सारेच चकचकाटी झाले त्याला आषाढी एकादशी तरी कशी अपवाद ठरेल. एवढा मोठ्ठा इव्हेन्ट तर त्याचं कव्हरेज धडाक्यात होणारच. सारं ठीक आहे. आपल्या जगण्याच्या समृध्द अडगळीत हे ही असायचंच, हे आता गृहीतच आहे.
पण वारी, दिंडी नि पालखीचा उत्सव आता महाविद्यालयीन जीवनातही घुसतो आहे. ज्या कोणा तथाकथित संस्कृतीप्रेमळांना यात अभिमानाची बाब वाटते त्यांची आणि त्यांच्या ताब्यातल्या विद्यार्थ्यांची कींव येते.
पण आज एका महाविद्यालयात एका शिक्षकांनी या फुकटचंबू कार्यक्रमाला विरोध दर्शवल्याचे कानावर आले आणि जरा बरे वाटले. दोन तास पालखी नाचवल्यावर सारेजण या शिक्षकांना पालखीत सहभागी होऊन पूजा करण्याचा अत्याग्रह करू लागले, तेव्हा त्यांनी ठामपणे नकार दिला. ज्या गोष्टी मला पटत नाहीत त्यात मी सहभागी होणार नाही असे ठणकावून सांगितले. बराच वेळ दबाव टाकूनही ते बधत नाहीत म्हटल्यावर पालखी निघून गेली. पण मग काही वेळानंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य येऊन त्यांना लोकभावनेचा आदर वगैरे भंकस ऐकवून गेले.
हे ऐकत असतानाच ज्येष्ठ वैज्ञानिक आणि प्राध्यापक आले. जे झाले ते कळताच त्यांनी पुन्हा एकदा आपल्या विद्यापीठातच गणपती वगैरे बसवून आरत्या केल्या जातात हा विषय छेडला. आमच्या अनेक शैक्षणिक विभागांतूनही सांस्कृतिक वातावरण निर्मितीसाठी धार्मिक सणवार साजरे केले जातात. अनेक विभाग प्रमुख त्याला सक्रिय पाठिंबा देत असतात. विद्यार्थ्यांचे आपसातले मैत्र वाढावे, त्यांना एन्जॉय करता यावे म्हणून कितीतरी नावीन्यपूर्ण घटना साजऱ्या करता येतील. ठरीव सण, ठराविक दिवस साजरे करण्यापेक्षा आपण विद्यार्थ्यांना काही वेगळे अर्थपूर्ण पर्याय देऊ शकतो. आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती म्हणून धर्म-संप्रदायांचे कार्यक्रम, सणवार साजरे करणे नाकारणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे याचेही भान जागे रहायला हवे.
वारी असो, गणेशोत्सव असो, नवरात्र असो- समाजात हे सारे साजरे होतच आहे. त्यांचे संदर्भ अर्थ हरवत चालले असले तरीही गतानुगतिकतेपोटी ते चालूच रहाणार आहेत. त्या सर्वासाठी वेळ आणि ऊर्जा खर्ची घालून त्यांचे जतन करायला हवे अशी काही वेळ ओढवलेली नाही... सारे पर्याय बाजूला सारून तेवढेच साजरे करण्यासाठी विद्याक्षेत्रातही वेळ घालवायची मुळीच गरज नाही. असल्या बौध्दिक दिवाळखोरीचे प्रदर्शन जिथे मांडले जात असेल तिथे आपण त्याला विरोध तर केला पाहिजेच पण
सुजाण पर्यायही सुचवले पाहिजेत.
आपल्या देशाच्या संस्कृतीची कित्येक शतके, कित्येक वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांच्या संदर्भविश्वात कुठे शिरलेलीच नाहीत. बहुसंख्य समाजाच्या मर्यादित संदर्भांच्या खुराड्यांतून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांच्या खांद्यावर पालख्या देण्याचे नव्हे तर खांद्यावरच्या डोक्यांची जाणीव देण्याचे कार्यक्रम महत्त्वाचे आहेत.
पण त्यासाठी मुळात आपली डोकीच वापरायला हवीत!
लोकभावनेचा आदर करण्याच्या पोलिटिकली करेक्ट नादात तेच तर विसरायला होतं ना!
गोची तिथेच तर आहे आपली!
No comments:
Post a Comment