Monday, July 19, 2010

फडतूस विद्वानांचे राजकारण

विद्यापीठात किंवा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतून फालतू पॉलिटिक्स होते यात काही नवीन नाही. सिनिऑरिटी वगैरेसारखे मुद्दे म्हणजे तर रोजचीच लढाई. हे पॉलिटिक्स विद्यार्थ्यांची विषयाची निवड किंवा शिकण्याची संधी इथवरही जाऊन पोहोचते तेव्हा ते हाणून पाडायलाच पाहिजे. आज माझ्या संपर्कातील कित्येक कॉलेजांमधले शिक्षक काय काय कथा आणि व्यथा सांगत असतात, त्या ऐकल्या की अंगावर शहारे उठतात. आपण राजकारण्यांना किती हिरीरीने नावं ठेवतो, किती रेवडी उडवतो. ते तर थेट राजकारणातच असतात. आपल्या विद्याक्षेत्रातले, ज्ञानक्षेत्रातले काही लोक आपसात किंवा विद्यार्थ्यांशी किती राजकारण करतात ते पाहिलं, अऩुभवलं की घृणा येते.
मराठीचे एक जुने प्राध्यापक होते- ते विद्यार्थ्याला वर्गाबाहेर भेटले की समोर तीन पुस्तकं धरायचे आणि म्हणायचे- बघ, तुला हवं ते घे यातलं. वाच. आणि मग आपण बोलू या हं त्यावर.
आपल्या विद्यार्थ्यांना वाचनाचं वळण त्यांनी लावलं ते कायमचं. या विद्यार्थीप्रिय प्राध्यापकांवर त्यांच्या सहकारी बाई जळफळत रहायच्या. पण आपणही तसं काहीतरी करावं अशी उर्मी काही त्यांना झाली नाही. आज त्यांच्या भाषाविभागात विद्यार्थ्यांची प्रचंड वानवा आहे. पण त्यासाठी काही चांगला दृष्टिकोन घेऊन नवीन प्रयोग करणे त्यांना जमणार नाही. ज्या विभागांकडे विद्यार्थी आहेत त्यांचा दुस्वास करण्यापलिकडे त्या जाऊ शकत नाहीत. उद्या कुठल्या परिषदेत भाषेच्या रक्षणाच्या नावाने गळा काढणारे भाषण फारफार तर करताना दिसतील त्या. आपल्या विभागात येणारे नवीन शिक्षक विद्यार्थीप्रिय होताना दिसले तर त्यांना त्रास कसा द्यावा यावर आपल्याकडे पदविका सुरू केली तर आपल्याला खूपच फॅकल्टी मिळेल.
विद्यापीठातल्या एका भाषा विभागातली गोष्ट आहे. व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम करणारा, शिकवण्यावर प्रेम असणारा एक विद्यार्थीप्रिय शिक्षक होता. प्राध्यापक होऊ शकेल अशी त्याची गुणवत्ता होती. इतके त्याचे शोधनिबंध होते. अनेक विदेशी विद्यापीठांतून व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून त्याला निमंत्रणे येत.
परीक्षेसाठी पेपर काढणे, ते तपासणे, आपल्याला सुट्टी हवी असेल तेव्हा त्याच्याकडे आपली लेक्चर्स सरकवणे यासाठी इतर सर्व शिक्षकांना तो फार हवाहवासा होता. पण जेव्हा नियुक्तीची वेळ आली, तेव्हा विभागतल्या भयग्रस्तांच्या थव्याने त्याला रीडर म्हणून नियुक्ती मिळू नये याची काळजी घेतली. तेव्हाच्या कुलगुरूंनी आपल्या महाराष्ट्राच्या ऑलपावरफुल साहेबांच्या नावाने चिठ्ठी फाडून त्याचा पत्ता कापला. आज तो शिक्षक कच्छ विद्यापीठात विभागप्रमुख आणि प्राध्यापक म्हणून रुजू झाला आहे. आणि कदाचित एका विदेशी विद्यापीठात कायमचा जाण्याची शक्यता आहे. फडतूस हितसंबंध जपण्याच्या
अंतर्गत राजकारणामुळे या विद्यापीठातील विद्यार्थी एका अत्युत्तम शिक्षकाला कायमचे मुकले.
नको त्या अशैक्षणिक मापदंडांच्या आधारावर विद्याक्षेत्रात घुसलेल्या पोटार्थींनी आपली प्रतिष्ठा वाढवण्याच्या असल्या निरर्थक खेळ्या करणे थांबवले तरी काही प्रमाणात आपण सावरू शकू.

6 comments:

  1. My wife and I were once invited to ur Life Sciences department for lectures, a few years ago..we were aghast to see the then HOD there, couldn't speak in proper English..not just that, there were several other faculty members out there who couldn't do that..how can these ppl teach and inspire students without knowing the language? It looked like a case of pointless caste politics defeating the very purpose for which ppl are employed!

    ReplyDelete
  2. गुणवत्तेवर आधारित निवड झालेली गेल्या कित्येक वर्षात ऐकलेली नाही. मग तो विद्यापीठातील एखादा विभाग असो किंवा समाजोपयोगी काम करणाऱ्या अशासकीय संस्था असोत. लागेबांधे असलेल्यांचेच भले होताना दिसते. विषयासक्ती असलेली माणसे कुठल्याही पदावर का असेनात, जो 'विषय' हाताळण्यासाठी नेमणूक व्हायला हवी त्यातील आव्हाने स्वीकारण्याची क्षमता जोखताना कशी दिसावीत. पदावर असलेल्या प्रत्येकाचे वैयक्तिक स्वार्थ त्यांच्या अधिकाराचा योग्य उपयोग करण्याच्या मार्गातील मोठा अडथळा असतात. त्यामुळेच सकसता डावलली जाते आणि सपक गोष्टी येणाऱ्या पिढीच्या माथी मारल्या जातात. निराशेची बाब हि कि तुम्ही लिहिल्या तशा फडतूस, पेक्षाही तथाकथित विद्वानांचेच नाही तर खरोखरच अतिशय उत्तम रीतीने हाती असणाऱ्या विषयात मोलाची भर टाकणाऱ्या विद्वानांनीही असे राजकारण आपलेसे केलेले दिसते..

