Thursday, July 29, 2010

रद्दीनिर्मितीचा कारखाना बंद होणार की काय?

मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंनी परवा पहिलीच विद्वत्-सभेची बैठक भरवली. त्यात अजेंड्याच्या जाडजूड छापील गट्ठ्याकडे निर्देश करीत ते म्हणाले, -हा रद्दी-प्रॉडक्शनचा प्रकार आता थांबवला जाईल. तुम्हा सर्वांना अजेंड्याची प्रत सीडीवर मिळेल. आपापले लॅपटॉप्स घेऊन, बरोबर सीडी घेऊन या. असे कागद वाया घालवणं पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य नाही, नाही कां?- बिचारे कोणीच काही बोलू शकले नाही.
बक अप वेळूकर.
काय गंमत आहे पहा. अमेरिकेत इंटरनेटचा जन्म झाला तो अमेरिकन युनिव्हर्सिटीज् आणि नासा, आर्मी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून. ते सुरू झाल्याला आता दशके लोटली. पण भारतीय विद्यापीठांमधून आयता मिळालेला इंटरनेटचा घास गिळायलाही आम्हाला कष्ट पडत होते. कॉम्प्युटरला हात लावायलाही अजून आपल्या शिक्षक-अध्यापकांना भीती वाटते. मुंबई विद्यापीठाच्या गेल्या सद्दीत तर संगणक-वापराचा आनंदच होता. मुख्य दोघांनाच ते वापरण्याची माहिती नसावी. नाही तर गोष्टी इतक्या कशा रखडू दिल्या असत्या.
एकदा एका महत्त्वाच्या अधिकाऱ्याला मी तातडीची अमुक एक गोष्ट इमेलवर पाठवते म्हटलं. तर तो बापडा म्हणाला- नाही म्हणजे हां.. हां.. हां. मी असं करतो... या इथे हे अमके बसले आहेत त्यांना सांगतो त्यांची इमेल द्यायला... माझा प्रॉब्लेम आहे जरा... नाही म्हणजे माझी इमेल आहे... पण माझी मेल इथे उघडता येत नाही.
हसून हसून फुटायची वेळ.
आमच्या या विद्यापीठाने नेट कनेक्टिव्हिटीसाठी किती पैसा दवडला, त्यातला किती कारणी आला- कुणीतरी माहितीच मागवून घ्यायला हवी. अजूनही विद्यापीठाच्या वित्त-लेखा कामांत कॉम्प्युटर फारसा असत नाही. आमच्या पगाराची स्लिप, फॉर्म 16 वगैरे हवं तर प्रत्यक्षच जावं लागतं. क्या बात है!
अहो आमचा प्रत्यक्ष संपर्कावर विश्वास आहे. सर्विस बुक्स, नेमणुकांच्या नोंदी सारं प्रत्यक्ष. स्वतः या नाहीतर प्यून पाठवा.
खेटे घाला संस्कृती टिकवण्याची घोर जबाबदारी आहे विद्यापीठ प्रशासनावर.

वेळूकर सर, बदलणार की काय हे सारं तुम्ही?

बघू या तुम्हाला किती झगडावं लागतं ते...
आपला अडाणीपणा उघड होऊ नये अशी काळजी परोपरीने घेणारे खूप लोक आहेत सर्वत्र.
बदल नको असतो तो तेवढ्याचसाठी.
त्यांच्यापासून सावध रहाण्याचीही तशी गरज नाही म्हणा.
घट्टपणे उभं रहाणारांपासून ते पळ काढतील असा अंदाज आहे.

एक नवीन पाऊल उचललं जात असल्याचा मनापासून आनंद आहे...

Wednesday, July 28, 2010

वाईट शिक्षकांची अडगळ जुनीच.

नेमाडे सरांची हिंदू जगण्याची समृध्द अडगळ वाचायला घेतली आहे. माझ्याच विभागाने चालवलेल्या पुरातत्वाच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमात मीच या वर्षी दाखल झाले असल्याने वाचायला आणखी मजा येते आहे. खंडेराव- चुकलं- नेमाडे सर स्वतः डेक्कन कॉलेजमधून एम् ए करत होते असं जामखेडकर सरांनी संगितलं.
मग विषय हिंदूवरून डेक्कन कॉलेजच्या जुन्या दिवसांवर सरकला. नेमाडे सरांनी इंग्रजीतून एम्ए केलेलं माहीत होतं. डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी लिंग्विस्टिक्समध्ये एम्ए करायला घेतलेलं... जामखेडकर सरांनीही.- आणि मग त्यांच्या सरांनी त्यांची कत्तल केली. सर्वांनाच कमी मार्क्स दिले. हाइयेस्ट मार्क्स म्हणजे दोनशेपैकी सत्तर. पासापुरते. म्हणजे वर्गातला एकच विद्यार्थी पास. बाकी कत्ले आम. सर सांगत राहिले- हे त्यांचे शिक्षक फ्रान्सहून डॉक्टरेट करून आले होते. एका बहुत बड्या फ्रेंच लिंग्विस्टचे विद्यार्थी म्हणून त्यांचा दबदबा होता. तो दबदबाच तेवढा. शिकवण्याच्या नावाने शून्य. ते वर्गात काहीच धड शिकवायचे नाहीत. विद्यार्थी म्हणजे कःपदार्थ. त्यांनी तयार केलेला सिलॅबसही गोंधळाचाच होता. छळ. जामखेडकर सर, नेमाडे सर आता सत्तरी ओलांडलेले. त्यांचा एम्ए चा काळ म्हणजे ते विशीतले असतील. पन्नास वर्षे उलटून गेली. पण...
अजूनही कित्येक विद्वत्तेचा दबदबा असलेले शिक्षक मुलांवर सूड काढल्यासारखे शिकवतातच. आणि त्यांचे मूल्यमापन करण्याची कोणतीही पद्धत, त्यांच्याबद्दलचे विद्यार्थ्यांचे मत लक्षात घेऊन त्याला बदलायला भाग पाडण्याचा कोणताही मार्ग अजूनही निघालेला नाही.
असे शिक्षक ज्यांच्या वाटेला येतात ते विद्यार्थी गप्प रहातील, त्यांचे सहशिक्षक नुसते पहात रहातील तोवर हे बदलणारही नाही.

