मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंनी परवा पहिलीच विद्वत्-सभेची बैठक भरवली. त्यात अजेंड्याच्या जाडजूड छापील गट्ठ्याकडे निर्देश करीत ते म्हणाले, -हा रद्दी-प्रॉडक्शनचा प्रकार आता थांबवला जाईल. तुम्हा सर्वांना अजेंड्याची प्रत सीडीवर मिळेल. आपापले लॅपटॉप्स घेऊन, बरोबर सीडी घेऊन या. असे कागद वाया घालवणं पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य नाही, नाही कां?- बिचारे कोणीच काही बोलू शकले नाही.
बक अप वेळूकर.
काय गंमत आहे पहा. अमेरिकेत इंटरनेटचा जन्म झाला तो अमेरिकन युनिव्हर्सिटीज् आणि नासा, आर्मी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून. ते सुरू झाल्याला आता दशके लोटली. पण भारतीय विद्यापीठांमधून आयता मिळालेला इंटरनेटचा घास गिळायलाही आम्हाला कष्ट पडत होते. कॉम्प्युटरला हात लावायलाही अजून आपल्या शिक्षक-अध्यापकांना भीती वाटते. मुंबई विद्यापीठाच्या गेल्या सद्दीत तर संगणक-वापराचा आनंदच होता. मुख्य दोघांनाच ते वापरण्याची माहिती नसावी. नाही तर गोष्टी इतक्या कशा रखडू दिल्या असत्या.
एकदा एका महत्त्वाच्या अधिकाऱ्याला मी तातडीची अमुक एक गोष्ट इमेलवर पाठवते म्हटलं. तर तो बापडा म्हणाला- नाही म्हणजे हां.. हां.. हां. मी असं करतो... या इथे हे अमके बसले आहेत त्यांना सांगतो त्यांची इमेल द्यायला... माझा प्रॉब्लेम आहे जरा... नाही म्हणजे माझी इमेल आहे... पण माझी मेल इथे उघडता येत नाही.
हसून हसून फुटायची वेळ.
आमच्या या विद्यापीठाने नेट कनेक्टिव्हिटीसाठी किती पैसा दवडला, त्यातला किती कारणी आला- कुणीतरी माहितीच मागवून घ्यायला हवी. अजूनही विद्यापीठाच्या वित्त-लेखा कामांत कॉम्प्युटर फारसा असत नाही. आमच्या पगाराची स्लिप, फॉर्म 16 वगैरे हवं तर प्रत्यक्षच जावं लागतं. क्या बात है!
अहो आमचा प्रत्यक्ष संपर्कावर विश्वास आहे. सर्विस बुक्स, नेमणुकांच्या नोंदी सारं प्रत्यक्ष. स्वतः या नाहीतर प्यून पाठवा.
खेटे घाला संस्कृती टिकवण्याची घोर जबाबदारी आहे विद्यापीठ प्रशासनावर.
वेळूकर सर, बदलणार की काय हे सारं तुम्ही?
बघू या तुम्हाला किती झगडावं लागतं ते...
आपला अडाणीपणा उघड होऊ नये अशी काळजी परोपरीने घेणारे खूप लोक आहेत सर्वत्र.
बदल नको असतो तो तेवढ्याचसाठी.
त्यांच्यापासून सावध रहाण्याचीही तशी गरज नाही म्हणा.
घट्टपणे उभं रहाणारांपासून ते पळ काढतील असा अंदाज आहे.
एक नवीन पाऊल उचललं जात असल्याचा मनापासून आनंद आहे...
I recollect similar initiative from Rajiv Gandhi's time. We all know, he promised to take us to the 21st century...unfortunately, he was banking on all the people from 20th century to do so!
ReplyDelete