    ReplyDelete
  3. गुणवत्तेवर आधारित निवड झाल्याची अनेक उदाहरणे मला माहीत आहेत.आज अनेक गुणी शिक्षक माझ्या ओळखीचे आहेत. संस्थांमधून कार्यरत आहेत. त्याच्या जोडीला गुणवत्तेचा पत्ता नसताना निवड आजलेलेही आहेत. मी बोलते आहे ते या दोन गटांमधून बहुसंख्य लोक अशैक्षणिक वृत्तीचे आहेत त्याबद्दल.आपल्याला एकादी संधी मिळाली नाही म्हणून व्यवस्थेवर टीका करण्याचे काम आमच्या अलिकडच्याच माजी प्रकुलगुरूंनी केले होते. संधी मिळालेल्या लोकांच्या गुणवत्तेसंबंधी प्रश्न उपस्थित जरूर करावेत, पण त्यात केवळ आपले नैराश्य प्रतिबिंबित होणार नाही याचीही टीका करणाऱ्या विद्वानांनी काळजी घ्यायला हवी. सर्वच विद्वानांनी थोडे आत्मपरिक्षणही करावे असे मला ठामपणे म्हणावेसे वाटते. सर्वच बाबतीत निराशावादी दृष्टिकोन घेतला तर त्याचा त्रास फक्त स्वतःलाच होतो, वैशाली.

    ReplyDelete
  4. कृपया माझ्या प्रतिक्रियेचे वाचन आणि स्वीकार 'माझा निराशावादी दृष्टीकोन' ह्या दृष्टीकोनातून न करता सभोवतालच्या सर्वसाधारण परिस्थितीतून उमटलेले विचार असा झाला तर लेखावरील प्रतिक्रिया ह्या गोष्टीला न्याय मिळेल.

    गुणवत्तेवर आधारित निवड, गुणवान शिक्षक आणि गुणवत्ता नसतानाही जागा मिळवलेले शिक्षक ह्या बाबतीत असलेल्या आपल्या माहिती आणि अनुभवाला आव्हान देण्यासाठी हि प्रतिक्रिया नव्हती. तशीच ती संधी मिळालेल्या लोकांच्या क्षमतेवर टीका करून स्वतःचे नैराश्य प्रतिबिंबित करण्याचीही नव्हती. जसे आपल्या अनुभवांनी आपल्याला हा लेख लिहायला अनुस्यूत केले तसेच काही वर्षांपासून एकंदरीतच शिक्षण क्षेत्रातील राजकारण वेगवेगळ्या तऱ्हेने अनुभवास आलेल्या मला त्यावर प्रतिक्रिया द्यायला...
    फक्त ज्या दोन गटांबद्दल आपण लिहिले आहे त्यातील लेखाच्या शीर्षकात असलेल्या पहिल्या तथाकथित विद्वानांपेक्षाही खऱ्या विद्वानानीही असे राजकारण आपलेसे केलेले दिसते ह्या खेदकारक वस्तुस्थितीला सामोरे जावे लागते हे नमूद करायचे होते....
    सर्वच बाबतीत निराशावादी दृष्टीकोन चांगला नाही हे तर खरेच आणि सर्वच विद्वानांनी आत्मपरीक्षण करावे हेही.... पण त्रास निराशावादी दृष्टीकोनापेक्षाही ती जन्मास घालणाऱ्या राजकारणाचा होतो, आणि तोही फक्त कुणा एकाला नाही. आणि अशा विषयाला आपण ह्या लेखातून हात घातला हि आशावादी बाब आहे म्हणून त्यावर प्रतिक्रिया उमटली इतकेच.....

    ReplyDelete
  5. वैशाली, आपण म्हणता तसे राजकारण जे करीत असतील ते खरे विद्वानच नसतील. ज्यांना आपण विद्वान आहेत असे मानता त्यांनी राजकारण केले असे आपणांस वाटत असेल तर हा विरोधाभास वाटतो. विरोधाभास हा अखेर आभास असतो. त्यातील कोणतीतरी एक गोष्ट चुकीची आहे. ती कोणती ते तपासून पहावे. आयन रॅण्ड म्हणते- कॉन्ट्रॅडिक्शन्स डोन्ट एक्सिस्ट. इफ यू थिंक समथिंग इझ अ कॉन्ट्रॅडिक्शन, चेक युअर मॉरल प्रिमायसेस. यू विल फाइंड, वन ऑफ देम इझ् रॉन्ग. हे मला स्वानुभवातून पटले आहे.
    आपल्याला अभिप्रेत असलेल्या विद्वानाने ते राजकारण खरेच केले आहे कां हे तपासून पहा किंवा तो खरेच विद्वान आहे कां हे तपासून पहा.
    आपल्या नैराश्यावर मात करणे आणि सत्य स्वीकारणे हे मोठे आव्हान आहे.पण त्यातून अखेर आनंदाची वाट सापडू शकेल.हा ही स्वानुभव.

    ReplyDelete
  6. Yes. It is a common experience that those who lack the initiative and imagination only pull legs of those who exhit these and become popular teachers.
    Kale P G

    ReplyDelete