Sunday, July 25, 2010

पीएच् डी संबंधी

लोकसत्तामधून माझा माझे विद्यापीठ हा लेख प्रसिद्ध झाल्यावर जे काही फोन आले त्यातला एक फोन मला अगदी आवडला नव्हता. एका महाविद्यालयातून निवृत्त झालेली ही व्यक्ती मी पीएच् डी संबंधी जे काही लिहिले होते, त्याचा विपर्यस्त अर्थ लावून फारच खूष झाली होती. बाकी सारे मुद्दे बाजूला राहिले आणि एकच सूत्र धरून ते बोलत राहिले. ते म्हणाले पीएच् म्हणजे फालतू आणि डी फॉर डिग्री- पीएच् डी म्हणजे फालतू डिग्री. त्यांनी माझ्या लेखाचे जे कौतुक केले ते मला अजिबात कौतुकास्पद वाटले नाही.
शैक्षणिक क्षेत्रातल्या आपल्याच सहकाऱ्यांनी संशोधनाच्या एका टप्प्याला असे निकाली काढले. आपला आक्षेप असायला हवा तो भरताड डिग्र्या मिळवणाऱ्या किंवा देणाऱ्या लोकांवर. विद्वत्तेच्या क्षेत्रातील एका महत्त्वाच्या टप्प्याचे असे सरसकट अवमूल्यन करणे योग्य नव्हे. असेही आणि तसेही. पगारवाढ, पदोन्नती साठीच केवळ पीएच् डी पदरात पाडून घेणे गैर, सामाजिक-राजकीय वर्तुळात सन्मान मिळवण्यासाठी दुसऱ्यांकडून काम करवून घेऊन, पैसे खर्च करून पीएच् डी मिळवणेही गैर आणि केवळ आपल्याला ती मिळवता आली नाही म्हणून असली फालतू कोटी करणेही गैर.
अनेक लोक आपल्या पीएच् डीच्या संशोधनावर आटोकाट मेहनत घेतात, मान मोडून संशोधन करतात. त्यांचा अधिक्षेप करणारे हे शब्द आहेत. 
आजच आमच्या बहिःशाल शिक्षण विभागातील एका तज्ज्ञांनी एक उदाहरण दिले. एका महान् संशोधकाने आपल्या विद्यार्थिनीला वीस वर्षांपूर्वी स्वतः केलेल्या संशोधनाचा बेस घेऊन त्याच विषयावर नव्या संदर्भांच्या चौकटीत पुन्हा संशोधन करण्यास सुचवले. तिच्या संशोधनामुळे त्यांचे निष्कर्ष निकाली निघाले. पूर्णतः रद्दबातल ठरले. या थोर गाईडने त्यावर कृतकृत्यतेची भावना व्यक्त केली. ती विद्यार्थिनी त्यांची बौध्दिक वारस ठरली.
आपल्याकडील अनेक लोक किती कमीत कमी साधने, सुविधा असताना किती कष्ट करून- विशेषतः वैज्ञानिक संशोधनाची कास सोडत नाहीत याचा मला रास्त अभिमान वाटतो.
असे लोक आपल्यात आहेत म्हणूनच भोवती भरपूर उकिरडा असतानाही सारे काही सोडून द्यावे अशी विरक्ती येऊ शकत नाही.

Friday, July 23, 2010

सावध ऐका या आरोळ्या

टाइम्स ऑफ इंडियामध्ये आज टिकेकरांनी कुलपतींना कळकळीची विनंती केलीय. ती आपल्यापैकी बहुतेकांनी वाचलीच आहे.
सध्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया आणि निर्णय हे सद्य राजकीय सत्ताखेळाचे प्रतिबिंब आहे या सत्याचा हा कोळसा उगाळून काही साध्य होईल असे अजिबातच नाही. हे सारे आता बोलणारे-लिहिणारे लोक विद्यापीठाला गेले नऊ महिने कुलगुरू नव्हता तेव्हा काही फारसे बोलल्या, लिहिल्याचे स्मरत नाही.
की विद्यापीठाच्या इतिहास लिहिण्याची पुढली संधी मिळेल तेव्हा या पडीक काळाचा नाट्यमय उपयोग करून घेता येईल असा विचार होता इतिहासकारांचा?
तेव्हा गप्प बसून राहिलेले हे इतिहासकार भाष्यकार आता भाकड विनंत्यांचा गळा काढून स्वतःचे अस्तित्व जाणवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत या पलिकडे मला त्याचा अर्थ लागत नाही. कोळस्कर पूर्वीच्या कुलगुरू निवडीच्या धांदलीत स्वतः होते. नंतर ते स्वतःच शोध समितीचे सदस्य बनले. पण त्यानंतर जर ते त्या पदाच्या शर्यतीत राहिले नसतील तर त्यांना शोध समितीत स्थान मिळाले तर बिघडले कुठे?  डॉ. कोळस्कर बुध्दीमान आहेत, विद्वान आहेत यात तर दुमत नाही ना?
काही दिवसांपूर्वीच एकदा टिकेकरांनी टाईम्स ऑफ इंडिया विद्यापीठासंबंधीच एक लेख लिहिला होता. डेथ ऑफ अ युनिव्हर्सिटी-  त्यातले मुद्दे योग्यही होते.  विद्यापीठ मरते आहे म्हणण्यापेक्षा मी जखमी होते आहे म्हणेन. कारण जखम बरी करता येते. मृत्यू परतवता येत नाही.
आपण सारे या विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत, शिक्षक आहोत... आपण मनावर घेतलं... तर या कडवट मनोवृत्तींना असे मृत्यूलेख लिहिण्याची संधी कदाचित् मिळणार नाही.
निदान म्हणून तरी आपण सारे बोलू, निर्भयपणे जे पटत नाही ते लिहू. विचार मांडणे आणि विचारांनुसार काम करणे हे आपले एकमेव शस्त्र आहे.- जखम साफ करण्याचे, शिवण्याचे.
कुलगुरू कोण झाला कसा झाला याच्या चर्चा चावण्यापेक्षा  तो काही काम करतो कां की पोषाखीपणा करतो,  मूलगामी बदल करण्याचे धैर्य दाखवतो की उगा वरवरचं काम करून आपली टर्म सुखेनैव संपावी म्हणून दिवस काढतो- या गोष्टींकडे लक्ष ठेवणं आणि त्याच्या हातून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं म्हणून वैचारिक धैर्य दाखवून, ताठपणे कामं करणं हे जास्त महत्त्वाचं.
अग्रलेख लिहिण्याची सत्ता हाती असताना सोयीप्रमाणे कुणाला मुका कुणाला दम देण्याचे तंत्र साधलेल्या तथाकथित संपादक-इतिहासकाराच्या विद्यापीठ उद्धाराच्या आरोळीला माझ्या लेखी किंमत नाही.

