उद्या 18 जुलै. विद्यापीठाचा संस्थापना दिन. चक्क रविवार असूनही रविवारीच साजरा होतो आहे, हे विशेष. यापूर्वी अनेकदा कधी सुटीच्या दिवशी आला म्हणून कधी सणाच्या दिवशी आला म्हणून कधी कुलगुरूंना जमत नाहीए म्हणून अनेकदा संस्थापना दिन पुढे ढकलून साजरा करण्यात आला होता.
आमच्या विद्यापीठात ही एक गंमत आहे. आणि सारेच ती चालवून घेतात. सोयिस्कर. म्हणजे उदाहरणार्थ गणपती, दसरा, शिवजयंती, आंबेडकर जयंती अशा साऱ्या साजऱ्या करण्यासारख्या दिवसांच्या बाबतीत हे अवश्यच होतं. होतं काय... हे सारे दिवस असतात सुट्टीचे दिवस. हक्काची सुट्टी- ती तर उपभोगायलाच हवी, शिवाय धार्मिक सणांच्या बाबतीत घरचं कार्य असतंच. मग लोक काय करतात- गणपतीची पूजा आदल्या दिवशी, दसरा आदल्या दिवशी, शिवजयंती, आंबेडकर जयंती नेमक्या दिवसाच्या पुढल्या आठवड्यात कामाच्या दिवशी कधीही ऑफिसमध्ये साजरा होतो. म्हणजे सुट्टीचाही फायदा मिळतो आणि कार्यालय चालू असतानाही सुट्टीसारखे वातावरण तयार करून मज्जाच मज्जा करता येते. या सणावारांशिवाय कामाच्या दिवशी-बहुतेकदा पहिल्या, तिसऱ्या किंवा पाचव्या शनिवारी सत्यनारायणाची 'म्हापूजा' असतेच कधीमधी. नवरात्रात आपापल्या सेक्शनमध्ये आरास करून आरत्या-बिरत्या करूनही लोक भरपूर धमाल करतात. बरं यात धार्मिक भावनांचा अति बलदंड नाजूक प्रश्न असल्यामुळे कोणतेही,कोणाच्याही नेतृत्वाखालचे प्रशासन कार्यालयीन वेळेच्या या सरळ सरळ अपव्ययाला आळा घालू धजत नाही.
बुध्दीवंत,बुध्दीजीवी म्हणवणारे आपण बोटचेपे लोकही या फंदात आजवर कधीही पडलेलो नाही. कार्यसंस्कृतीची ओळखही नाही आपल्या विद्यापीठात, असे अनेकांना वाटते, हे माहीत आहे. पण सारे कसे गपगार रहातात.
असं कां होतं? आपली बुध्दीवंतांची चांगल्या नोकऱ्या, मान-सन्मान लाभलेली जमात असले परिवर्तन करण्याच्या भानगडीतच पडत नाही.
काय हेतू असतात आपले? कसली भीती असते नेमकी?
आपल्याला कुणाला दुखवायचं नसतं. कशाच्या विरोधात बोललं तर आपल्याला प्रशासकीय सहकार्य मिळणार नाही. आपल्या रजा, विशेष रजा, सर्विस बुकची कामं, आर्थिक बाजू असलेली कामं अडतील, लांबतील किंवा होणार नाहीत, आपल्याला त्रास होईल... असल्या फुटकळ कामांच्या भीतीमुळे आपण आपल्या वैचारिक जबाबदाऱ्या नाकारतो असं मला वाटतं. सर्वांशी मधुर संबंध असले तर आपली कामं होतील हा एक आपला लाडका गैरसमज आहे. प्रशासकीय उतरंडीत कसले तरी नकाराधिकार ताब्यात असलेल्या सुमार (mediocre) वरच्या-खालच्या सर्वांनाच काय केलं म्हणजे हे बुध्दीवंत झुकतात हे आता चांगलंच कळलंय. आपण ते नाकारलं पाहिजे. कुणालाही माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून मूलभूत चांगली वागणूक देणं आपण विसरता कामा नये, परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की स्वहस्ते आपल्या नाकात वेसण घालून आपण त्यांच्या हातात द्यावी.
एक उदाहरण- कुठेही परदेशी जाण्याची संधी आपल्या शिक्षकांना आली की त्यांना खेळवलं जातं. फालतू कारणं देऊन अडवणूक केली जाते. ग्रांट मोकळी होण्यात अडतळे आणले जातात. आपल्यापैकी अनेक बुध्दीवंत काय करतात... असे अडथळे आणणाऱ्यासाठी परतल्यानंतर फॉरेनच्या चॉकलेट्सचा किंवा परफ्यूमचा नजराणा देतात- जेणेकरून पुढल्यावेळी असा त्रास होऊ नये.
यात प्रेम- किंवा आपुलकीपेक्षा तुष्टीकरणाचाच भाग असतो.
आपलं काम नाही झालं- परदेशी जायला नाही मिळालं तरी चालेल पण असल्या फालतू कारणांपुढे गुडघे टेकणार नाही, नांगी टाकणार नाही असा बाणा आपण कां नाही दाखवत? दाखवायला हवा. पण हे सुध्दा तेव्हाच शक्य आहे की आपली वर्तणूक, वैचारिक-बौध्दिक चारित्र्य स्वच्छ असेल. तू आम्हाला बोलाव आम्ही तुला बोलवतो असल्या देवघेवीवर आधारित निमंत्रणे मिळवणाऱ्यांना हे जमणार नाही.
आणि हाच नियम सर्वत्र लागू होतो. कार्यालयीन रेड टेपीझमवर मात करण्यासाठी आपल्या स्वच्छ बुध्दीने दाखवलेल्या खंबीरपणाचे शस्त्रच कामी येईल.
या फाउंडेशन डे निमित्ताने ही माझी खूणगाठ.
लेख सुंदर आहे, वस्तुस्थितीची व्यवस्थित मांडणी आहे पण मला शंका आहे, हे वाचून बाहेरचे जग तर सोडूनच दे, खुद्द तुझ्या प्रभागातील माणसे कितपत विचार करतील? जे स्वत:ला विचारवंत समजतात, त्यांची दुर्लक्षित वृत्ती चीड आणणारी तर नक्कीच आहे पण त्याला खतपाणी घालणारे आजूबाजूचे वातावरण देखील तितकेच जबाबदार नाही का? मला कुणाची बाजू घ्यायची नाही पण सगळीकडे "राखाडी" रंग पसरला आहे, हे नक्की.
ReplyDeleteअनिल गोविलकर
amhi asa prayatna kela ani yashasvihi zalo..... yashasvee zalyananatar matr amhala baryach tras sahan karava lagat ahe attaa vidyapeethamadye .....
ReplyDelete