ब्लॉगच्या एका वाचक मित्राने सुचवलं की नवनवीन शैक्षणिक प्रयोगांबद्दल यात लिहावं. गेली कित्येक वर्षे अनेकदा आपापसात याबद्दल थोडंफार बोलणंही होत आलंय.
एक म्हणजे कॅफेटेरिया शिक्षण संधी. आर्ट्स, शिक्षण, कॉमर्स, विज्ञान, कायदा या शाखांमधील वॉटरटाईट कंपार्टमेंट्स् काढून टाकण्याची गरज.
आपल्या शिक्षणपध्दतीमध्ये अजूनही सहजपणे प्रवाह मिसळू दिले जात नाहीत. विज्ञान म्हणजे सगळे विज्ञानाचेच विषय शिकले पाहिजेत. विद्यार्थ्यांना इतिहासात रस असेल तर त्यांनी काय करायचं- काही उत्तर नाही. कलाशाखेच्या एखाद्या विद्यार्थ्याला जीवशास्त्राची एखादी शाखा खुणावत असेल तर त्याने काय करायचं- काही उत्तर नाही. कॉमर्सच्या विद्यार्थ्याला लेखनाची आवड असेल आणि त्या दृष्टीने त्याला काही शिकावंसं वाटत असेल तर शिक्षणक्रमातून त्याला शून्य मदत होईल. तत्वज्ञानाची आवड तर कुठल्याही शाखेत असू शकते. पण दारे बंद असतात. ज्याला जे हवे ते ते विषय शिकण्याची काही तरी प्रवाही सुविधा आपण कां तयार करू पहात नाही.
1977ची गोष्ट आहे. मी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये दाखल झाले होते. पहिल्याच वर्षी, मला तत्वज्ञान विषय घ्यायचा होता. तिथले प्राध्यापक फार व्यासंगी म्हणून ऐकून होते. पण त्यांनी मला सरळच सांगितलं,- माय चाइल्ड, इफ यू हॅफ् बीन टॉट इन् वर्नाक्युलर मिडियम- इट विल बी व्हेरी टफ फॉर यू टु ऍब्सॉर्ब फिलॉसफी... गो फर् समथिंग एल्स, माय चाइल्ड.-
चाइल्ड खट्टू होऊन तिथून निघालं.
तत्वज्ञानाशिवाय तसं तर कोणीच जगू शकत नाही. ऍब्सॉर्ब करण्याचंही कोणी थांबत नाही. पण एक भिंत एका शिक्षकाने नाहकच माझ्या भाषेचं निमित्त करून माझ्यापुढे रचून ठेवली.
हे थोडं विषयांतर झालं, पण आठवलं म्हणून लिहिलं.
आजच्या जगात अभ्यासविषयांच्या मधल्या भिंती झरझर वितळू लागल्या आहेत. विज्ञानाचे ज्ञान कला शाखेच्या विषयांच्या अभ्यासासाठी सर्रास वापरले जाते आहे. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना साहित्य खुणावण्याची उदाहरणे नवीन राहिली नाहीत. कला, विज्ञान, व्यापार आणि कायदा या साऱ्या शाखांच्या अभ्यासाचा मिलाफ असलेला लिओनार्दो दा विंची आपल्याला महान् वाटतो, पण अजून त्याचे हलकेसे प्रतिबिंबही आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या साचलेल्या डोहात पडलेले नाही.
अलिकडेच आमच्या बहिःशाल शिक्षण विभागाच्या आर्किऑलजीच्या वीकेन्ड अभ्यासक्रमात हौसेने आलेला एक कॉमर्सचा विद्यार्थी आर्किऑलजी अधिक शिकण्याच्या ध्यासाने पुरता वेडावला. त्याने सी.ए. करावे ही आईवडिलांची इच्छा मोडून तो डेक्कन कॉलेजला एम्ए आर्किऑलजी करायला जाण्यासाठी सज्ज झाला. पण कट्टरपंथी नियमांची भिंत आड आली आहे. त्याला प्रवेश मिळू शकला नाही. आता आपल्याला इतिहास किंवा प्राचीन इतिहासात तरी एम्ए करता येईल की पुन्हा काही आडवं येईल या भीतीने त्याची झोप उडाली आहे. इन्फर्मेशन टेक्नॉलजीचा चांगला डिप्लोमा हातात असलेला हा कॉमर्सचा पदवीधर. त्याला हवे आहे ते शिकता नाही आले तर आयुष्यात एक तर खिन्नविषण्ण तरी होईल किंवा मग काही वर्षे वाया घालवून अखेर हवे तेच करू लागेल. तो खिन्नविषण्ण तर होताच कामा नये. पण त्याची वर्षेही वाया जाऊ नयेत. आपल्या शिक्षणपध्दतीचे कडकडीत सोवळे आता खुंटीवर टांगण्याची वेळ आली आहे.
हा ब्लॉग वाचणाऱ्या सर्व शिक्षणयात्रींनी निदान या विषयावर तरी काही मत मांडावं, मंथन व्हावं अशी माझी विनंती आहे.
I do agree with this..We have to accept that all that counts in achieving/contributing something substantial in ur life is ur passion for the subject..its possible that you feel passionate abt a subject much later in ur life..so, ur previous training need not become an obstacle in pursuing various interests in life! Unfortunately, our education has never attempted to be `inclusive', perhaps due to number of ppl it has to deal with!
ReplyDeleteSNDT Univ wanted to start a course in Pure Sciences and I had been on the ad hoc board. We worked hard and prepared modules in different disciplines of pure Sciences thinking that a student be allowed to have a free choice across these modules. UGC denied permission for this and we were told that the attempt isd being aborted......
ReplyDeleteKale P G