Thursday, July 22, 2010

भिंती खचू द्या

ब्लॉगच्या एका वाचक मित्राने सुचवलं की नवनवीन शैक्षणिक प्रयोगांबद्दल यात लिहावं.  गेली कित्येक वर्षे अनेकदा आपापसात याबद्दल थोडंफार बोलणंही होत आलंय.
एक म्हणजे कॅफेटेरिया शिक्षण संधी. आर्ट्स, शिक्षण, कॉमर्स, विज्ञान, कायदा या शाखांमधील वॉटरटाईट कंपार्टमेंट्स् काढून टाकण्याची गरज.
आपल्या शिक्षणपध्दतीमध्ये अजूनही सहजपणे प्रवाह मिसळू दिले जात नाहीत. विज्ञान म्हणजे सगळे विज्ञानाचेच विषय शिकले पाहिजेत. विद्यार्थ्यांना इतिहासात रस असेल तर त्यांनी काय करायचं- काही उत्तर नाही. कलाशाखेच्या एखाद्या विद्यार्थ्याला जीवशास्त्राची एखादी शाखा खुणावत असेल तर त्याने काय करायचं- काही उत्तर नाही. कॉमर्सच्या विद्यार्थ्याला लेखनाची आवड असेल आणि त्या दृष्टीने त्याला काही शिकावंसं वाटत असेल तर शिक्षणक्रमातून त्याला शून्य मदत होईल. तत्वज्ञानाची आवड तर कुठल्याही शाखेत असू शकते. पण दारे बंद असतात. ज्याला जे हवे ते ते विषय शिकण्याची काही तरी प्रवाही सुविधा आपण कां तयार करू पहात नाही.
1977ची गोष्ट आहे. मी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये दाखल झाले होते. पहिल्याच वर्षी, मला तत्वज्ञान विषय घ्यायचा होता. तिथले प्राध्यापक फार व्यासंगी म्हणून ऐकून होते. पण त्यांनी मला सरळच सांगितलं,- माय चाइल्ड, इफ यू हॅफ् बीन टॉट इन् वर्नाक्युलर मिडियम- इट विल बी व्हेरी टफ फॉर यू टु ऍब्सॉर्ब फिलॉसफी... गो फर् समथिंग एल्स, माय चाइल्ड.-
चाइल्ड खट्टू होऊन तिथून निघालं.
तत्वज्ञानाशिवाय तसं तर कोणीच जगू शकत नाही. ऍब्सॉर्ब करण्याचंही कोणी थांबत नाही. पण एक भिंत एका शिक्षकाने नाहकच माझ्या भाषेचं निमित्त करून माझ्यापुढे रचून ठेवली.
हे थोडं विषयांतर झालं, पण आठवलं म्हणून लिहिलं.
आजच्या जगात अभ्यासविषयांच्या मधल्या भिंती झरझर वितळू लागल्या आहेत. विज्ञानाचे ज्ञान कला शाखेच्या विषयांच्या अभ्यासासाठी सर्रास वापरले जाते आहे. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना साहित्य खुणावण्याची उदाहरणे नवीन राहिली नाहीत. कला, विज्ञान, व्यापार आणि कायदा या साऱ्या शाखांच्या अभ्यासाचा मिलाफ असलेला लिओनार्दो दा विंची आपल्याला महान् वाटतो, पण अजून त्याचे हलकेसे प्रतिबिंबही आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या साचलेल्या डोहात पडलेले नाही.
अलिकडेच आमच्या बहिःशाल शिक्षण विभागाच्या आर्किऑलजीच्या वीकेन्ड अभ्यासक्रमात हौसेने आलेला एक कॉमर्सचा विद्यार्थी आर्किऑलजी अधिक शिकण्याच्या ध्यासाने पुरता वेडावला. त्याने सी.ए. करावे ही आईवडिलांची इच्छा मोडून तो डेक्कन कॉलेजला एम्ए आर्किऑलजी करायला जाण्यासाठी सज्ज झाला. पण कट्टरपंथी नियमांची भिंत आड आली आहे. त्याला प्रवेश मिळू शकला नाही. आता आपल्याला इतिहास किंवा प्राचीन इतिहासात तरी एम्ए करता येईल की पुन्हा काही आडवं येईल या भीतीने त्याची झोप उडाली आहे. इन्फर्मेशन टेक्नॉलजीचा चांगला डिप्लोमा हातात असलेला हा कॉमर्सचा पदवीधर. त्याला हवे आहे ते शिकता नाही आले तर आयुष्यात एक तर खिन्नविषण्ण तरी होईल किंवा मग काही वर्षे वाया घालवून अखेर हवे तेच करू लागेल. तो खिन्नविषण्ण तर होताच कामा नये. पण त्याची वर्षेही वाया जाऊ नयेत. आपल्या शिक्षणपध्दतीचे कडकडीत सोवळे आता खुंटीवर टांगण्याची वेळ आली आहे.
हा ब्लॉग वाचणाऱ्या सर्व शिक्षणयात्रींनी निदान या विषयावर तरी काही मत मांडावं, मंथन व्हावं अशी माझी विनंती आहे.

Wednesday, July 21, 2010

खांद्यावर काय? पालखी की डोकं?

सारेच चकचकाटी झाले त्याला आषाढी एकादशी तरी कशी अपवाद ठरेल. एवढा मोठ्ठा इव्हेन्ट तर त्याचं कव्हरेज धडाक्यात होणारच. सारं ठीक आहे. आपल्या जगण्याच्या समृध्द अडगळीत हे ही असायचंच, हे आता गृहीतच आहे.
पण वारी, दिंडी नि पालखीचा उत्सव आता महाविद्यालयीन जीवनातही घुसतो आहे. ज्या कोणा तथाकथित संस्कृतीप्रेमळांना यात अभिमानाची बाब वाटते त्यांची आणि त्यांच्या ताब्यातल्या विद्यार्थ्यांची कींव येते.
पण आज एका महाविद्यालयात एका शिक्षकांनी या फुकटचंबू कार्यक्रमाला विरोध दर्शवल्याचे कानावर आले आणि जरा बरे वाटले. दोन तास पालखी नाचवल्यावर सारेजण या शिक्षकांना पालखीत सहभागी होऊन पूजा करण्याचा अत्याग्रह करू लागले, तेव्हा त्यांनी ठामपणे नकार दिला. ज्या गोष्टी मला पटत नाहीत त्यात मी सहभागी होणार नाही असे ठणकावून सांगितले. बराच वेळ दबाव टाकूनही ते बधत नाहीत म्हटल्यावर पालखी निघून गेली. पण मग काही वेळानंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य येऊन त्यांना लोकभावनेचा आदर वगैरे भंकस ऐकवून गेले.
हे ऐकत असतानाच ज्येष्ठ वैज्ञानिक आणि प्राध्यापक आले. जे झाले ते कळताच त्यांनी पुन्हा एकदा आपल्या विद्यापीठातच गणपती वगैरे बसवून आरत्या केल्या जातात हा विषय छेडला. आमच्या अनेक शैक्षणिक विभागांतूनही सांस्कृतिक वातावरण निर्मितीसाठी धार्मिक सणवार साजरे केले जातात. अनेक विभाग प्रमुख त्याला सक्रिय पाठिंबा देत असतात. विद्यार्थ्यांचे आपसातले मैत्र वाढावे, त्यांना एन्जॉय करता यावे म्हणून कितीतरी नावीन्यपूर्ण घटना साजऱ्या करता येतील. ठरीव सण, ठराविक दिवस साजरे करण्यापेक्षा आपण विद्यार्थ्यांना काही वेगळे अर्थपूर्ण पर्याय देऊ शकतो. आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती म्हणून धर्म-संप्रदायांचे कार्यक्रम, सणवार साजरे करणे नाकारणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे याचेही भान जागे रहायला हवे.
वारी असो, गणेशोत्सव असो, नवरात्र असो- समाजात हे सारे साजरे होतच आहे. त्यांचे संदर्भ अर्थ हरवत चालले असले तरीही गतानुगतिकतेपोटी ते चालूच रहाणार आहेत. त्या सर्वासाठी वेळ आणि ऊर्जा खर्ची घालून त्यांचे जतन करायला हवे अशी काही वेळ ओढवलेली नाही... सारे पर्याय बाजूला सारून तेवढेच साजरे करण्यासाठी विद्याक्षेत्रातही वेळ घालवायची मुळीच गरज नाही. असल्या बौध्दिक दिवाळखोरीचे प्रदर्शन जिथे मांडले जात असेल तिथे आपण त्याला विरोध तर केला पाहिजेच पण
सुजाण पर्यायही सुचवले पाहिजेत.
आपल्या देशाच्या संस्कृतीची कित्येक शतके, कित्येक वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांच्या संदर्भविश्वात कुठे शिरलेलीच नाहीत. बहुसंख्य समाजाच्या मर्यादित संदर्भांच्या खुराड्यांतून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांच्या खांद्यावर पालख्या देण्याचे नव्हे तर खांद्यावरच्या डोक्यांची जाणीव देण्याचे कार्यक्रम महत्त्वाचे आहेत.
पण त्यासाठी मुळात आपली डोकीच वापरायला हवीत!
लोकभावनेचा आदर करण्याच्या पोलिटिकली करेक्ट नादात तेच तर विसरायला होतं ना!
गोची तिथेच तर आहे आपली!

