लोकसत्तामधून माझा माझे विद्यापीठ हा लेख प्रसिद्ध झाल्यावर जे काही फोन आले त्यातला एक फोन मला अगदी आवडला नव्हता. एका महाविद्यालयातून निवृत्त झालेली ही व्यक्ती मी पीएच् डी संबंधी जे काही लिहिले होते, त्याचा विपर्यस्त अर्थ लावून फारच खूष झाली होती. बाकी सारे मुद्दे बाजूला राहिले आणि एकच सूत्र धरून ते बोलत राहिले. ते म्हणाले पीएच् म्हणजे फालतू आणि डी फॉर डिग्री- पीएच् डी म्हणजे फालतू डिग्री. त्यांनी माझ्या लेखाचे जे कौतुक केले ते मला अजिबात कौतुकास्पद वाटले नाही.
शैक्षणिक क्षेत्रातल्या आपल्याच सहकाऱ्यांनी संशोधनाच्या एका टप्प्याला असे निकाली काढले. आपला आक्षेप असायला हवा तो भरताड डिग्र्या मिळवणाऱ्या किंवा देणाऱ्या लोकांवर. विद्वत्तेच्या क्षेत्रातील एका महत्त्वाच्या टप्प्याचे असे सरसकट अवमूल्यन करणे योग्य नव्हे. असेही आणि तसेही. पगारवाढ, पदोन्नती साठीच केवळ पीएच् डी पदरात पाडून घेणे गैर, सामाजिक-राजकीय वर्तुळात सन्मान मिळवण्यासाठी दुसऱ्यांकडून काम करवून घेऊन, पैसे खर्च करून पीएच् डी मिळवणेही गैर आणि केवळ आपल्याला ती मिळवता आली नाही म्हणून असली फालतू कोटी करणेही गैर.
अनेक लोक आपल्या पीएच् डीच्या संशोधनावर आटोकाट मेहनत घेतात, मान मोडून संशोधन करतात. त्यांचा अधिक्षेप करणारे हे शब्द आहेत.
आजच आमच्या बहिःशाल शिक्षण विभागातील एका तज्ज्ञांनी एक उदाहरण दिले. एका महान् संशोधकाने आपल्या विद्यार्थिनीला वीस वर्षांपूर्वी स्वतः केलेल्या संशोधनाचा बेस घेऊन त्याच विषयावर नव्या संदर्भांच्या चौकटीत पुन्हा संशोधन करण्यास सुचवले. तिच्या संशोधनामुळे त्यांचे निष्कर्ष निकाली निघाले. पूर्णतः रद्दबातल ठरले. या थोर गाईडने त्यावर कृतकृत्यतेची भावना व्यक्त केली. ती विद्यार्थिनी त्यांची बौध्दिक वारस ठरली.
आपल्याकडील अनेक लोक किती कमीत कमी साधने, सुविधा असताना किती कष्ट करून- विशेषतः वैज्ञानिक संशोधनाची कास सोडत नाहीत याचा मला रास्त अभिमान वाटतो.
असे लोक आपल्यात आहेत म्हणूनच भोवती भरपूर उकिरडा असतानाही सारे काही सोडून द्यावे अशी विरक्ती येऊ शकत नाही.
सामाजिक शास्त्रात आचार्य पदवी साठी होणारे संशोधन मुलभुत स्वरुपाचे किंवा नवा विचार देणारे असते यावर
ReplyDeleteविश्वास ठेवणे कठीण आहे. मार्क्स किंवा अन्य अनेक विचारवंताच्या विचाराने सामाजिक -आर्थिक बदल झालेत.
कारण ते विचार नवे आणि मुलभुत स्वरुपाचे होते.आचार्य पदवी साठी आता पर्यंत देशभरात झालेल्या संशोधनातून
काडीचाही बदल झाला नाही.असे संशोधन झालेच नाही तर त्याने काय फरक पडणार आहे?
बदल होतात ते सैध्दान्तिक बैठक बदलल्यामुळे, त्या आधारे समाज-संरचना बदलल्यामुळे.समाजशास्त्रांतील संशोधन हे सैध्दान्तिक बैठका बदलण्याच्या आवश्यकतेची कारणे शोधण्यासाठी होते. एक संशोधन एखाद्या आस्पेक्टचा विचार करते. अशा अनेक कामांमधून समाजशास्त्रीय ज्ञान समृध्द होत जाते. सामाजिक इतिहासाची आणि वर्तमानाच्या पृथक्करणाची बैठक नसेल तर सैध्दान्तिक मांडणी आकाशातून पडू शकत नाही.
ReplyDelete