा बजेट कमिटीचे चेअरमन असलेले महोदय-जे नंतर क्रमाने प्रकुलगुरू पुढे कुलगुरू झाले- ते गोंधळून गेले आणि म्हणाले- बघू- पुढल्या वर्षी घेतलं तर नाही चालणार कां?)
मग दाशसर म्हणाले, पंतप्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री सर्वांनी मला आपल्या शिक्षणक्षेत्राचा तांत्रिक कायापालट करण्याचं आव्हान दिलं आहे. आम्ही भारतीयांसाठी हा कॉम्प्युटर सध्या पस्तीस डॉलर्समध्ये देता येईल असा केला आहे. मला तो दहा डॉलर्सवर आणायचा आहे. असे स्वस्त तंत्रज्ञान विद्यार्थ्यांच्या हातात असेल. आता त्याद्वारे चांगला कंटेन्ट पोहोचवण्याचे आव्हान तुम्ही स्वीकारायचे आहे.
(बोंबला) कंटेन्टच्या कमिटीवर कोण कोण घुसवायचं- तयारीला लागा मंडळी.
तरीही-
एक असा भारतीय- जो या देशात अनाथ म्हणून रस्त्यावर टाकून दिलेला... दाश दाम्पत्याने वाढवला आणि साराभाईंनी जोपासला... आज नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात प्रोफेसर एमिरेटस आहे. इन्व्हेंटर म्हणून त्याने आजवर करोडो डॉलर्स कमावले आहेत, लक्झुरी जेटचा मालक आहे-सत्तर वर्षाचा आहे. तरीही देशासाठी नवीन काही करू पहातो आहे... तो विद्यापीठात येऊन काहीतरी आत्मीयतेने सांगून गेला.
आशावाद जपून ठेवायला माणसाला एवढं पुरतं.
शिक्षणक्षेत्रातून साऱ्या सुमारपणाचा पराभव व्हायला किती काळ जाईल कोण जाणे...
पण तरीही आशा ठेवायला हरकत नाही

Thursday, August 5, 2010
बावीस वर्षांपूर्वी
बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझंच कॉलेज. एल्फिन्स्टन कॉलेज. सोसयोलॉजीच्या विभागप्रमुख बाईंना विद्यापीठातल्या आमच्या मनोरमा सावुर बाईंनी माझं नाव सुचवलं. त्यांना विभागातली लेक्चरर कन्या परीक्षेच्या ऐन मोसमात रजेवर गेल्यामुळे कुणीतरी महिनाभरासाठी हवं होतं. पेपर तपासायला, सुपरव्हिजन करायला. शिकवण्याखेरीज पडणारी कामं. पण करायलाच लागतात अशी. बाईंनी माझ्याकडे पेपरांचा गठ्ठा सरकवला. अकरावीच्या फाउंडेशन कोर्सच्या मुलांच्या उत्तरपत्रिका होत्या त्या. त्यातल्या अनेक पेपरांत काहीच लिहिलेलं नव्हतं. काहीत जे लिहिलेलं त्याला उणे मार्क्स द्यावेत अशी स्थिती. बाईंनी मधाळ आवाजात सांगितलं. "तसंच असतं गं ते. त्यांना नापास नसतं करायचं. चाळीस-पन्नास टक्के मार्क्स देतोच आपण-"
आपण?!
मग ते कागद पार पाडले. मग आले एस् वाय बीए च्या खुद्द सोसयोलॉजी घेतलेल्या मुलांचे पेपर्स- नव्हे कागद. त्यातल्याही अनेक पेपरांत काहीच लिहिलेलं नव्हतं. काहीत थोडं... काहीत थोडं थोडं... मी पेपर्स तपासत होते. पाचदहा जणांना शून्य... सहासात जणांना सात आठ... पंधरावीस जणांना तीन चार... असेच मार्क्स पडण्यासारखे होते. इतक्यात एक पेपर आला. त्यात काहीही गिरमिटलेलं. अक्षरं जुळवून एक शब्द काही जुळण्यासारखा नव्हता. बाई माझ्याशेजारीच पेपर तपासत बसल्या होत्या. मी वैतागून हसत म्हणाले- "आपल्याला खरंच उणे मार्क्स देता येतात का हो मॅडम? येत असतील तर या पेपरला उणे किती द्यावेत प्रश्न आहे."
त्यांच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. ती कशासंबंधाने होती ते मला अंमळ उशीराच कळलं. त्या तशाच ओढलेल्या चेहऱ्याने म्हणाल्या... "जरा बघू ते पेपर्स... तू तपासलेले सगळेच दे."
मग तो माझा उणे मार्क्सवाला पेपर घेऊन त्या म्हणाल्या... "अगं हा आपल्या -- सरांचा मुलगा... थांब मी बघते. यू डोन्ट वरी. "
त्यांनी माझ्या देखतच त्या पेपरवर तेहत्तीस अधिक दोन टेकवले. मी सुन्न.
मी म्हटलं... "पण मॅडम, मग या न्यायाने या शून्य मार्क्सवाल्यांना सेकंड क्लास, तीन मार्क्स वाल्यांना फर्स्ट क्लास आणि सहा-सात मार्क्सवाल्यांना डिस्टिंक्शन द्यायला लागेल."
त्यांची एक भुवई गगनात गेली आणि त्यांनी माझं प्रबोधन केलं. - "म्हणजे- द्यायचेच. हे मी तपासत असलेले पेपर्स- म्हणजे तपासून झालेले पेपर्स पाहून घे. मी आलेच"-
एकूण सूत्र लक्षात आलंच. त्यांनी परत येऊन हसऱ्या पण कठोर चेहऱ्याने मला सांगून टाकलं.
"अगं, आधीच विषयाला फारशी मुलं येत नाहीत... हॅहॅहॅ..."
सुपरव्हिजनच्या वेळी कॉपी करणारी तगडी मुलं पकडून दिली तेव्हा दुसऱ्या बाईंनी सांगितलं... प्रेमाने सांगितलं... "जरा जपून कराव्या हं अशा गोष्टी."
त्यानंतर ही महिनाभराची बिगार संपली. प्राचार्य घोलकर होते. त्यांनी विचारलं, "मुग्धा, महिन्याभराचा तुझा पगार मी क्लॉक अवर बेसिसवर देऊ शकतो. शासनाकडून तसा पगार यायला वेळच लागेल. तू साधारण किती तास काम केलंस ते लिहून दे बरं."
मी त्यांना सांगितलं ते मनापासून सांगितलं. "सर, कॉलेज माझंच. इथे थोडंस काम केलं त्याचे पैसे घ्यायची काही गरज नाही. मुख्य म्हणजे या महिन्याभराच्या नोकरीतून एक कळलं की मी इथेच नाही तर कुठेही सोसियोलॉजीची शिक्षक म्हणून काम करू शकणार नाही. एवढा धडा मला फार मोलाचा आहे."
मी नंतर कधीही कॉलेजमध्ये शिक्षक व्हायच्या भानगडीत पडले नाही.
पण गेल्या काही वर्षांत सोसियोलॉजीतली परिस्थिती सुधारली आहे कां नाही माहीत नाही.
आणि फाउंडेशन कोर्सचं काय?

Subscribe to:
Posts (Atom)