Tuesday, July 20, 2010

प्रवेशद्वार

आमच्या विद्यापीठाच्या विद्यानगरी कॅम्पसच्या बाहेर प्रचंड मोठे बॅनर्स लागलेले असतात.  ना. राणे, डॉ.राणे, राजसाहेब, कृपाशंकरजी, मा.ना. शरद्चंद्रजी, उद्धवसाहेब यांच्या नावांनी सजलेले दहादहाफूट लांबरूंद फलक दाराशीच असतात. विद्यापीठाचे नाव लिहिलेली झुरताड पाटी त्यात तोंड तपवत उभी आहे जेमतेम.
ग्रँड हॅयातच्या समोर एक प्रवेशद्वार करून ठेवलंय. खोले-सावंत द्वयीच्या काळात अडीच वर्षे त्याचं काम चाललं होतं. कुठल्या वशिल्याच्या तट्टू डिझायनरने त्याचं डिझाईन केलंय माहीत नाही आणि माहीत करून घ्यायची इच्छाही नाही. पण हे गचाळ प्रवेशद्वार पाहिल्यानंतर या विद्यापीठाच्या या प्रशासकांनी कधीकाळी कुठलं दर्जेदार विद्यापीठ पाहिलंच नसावं अशी शंका येते. पण तेही खरं नाही- सगळे कुलगुरू तसे भरपूर जग फिरून येतात हे आपल्याला माहीत आहे. आपणही सारे अनेक विदेशी विद्यापीठांत पिरून आलेलो असतोच.
या प्रवेशद्वारापाशी बाहेरचा रस्त्याचा भाग आहे तो अजूनही धड झालेला नाही. आणि आत शिरताना विद्यापीठाचे नावही नाही. साईनाथ दुर्गे यांच्या नावाचा फलक सिमेंटच्या ठोकळ्यांवर लागलेला तेवढा दिसतो.
आपल्यापैकी कुणालातरी विद्यापीठाच्या या दर्शनाबद्दल तीव्रतेने वाईट वाटलं कां कधी? वाटलं असेल तर... नक्कीच वाटलं असेल.  पण बोलतो कोण... आपण कशाला वाईट व्हा? आपलं काम नाही ते! आपण ठरवून घेतलंय. आपण आपली चौकट मोडायची नाही. जब जब सिर उठाया एपनी चौखट से टकराया. कवीने आपल्याला प्रेरणा देण्यासाठी थोडच लिहिलं? ते तर आपण माना कायम वाकवून ठेवाव्यात म्हणून सांगून ठेवलं बिचाऱ्याने !
विद्यापीठाच्या दारात काही चांगलं नाही उभारू शकलो आपण- आपण पडलो थर्ड वर्ल्ड. आपल्याकडे फंड्स्ची बोंब. नाही उभ्या करू शकलो संगमरवरी कमानी. एखाद्या प्रख्यात भारतीय शिल्पकाराचे ग्रेनाइट किंवा ब्रॉंझचे शिल्प विकत घेऊन मांडण्याची आर्थिक ताकद नाही आपली. आपल्या फोर्ट कॅम्पसच्या दारावरची नावाची कमान रेल्वे यार्डाच्या कर्षण उपकेंद्राची असते अगदी तश्शीच सुंदर निळ्या रंगात रंगवलेल्या पत्र्याची आहे.
ठीक आहे... पण निदान फुटकळ राजकारणी हेतूंनी रंगवलेल्या फ्लेक्सचे बटबटीत फलक तिथे टांगले जाऊ नयेत एवढीही आपली इच्छाशक्ती नसावी?
लाज वाटायलाच हवी आपल्याला.

Monday, July 19, 2010

फडतूस विद्वानांचे राजकारण

विद्यापीठात किंवा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतून फालतू पॉलिटिक्स होते यात काही नवीन नाही. सिनिऑरिटी वगैरेसारखे मुद्दे म्हणजे तर रोजचीच लढाई. हे पॉलिटिक्स विद्यार्थ्यांची विषयाची निवड किंवा शिकण्याची संधी इथवरही जाऊन पोहोचते तेव्हा ते हाणून पाडायलाच पाहिजे. आज माझ्या संपर्कातील कित्येक कॉलेजांमधले शिक्षक काय काय कथा आणि व्यथा सांगत असतात, त्या ऐकल्या की अंगावर शहारे उठतात. आपण राजकारण्यांना किती हिरीरीने नावं ठेवतो, किती रेवडी उडवतो. ते तर थेट राजकारणातच असतात. आपल्या विद्याक्षेत्रातले, ज्ञानक्षेत्रातले काही लोक आपसात किंवा विद्यार्थ्यांशी किती राजकारण करतात ते पाहिलं, अऩुभवलं की घृणा येते.
मराठीचे एक जुने प्राध्यापक होते- ते विद्यार्थ्याला वर्गाबाहेर भेटले की समोर तीन पुस्तकं धरायचे आणि म्हणायचे- बघ, तुला हवं ते घे यातलं. वाच. आणि मग आपण बोलू या हं त्यावर.
आपल्या विद्यार्थ्यांना वाचनाचं वळण त्यांनी लावलं ते कायमचं. या विद्यार्थीप्रिय प्राध्यापकांवर त्यांच्या सहकारी बाई जळफळत रहायच्या. पण आपणही तसं काहीतरी करावं अशी उर्मी काही त्यांना झाली नाही. आज त्यांच्या भाषाविभागात विद्यार्थ्यांची प्रचंड वानवा आहे. पण त्यासाठी काही चांगला दृष्टिकोन घेऊन नवीन प्रयोग करणे त्यांना जमणार नाही. ज्या विभागांकडे विद्यार्थी आहेत त्यांचा दुस्वास करण्यापलिकडे त्या जाऊ शकत नाहीत. उद्या कुठल्या परिषदेत भाषेच्या रक्षणाच्या नावाने गळा काढणारे भाषण फारफार तर करताना दिसतील त्या. आपल्या विभागात येणारे नवीन शिक्षक विद्यार्थीप्रिय होताना दिसले तर त्यांना त्रास कसा द्यावा यावर आपल्याकडे पदविका सुरू केली तर आपल्याला खूपच फॅकल्टी मिळेल.
विद्यापीठातल्या एका भाषा विभागातली गोष्ट आहे. व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम करणारा, शिकवण्यावर प्रेम असणारा एक विद्यार्थीप्रिय शिक्षक होता. प्राध्यापक होऊ शकेल अशी त्याची गुणवत्ता होती. इतके त्याचे शोधनिबंध होते. अनेक विदेशी विद्यापीठांतून व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून त्याला निमंत्रणे येत.
परीक्षेसाठी पेपर काढणे, ते तपासणे, आपल्याला सुट्टी हवी असेल तेव्हा त्याच्याकडे आपली लेक्चर्स सरकवणे यासाठी इतर सर्व शिक्षकांना तो फार हवाहवासा होता. पण जेव्हा नियुक्तीची वेळ आली, तेव्हा विभागतल्या भयग्रस्तांच्या थव्याने त्याला रीडर म्हणून नियुक्ती मिळू नये याची काळजी घेतली. तेव्हाच्या कुलगुरूंनी आपल्या महाराष्ट्राच्या ऑलपावरफुल साहेबांच्या नावाने चिठ्ठी फाडून त्याचा पत्ता कापला. आज तो शिक्षक कच्छ विद्यापीठात विभागप्रमुख आणि प्राध्यापक म्हणून रुजू झाला आहे. आणि कदाचित एका विदेशी विद्यापीठात कायमचा जाण्याची शक्यता आहे. फडतूस हितसंबंध जपण्याच्या
अंतर्गत राजकारणामुळे या विद्यापीठातील विद्यार्थी एका अत्युत्तम शिक्षकाला कायमचे मुकले.
नको त्या अशैक्षणिक मापदंडांच्या आधारावर विद्याक्षेत्रात घुसलेल्या पोटार्थींनी आपली प्रतिष्ठा वाढवण्याच्या असल्या निरर्थक खेळ्या करणे थांबवले तरी काही प्रमाणात आपण सावरू शकू.

Sunday, July 18, 2010

गंमत

आजच्या फाउंडेशन दिनी नव्या कुलगुरूंनी विद्यानगरीत वृक्षारोपण केले. ही तर सर्वमान्य प्रथा आहे. यात कसली गंमत... त्यांनी अ.दा.सावंतांनी स्थापन केलेल्या गुलाबपुष्प उद्यानात नवीन गुलाबाची रोपे लावली- क्या अदा है!
माझा ब्लॉग वाचलेले एक वात्रट मित्र कुजबुजले- हे म्हणजे त्यांना आपल्या थडग्यावरच गुलाब वाहिल्यासारखं वाटेल नाही?!
क्या अदावत है!
मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी कॅम्पसमध्ये  नाल्याच्या काठाने एक वनस्पती उद्यान व्हावे अशी कल्पना बावीस वर्षांपूर्वी डॉ. एस्, एम्. करमरकर या वनस्पतीशास्त्राच्या ज्येष्ठ प्राध्यापकांनी मांडली होती. ती अडगळीत गेली. मग 1998 साली मी आणि डॉ. शरद चाफेकर, डॉ. लट्टू अशा तिघांनी मिळून पुन्हा एकदा ती व्हावी म्हणून प्रयत्न सुरू केले. त्यावेळच्या कुलगुरूंनी- कोण आहे रे तिकडे- नकाशा कुठेय,  कुठे आहे नकाशा- कुठे आहेत ते एंजिनिअर- असा जोरदार आरडाओरडा सुरू केला आणि ते तिथेच संपलं. 2000 साली आलेल्या तथागतांनी विषय काढताच- व्हेन आय वॉज इन कुआलाsssलंपूर असा सूर लावून विषय आपल्याला कळतच नसल्याचं पुरेसं स्पष्ट केलं आणि ते तिथंच संपलं. 2004 साली शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने या कल्पनेला बरे दिवस येतील अशा आशेने मी पुन्हा एकदा कुलगुरूंकडे विषय काढला. प्रकुलगुरूंना त्यातले जास्त कळते म्हणून त्यांनी तो प्रकुलगुरूंकडे सोपवला. पण कमिटी माझ्या सूचनांनुसार स्थापन झाली. नको इतकी बकबक करून विषयाला फाटे फोडणारे काही लोक मी हेतूपूर्वक वगळले होते. नाहीतर असल्या कमिट्यांत बकवास जास्त आणि काम कमी होते हा विद्यापीठाच्या इतिहासाचाच भाग आहे. पण प्रकुलगुरूंनी आपल्या अध्यक्षतेखाली बैठका सुरू केल्यानंतर त्यांना मागील दारातून आत घेतले. मग व्हायचे तेच झाले. अहो सगळा कॅम्पसच एक बोटॅनिकल गार्डन करू ना आपण असला फालतू बाजा वाजू लागला. तीन बैठकांनंतर बोटॅनिकल गार्डनसाठी बैठका बोलावण्याचं बंदच झालं. केंद्र शासनाकडून संपूर्ण आर्थिक सहकार्य मिळणं शक्य असतानाही, चांगले तज्ज्ञ काम करण्यासाठी उपलब्ध असतानाही या कल्पनेचा बोऱ्या वाजवण्यात आला.
त्या ऐवजी प्रकुलगुरूंनी गुलाबाचे उद्यान करवून घेतले. त्यात काही वाईट झाले असे नाही. पण त्यांनी बोटॅनिकल गार्डनच्या निर्मितीची कल्पना किती ठेंगणी केली, ते विसरता येत नाही. आणि त्यामागचा अजेंडा लक्षात घेता, आज तिथे नव्या कुलगुरूंना रोप लावताना पाहून चांगलीच गंमत वाटली.
कुणा गंध कुणा काटे.

Saturday, July 17, 2010

फाउंडेशन डेची खूणगाठ

उद्या 18 जुलै. विद्यापीठाचा संस्थापना दिन. चक्क रविवार असूनही रविवारीच साजरा होतो आहे, हे विशेष. यापूर्वी अनेकदा कधी सुटीच्या दिवशी आला म्हणून कधी सणाच्या दिवशी आला म्हणून कधी कुलगुरूंना जमत नाहीए म्हणून अनेकदा संस्थापना दिन पुढे ढकलून साजरा करण्यात आला होता.
आमच्या विद्यापीठात ही एक गंमत आहे. आणि सारेच ती चालवून घेतात. सोयिस्कर. म्हणजे उदाहरणार्थ गणपती, दसरा, शिवजयंती, आंबेडकर जयंती अशा साऱ्या साजऱ्या करण्यासारख्या दिवसांच्या बाबतीत हे अवश्यच होतं. होतं काय... हे सारे दिवस असतात सुट्टीचे दिवस. हक्काची सुट्टी- ती तर उपभोगायलाच हवी, शिवाय धार्मिक सणांच्या बाबतीत घरचं कार्य असतंच. मग लोक काय करतात- गणपतीची पूजा आदल्या दिवशी, दसरा आदल्या दिवशी, शिवजयंती, आंबेडकर जयंती नेमक्या दिवसाच्या पुढल्या आठवड्यात कामाच्या दिवशी कधीही ऑफिसमध्ये साजरा होतो. म्हणजे सुट्टीचाही फायदा मिळतो आणि कार्यालय चालू असतानाही सुट्टीसारखे वातावरण तयार करून मज्जाच मज्जा करता येते. या सणावारांशिवाय कामाच्या दिवशी-बहुतेकदा पहिल्या, तिसऱ्या किंवा पाचव्या शनिवारी  सत्यनारायणाची 'म्हापूजा' असतेच कधीमधी. नवरात्रात आपापल्या सेक्शनमध्ये आरास करून आरत्या-बिरत्या करूनही लोक भरपूर धमाल करतात. बरं यात धार्मिक भावनांचा अति बलदंड नाजूक प्रश्न असल्यामुळे कोणतेही,कोणाच्याही नेतृत्वाखालचे प्रशासन कार्यालयीन वेळेच्या या सरळ सरळ अपव्ययाला आळा घालू धजत नाही. 
बुध्दीवंत,बुध्दीजीवी म्हणवणारे आपण बोटचेपे लोकही या फंदात आजवर कधीही पडलेलो नाही. कार्यसंस्कृतीची ओळखही नाही आपल्या विद्यापीठात, असे अनेकांना वाटते, हे माहीत आहे. पण सारे कसे गपगार रहातात.
असं कां होतं? आपली बुध्दीवंतांची चांगल्या नोकऱ्या, मान-सन्मान लाभलेली जमात असले परिवर्तन करण्याच्या भानगडीतच पडत नाही. 
काय हेतू असतात आपले? कसली भीती असते नेमकी?
आपल्याला कुणाला दुखवायचं नसतं. कशाच्या विरोधात बोललं तर आपल्याला प्रशासकीय सहकार्य मिळणार नाही. आपल्या रजा, विशेष रजा, सर्विस बुकची कामं,  आर्थिक बाजू असलेली कामं अडतील, लांबतील किंवा होणार नाहीत, आपल्याला त्रास होईल... असल्या फुटकळ कामांच्या भीतीमुळे आपण आपल्या वैचारिक जबाबदाऱ्या नाकारतो असं मला वाटतं. सर्वांशी मधुर संबंध असले तर आपली कामं होतील हा एक आपला लाडका गैरसमज आहे. प्रशासकीय उतरंडीत कसले तरी नकाराधिकार ताब्यात असलेल्या सुमार (mediocre) वरच्या-खालच्या सर्वांनाच काय केलं म्हणजे हे बुध्दीवंत झुकतात हे आता चांगलंच कळलंय. आपण ते नाकारलं पाहिजे. कुणालाही माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून मूलभूत चांगली वागणूक देणं आपण विसरता कामा नये, परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की स्वहस्ते आपल्या नाकात वेसण घालून आपण त्यांच्या हातात द्यावी.
एक उदाहरण- कुठेही परदेशी जाण्याची संधी आपल्या शिक्षकांना आली की त्यांना खेळवलं जातं. फालतू कारणं देऊन अडवणूक केली जाते. ग्रांट मोकळी होण्यात अडतळे आणले जातात. आपल्यापैकी अनेक बुध्दीवंत काय करतात... असे अडथळे आणणाऱ्यासाठी परतल्यानंतर फॉरेनच्या चॉकलेट्सचा किंवा परफ्यूमचा नजराणा देतात- जेणेकरून पुढल्यावेळी असा त्रास होऊ नये.
यात प्रेम- किंवा आपुलकीपेक्षा तुष्टीकरणाचाच भाग असतो.
आपलं काम नाही झालं- परदेशी जायला नाही मिळालं तरी चालेल पण असल्या फालतू कारणांपुढे गुडघे टेकणार नाही, नांगी टाकणार नाही असा बाणा आपण कां नाही दाखवत? दाखवायला हवा. पण हे सुध्दा तेव्हाच शक्य आहे की आपली वर्तणूक, वैचारिक-बौध्दिक चारित्र्य स्वच्छ असेल. तू आम्हाला बोलाव आम्ही तुला बोलवतो असल्या देवघेवीवर आधारित निमंत्रणे मिळवणाऱ्यांना हे जमणार नाही.
आणि हाच नियम सर्वत्र लागू होतो. कार्यालयीन रेड टेपीझमवर मात करण्यासाठी  आपल्या स्वच्छ बुध्दीने दाखवलेल्या खंबीरपणाचे शस्त्रच कामी येईल.
या फाउंडेशन डे निमित्ताने ही माझी खूणगाठ.

Friday, July 16, 2010

प्रतिक्रियांचा आडवा छेद

हा लेख प्रसिद्ध झाल्यावर प्रतिक्रिया आल्या त्यांवरून आपल्या बुध्दीवंतांच्या जमातीचा पोत लक्षात येतो. प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या सर्वांना लेखातले जवळ जवळ सगळेच मुद्दे पटले होते. आणि बहुतेकांनीच मी दाखवलेल्या धैर्याबद्दल कौतुक व्यक्त केलं. बरं वाटलं आणि वाईटही. जे सत्य आहे ते लिहायला निदान बुध्दीजीवी, बुध्दीवंत म्हणवून घेणाऱ्यांना तरी फार काही आगळ्या वेगळ्या धैर्याची गरज पडयला नको. ते आपलं कामच आहे.
आज आपली अशी झुकी झुकीसी अवस्था कां झाली आहे- याला अनेक कारणं असली तरी मुख्य कारण आपण ओज गमावून बसलो आहोत- हे आहे. आपण धैर्य दाखवणं म्हणजे काहीतरी विशेष आहे हे मानताच कामा नये. धैर्य न दाखवणे म्हणजेच भीती बाळगणे.
आपल्या भीतीचे पदर तरी किती असावेत. पहाणं मोठं आवश्यक आहे. त्यात किती वैविध्य आहे. आपण कशालाही घाबरत असतो, कशासमोरही झुकत असतो. त्यातून आपण आपला उरला सुरला आत्मा गहाण टाकत रहातो आणि मग हताशपणे म्हणतो- आपण तरी काय करणार... व्यवस्थाच अशी आहे.
या वाक्याचा आधार घेणं थांबवून जरा आपल्या झुकण्याचे प्रकार आणि भीतीची उठवळ कारणं, कातडीबचाऊपणाचे दाखले जरा विस्तृतपणे लिहिणार आहे. उदाहरणं खरी असतील. व्यक्तिगत असतील. पण त्यांची नावं लिहिण्याचं प्रयोजन नाही. कारण आपणापैकी प्रत्येकाला त्यातून स्वतःवर हसता हसता पुढे जायचं आहे.
रोज एकेक उदाहरण लिहिणार म्हणतेय. तुम्हालाही लिहावंसं वाटलं तर लिहायचंय. किंवा कळवायचंय.

Thursday, July 15, 2010

माझे विद्यापीठ- सुरुवात लोकसत्तातून


माजी प्रकुलगुरूंची आजी कुलगुरूंच्या नियुक्तीसंदर्भातील वक्तव्य एक निमित्त ठरलं. विद्यापीठातील गोंधळाबद्दलचा राग मनात होताच. त्याबद्दलचा लेख लोकसत्ताच्या मंगळवार, दि. 13 जुलै2010च्या अंकात छापून आला. त्यानंतरच्या अनेक अभिनंदनपर प्रतिक्रियांनंतर एक ब्लॉगच सुरू करावा असे वाटले. लोकसत्तात छापलेल्या लेखात थोडी काटछाट झाली आहे. म्हणून ब्लॉगचं पहिलं पोस्ट मूळ लेखच टाकायचं ठरवलं.

असं मोकळेपणाने, निर्भयपणे लिहायला हवं असं मत अनेकांनी व्यक्त केलंय. त्या जातकुळीच्या सर्वांनी यात सहभागी व्हावं हे आवाहन.



माझे विद्यापीठ

मुंबई विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू आणि सध्याचे राजस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. . दा. सावंत यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीबाबत जी काही वक्तव्ये चालवली आहेत ती वृत्तपत्रांतून वाचायला मिळाली. मनोरंजन झाले. मनोरंजन झाले की साधारणपणे आनंद वाटतो- पण आजकाल काही वेळा असे मनोरंजन होते की त्यामुळे खिन्नताच अधिक येते.
सत्ताधारी पक्षांतल्या, विरोधी पक्षांतल्या प्रखर राजकारण्यांशी ओळखी वाढवून कुठल्याही पदापर्यंत पोहोचता येते हा धडा डॉ. . दा. सावंतांना काही नवा नाही. पण आपली निवड होता दुसऱ्याची झाली की मगच पारदर्शकतेची आठवण यावी... स्वाभाविक आहे!
राजस्थानच्या कुलगुरूंनी आपण नव्या कुलगुरूंपेक्षा अनेक पटींनी श्रेष्ठ आहोत असे म्हणतानाइम्मॉडेस्टीचा दोष पत्करून आपण असे म्हणतो अशी पुस्तीही जोडली आहे. (इम्म़ॉडेस्टीचा दोष पत्करून याचे मराठी भाषांतर आत्मश्लाघेचा दोष पत्करून असेही होऊ शकते किंवा लाज गुंडाळून असेही होऊ शकते). वेळूकरांनी कोणत्याही पी.एच्.डी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले नाही हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. आपल्या मार्गदर्शनार्थ असेल्या विद्यार्थी संखेपेक्षा त्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे हा एकच निकष कुलगुरूपदासाठी श्रेष्ठत्व ठरवण्याचा असू शकत नाही हे शोधसमितीला कळले हे बरे झाले.
विद्यापीठाच्या कामाचे, रिझल्ट्स्चे, एकंदर कार्यक्षमतेचे, पदव्यांच्या दर्जाचे धिंडवडे निघत असताना कुलगुरू पदावरील व्यक्तींनी किती पी.एच्.डी धारकांना गाईड केले (काढले?) यापेक्षा इतर अनेक गुण महत्त्वाचे ठरू शकतील. अर्थात ते सर्व गुण विद्यमान कुलगुरू डॉ. वेळूकरांच्यात आहेत की नाहीत हे सिध्द व्हायचे आहेत. पण मागल्या कुलगुरूंच्या कारकीर्दीत कुलगुरू आणि प्रकुलगुरू दोघांचाही वकूब सुमार होता हे पुरेसे सिद्ध झालेले आहे.
डॉ. . दा. सावंत हे त्यांच्या कामापेक्षा यांच्या प्रदीर्घ भाषणांसाठी जास्त प्रसिद्ध होते. त्यांना प्रकुलगुरू या नात्याने बोलवल्यानंतर ते बोलू लागले की महाविद्यालयांतील आणि विद्यापीठांतील श्रोते अक्षरशः जेरीस यायचे. ‘कमीत कमी चाळीस मिनिटेअशी त्यांची ख्यातीच झाली होती.
काही कामे अर्थातच तत्कालीन कुलगुरू-प्रकुलगुरू जोडीने केली. हे म्हणायला पाहिजे नाहीतर माजी प्रकुलगुरू आपण केलेल्या कामांची यादी ऐकवायला सुरुवात करायचे- की गेली चाळीस मिनिटे. तशी बरीच कामे करणे त्या पदावरच्या व्यक्तींना भाग असते. पण एखादे काम झाले नाही की प्रकुलगुरू डॉ. . दा. सावंत आपल्या दरबारात या गोष्टीला कुलगुरू आणि कुलगुरूच कसे जबाबदार आहेत हे फुलवून फुलवून सांगत.
आपली टर्म संपता संपता डॉ. . दा. सावंत, प्रकुलगुरू मुंबई विद्यापीठ, अध्यक्ष, बॉम्बे रोझ सोसायटी, यांनी आपल्या कारकीर्दीत विद्यानगरीमध्ये विद्यापीठाशी तसा संबंध नसलेले गुलाबाचे उद्यान करवून घेतले. गुलाबाचे प्रदर्शन राजभवनात घेऊन दरबारी ओळख सुवासिक केली... पण हाय रे दैवा... राज्यपाल बदलले आणि सारी गुलाबी फील्डिंग वाया गेली.
खरे तर एका राज्याच्या विद्यापीठात कुलगुरू असणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्या राज्याच्या राज्यपाल कचेरीच्या पारदर्शकतेबद्दल अशी बडबड केली तर ती राजशिष्टाचाराला धरून आहे कां याची शहानिशा व्हायला हवी.
पण डॉ. . दा. सावंतकाय बहु बडबडलेहा मुद्दा खरेतर तसा फार महत्त्वाचा नाहीच. पण कोणी शिरजोर होऊन बोलावं- त्याला काही मर्यादा असावी.
गेले नऊ महिने मुंबई विद्यापीठाचा कारभार पार्टटाइम कुलगुरूंनी सांभाळला. यात त्या व्यक्तीचा तसा दोष नाही. आजवर कुलगुरू नसलेल्या काळात विद्यापीठातील सर्वात ज्येष्ठ प्राध्यापकांकडे चार्ज देण्याची पध्दत होती. या वेळी अपवाद करून दुसऱ्या विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे पदभार देण्यात आला. त्यानंतर जे झाले ते अपेक्षितच होते. आताच्या नियुक्तीबद्दल बौध्दिक पातळीवर आव्हाने देणारे सारे ज्येष्ठ प्राध्यापक तेव्हापासून गप्प बसले याचे कारण काय असू शकेल बरे? आपल्यातल्याच संभाव्य प्रतिस्पर्ध्याच्या हाती काही काळासाठी सत्ता जाण्यापेक्षा हे बरे वाटले होते? ओंडका राजा बरा!
विद्यापीठातल्या सर्वच बुध्दीवंत म्हणवणाऱ्या प्राध्यापक-अध्यापकांकडे आजच्या दुरवस्थेचा दोष जातो. आम्ही सारे कमिट्यांच्या मानमरातबांच्या किरकोळ राजकारणात इतके गुंग होतो की हास्यास्पद ठरतो. बोर्ड ऑफ स्टडीज् असो, संशोधनांसंबंधीच्या समित्या असोत, चौकशी समित्या असोत या सर्व ठिकाणी दुसऱ्या गटाच्या अमक्या तमक्याची जिरवायची हा अंतःप्रवाह खळखळाट करीत असतो. अनेक कार्यक्रम पार पडतात ते मार्चपर्यंतचा अनुदानांचा किंवा बजेटचा शिधा संपवण्यासाठी. अनेक योग्य व्यक्तींना नियुक्त्या मिळत नाहीत कारण कदाचित त्या आल्या तर आपले पितळ उघडे पडेल म्हणून.
व्यक्तीचा व्यासंग, क्षमता पहाता त्याच्यावर लागलेले शिक्केच फक्त इथे तपासले जातात. सध्याच्या किडलेल्या विद्व्यवस्थेत दर्जा, गुणवत्ता वादातीत आहे अशी परिस्थिती ग्रॅज्युएशनची नाही, पोस्ट-ग्रॅज्युएशनची नाही आणि पी.एच्.डीच्या पदवीची तर नाहीच नाही. शिक्षणक्षेत्रात नोकरी मिळवायची तर ग्रॅज्युएशनला-पोस्ट ग्रॅज्युएशनला फर्स्टक्लास किंवा हायर सेकंड क्लास लागतो. मग शिक्षकांच्या हाती विद्यार्थ्याच्या नाकातली वेसण येते. त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांपेक्षा माझ्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स मिळावेत या प्रयत्नांऐवजी त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स किंवा नापासच करायचा प्रयत्न पेपर्स तपासणारे बरेच शिक्षक करतात- या घटना कळत रहातात. दगडांखाली हात सापडलेले कणाहीन विद्यार्थी आणि अनेकदा कणाहीन शिक्षकही या गोष्टींबद्दल आवाज उठवत नाहीत. इन्क्रिमेंट मिळते म्हणून संशोधनाचीच काय तर्कशुध्द विचारही करायचीही कुवत नसलेले अनेक लोकयोग्यगाईडच्या शोधात असतात. गाईड देतील तो विषय घेऊन फटाफट प्रबंध कसा लिहायला जमतो यांना- कोणी विचारत नाही. आपल्याकडील पी.एच्. डी संशोधन हा बहुतांशी पगारवाढीचा, नोकरी पक्की करण्याचा टप्पा ठरतो आहे. गांभीर्याने संशोधन करू इच्छिणाऱ्या अनेकांची मने या प्रकारामुळे विदीर्ण होतात. पण विद्यापीठातले दुकान असे बंद होऊन थोडेच चालेल? आता तर कुलगुरू होण्यासाठी जास्तीत जास्त पी.एच्. डी काढण्याचा नवा फंडा सावंत साहेबांनी दिला आहे.
तुम्ही माझ्या विद्यार्थ्याचे एक्स्टर्नल रेफरी- मी तुमच्या अशी मिलीभगत जागोजाग होऊन आपल्या विद्यापीठांतून कितीतरी संशोधन होते, कितीतरी डॉक्टरेट्स होतात. यातल्या अनेकांना इतर संबंधित विषयांसंबंधी सोडा, आपल्या विषयासंबंधी चार वाक्ये स्वतंत्रपणे लिहिता येतील कां ते तपासायलाच हवे. तरीही पी.एच्. डी संशोधनाची लयलूट आहे.
इंटरनॅशनल अलायन्स फॉर रिसर्च युनिवर्सिटीज् या 2006 साली स्थापन झालेल्या शिखर संस्थेत जगातील केवळ दहा नामवंत विद्यापीठे आहेत. त्यात भारतातील एकही नाही. खरे म्हणजे त्यांनी पायघड्या घालून आपल्याला बोलवायला हवे. कां बरं बोलवत नाहीत? बहुधा त्यांच्याही निवड प्रक्रियेत पारदर्शकता नसावी झालं!
विद्यापीठाच्या परिस्थितीची रड सांगायची तर आमच्या कॅम्पसमधल्या इमारतींची दुर्दशा सांगितल्याशिवाय कथा पुरी होतच नाही.
डॉ. खोले आणि डॉ. . दा. सावंतांच्या कार्यकालात या विद्यापीठाने शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा केला. या काळातही विद्यानगरी कॅम्पसमधल्या इमारतींची कळा सुधारली नाही. फोर्ट कॅम्पसमधील कुलगुरूंच्या विंगचे, दीक्षान्त सभागृहाचे नूतनीकरण आभा लांबा या प्रज्ञावंत हेरिटेज आर्किटेक्टमुळे अतिशय उत्कृष्ट झाले. बाकीची इमारत तशीच वास मारणाऱ्या मुताऱ्यांसकट दिवस ढकलते आहे.
विद्यानगरी कॅम्पस तर झोपडपट्टीचं कोंदण लाभलेली जरा वरच्या स्तरातली आणखी एक ढासळती वस्ती. काही नव्या इमारती सोडल्या तर बाकीच्यांचे रंग इतके उडालेले की पहावत नाहीत. अगदी मुख्य प्रशासकीय कार्यालय असलेली आंबेडकर भवनाची इमारत- वाईट डिझाइन तर आहेच पण निदान वेळोवेळी रंगसफेदी करून लाज राखावी असेही कुणाला वाटले नव्हते. आपापली दालने एसी, सोफा मंडित असली की वरिष्ठांचे काम होते. मेन्टेनन्सची कामे करणारे सर्व कर्मचारी प्राधान्याने हीच कामे करतात हे ओघानेच आले. इतरत्र आनंदी आनंद.
कुलगुरू-प्रकुलगुरूंना असल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नसेल हे ठीक आहे- पण मुख्यतः अभाव आहे तो दृष्टीचा. सेनेटचे एक सदस्य दीपक मुकादम मला एकदा म्हणाले होते या विद्यापीठाला आता एका सीइओ कुलगुरूची गरज आहे. अगदी खरंय.
पी.एच्.डी विद्यार्थी कमी असले तरी चालेल पण आपल्या संस्थेच्या अंतर्बाह्य अब्रूचे धिंडवडे थांबवण्याइतकी कार्यनिष्ठा आणि क्षमता असलेल्या कुलगुरूंची गरज आहे.
आपल्या भोवती रुंजी घालणाऱ्या घनिष्ठांना किंवा पायपुसण्यांना प्राधान्याने कृपाप्रसाद वाटणारे कुलगुरू अलिकडच्या काळात भरपूर होऊन गेले. गुणवत्तेचा विचार करून स्तुतीप्रियतेची शिकार होणारे कुलगुरू हवेत.
शिस्त आणण्यासाठी यंत्रे बसवण्यापलिकडे विचार करू शकणारे प्रशासक भरपूर होऊन गेले. शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना विद्याकेंद्री कामासाठी स्वच्छ वातावरण आणि ऊर्मी देणारे कुलगुरू हवेत.
इतरांच्या कल्पनांना उचलून धरलं तर श्रेय द्यावं लागेल म्हणून कल्पनाच ठेचून टाकणारे पोषाखी कुलगुरू खूप पाहिले. इतरांना मोठं करत स्वतः मोठं होणारे कुलगुरू हवेत.
गेली काही वर्षे या विद्यापीठात काम करणारे कित्येक निष्ठावंत विद्वान आणि कर्मचारी आता वीट आला या विद्यापीठाचा म्हणतात. हे म्हणताना त्यांची मने भळभळत असतात. सोडून जाऊ म्हणतानाच या विद्यापीठासंबंधी अजूनही जिवंत असलेला लोकादर पाहून पुन्हा त्यांची पावले अडखळतात.
या दुःखाला कारण आहे सातत्याने मिळत गेलेले सुमार नेतृत्व. विद्यापीठाच्या तीन महत्त्वाच्या सभागृहांत चालणारे कोते राजकारण, प्रशासकीय रद्दीनिर्मितीचा अव्याहत उद्योग, पोट भरण्यासाठी विद्येचे पीठ करणाऱ्या शिक्षकांची, तथाकथित विद्वानांची मांदियाळी.
तरीही... ही परिस्थिती सुधारेल अशी आशा तर ठेवायलाच हवी.
ही परिस्थिती सुधारण्याची इच्छा असेल तर विद्यापीठावर, विद्यापीठात असणाऱ्यांवर सुजाण टीका होत रहायला हवी. कोणी कुठेही वृत्तपत्रांत बोलू नये, लिहू नये, आपली लक्तरे बाहेर टांगू नये अशी अपेक्षा या क्षेत्रात असताच कामा नये. विद्यापीठाची लक्तरे विद्यापीठीयांनीच दाखवायला हवीत. कारण विद्यापीठाला नवीन वस्त्रे हवी आहेत. कारण विद्यापीठाची वस्त्रे हीच या देशातील युवकांची वस्त्रे असणार आहेत.
आपली नियुक्ती झाली नाही म्हणून पारदर्शकतेची भाषा बोलणाऱ्यांवर, नियुक्ती झाल्यानंतर सहा-सात महिने सत्कार घेत, गहिवरली भाषणे करणाऱ्या सर्वांवर, विद्यार्थांवर अन्याय करणाऱ्या शिक्षकांवर, पैसे चारून मार्क्स वाढवून घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर, वाढीव मार्कांपासून ते मार्कशीट वेळेवर देण्यासाठी कसल्याही प्रकारच्या कामासाठी पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर, पैसे मागून ऍडमिशन देणाऱ्या प्राचार्यांवर, त्यांना तसे करण्यास उद्युक्त करणाऱ्या व्यवस्थापनांवर, पक्षीय राजकारणाचे मैदान म्हणून विद्यापीठाचे अंगण वापरणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांवर. विद्याक्षेत्रातील नियुक्त्यांसाठी दडपण आणून स्वतःचे निम्नदर्जाचे पित्त्ये भरू पहाणाऱ्या राजकारण्यांवर विद्यापीठीय स्वजनांनी, सज्जनांनी सातत्याने, निर्भयपणे आणि जोरकस आवाजात टीका करीत राहीले पाहिजे. तितकेच स्वतःचे काम निष्ठेने करीत राहिले पाहिजे.
नवनियुक्त कुलगुरू कसदार असतील तर ते सत्याच्या बाजूने उभे राहतील. नसतील तर मागच्या पानावरून पुढे कथा सुरू राहील. पण असा कस असेल तर त्यांच्या वयाचा, त्यांनी पी.एच्.डी किती काढले याचा, किंवा त्यांनी कुणाशी ओळखी वाढवल्या आणि नियुक्ती करून घेतली त्याचाही बाऊ करण्याचं कारण रहाणार नाही.
अशी समर्थ टीका करणाऱ्या सर्वांची निष्ठा विद्यापीठ प्रशासनाशी नव्हे तर विद्यापीठाशी असायला हवी.
त्याही पुढे जाऊन- निष्ठा विद्यापीठाशीच नव्हे तर विद्येशी असायला हवी !